You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान निवडणूक - जाणून घ्या या 4 महत्त्वाच्या गोष्टी
बुधवारी 25 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत पाकिस्तानचे लाखो लोक मतदान करतील. राजकीय वादविवाद आणि हिंसाचार या मुद्दयांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली.
या निवडणुकीच्या प्रचारात अनेक हिंसक हल्ले झाले आहेत. त्यात बलुचिस्तानमध्ये 13 जुलैला केलेल्या हल्ल्यात 150 लोकांचा मृत्यू झाला होता. IS ने केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
दक्षिण आशियातील 20 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. कारण हा देश अण्वस्त्रसज्ज आहे. भारताचा हाडवैरी आहे. तसंच मुस्लीम लोकसंख्या असलेल्या जगातल्या काही मोठ्या देशांपैकी एक आहे.
पाकिस्तानच्या इतिहासात ही निवडणूक सगळ्यांत वादग्रस्त ठरू शकते. काय आहेत यामागची कारणं, जाणून घेऊ या.
1. ही निवडणूक का महत्त्वाची?
1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानवर लष्करी राजवट आणि नागरी सत्ता आलटून पालटून येत होती. या निवडणुकीत एखाद्या लोकशाही सरकारने कार्यकाळ पूर्ण करण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे.
ही एक ऐतिहासिक घटना आहे. पण लोकशाहीचा हा उत्सव पाकिस्तानात काही मोजकेच लोक साजरा करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ (PML-N) हा पक्ष आणि लष्करात झालेल्या खडाजंगीने या निवडणुका गाजत आहे.
लष्कराने जाणूनबुजून कोर्टाच्या साहाय्याने कारवाई केल्याचा आरोप PML-N या पक्षाने केला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 17,000 पक्ष कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांवरसुद्धा अनेक बंधनं लादली आहेत आणि त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसंच काही कट्टरवादी गट या निवडणुकीत भाग घेत आहेत. पाकिस्तानी लोकशाहीवाद्यांना नेमकी हीच भीती सतावत आहे.
अनेकांना वाटतंय की, लष्कर त्यांना हव्या असलेल्या उमेदवारांसाठी आपली जुनीच रणनीती वापरत आहेत. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या मते, निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी अगदी उघडपणाने प्रयत्न होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात उदयाला येत असलेल्या लोकशाहीवर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.
या निवडणुकीच्या प्रचारात अनेक हिंसक हल्ले झाले आहेत. त्यात बलुचिस्तानमध्ये 13 जुलैला केलेल्या हल्ल्यात 150 लोकांचा मृत्यू झाला होता. IS ने केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
2. महत्त्वाचे नेते कोण?
पाकिस्तानच्या या निवडणुकीत पारंपरिक पक्षांचं वर्चस्व आहे. काही नव्या दमाचे नेते रिंगणात असले तरी बुजुर्गही तितकेच प्रभावी ठरू शकतात.
नवाझ शरीफ (PML-N), वय - 68
सध्याच्या जागा- 182
नवाझ शरीफ यांनी यापूर्वी तीनदा पाकिस्तानचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. पनामा पेपर्समध्ये त्यांचं नाव आल्यावर त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतरते त्यांच्या आजारी पत्नीबरोबर लंडनला निघून गेले.
पाकिस्तानी कोर्टाने शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली नुकतीच दहा वर्षांची शिक्षा सुनावली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते आपल्या मुलीबरोबर नाट्यमरीत्या पाकिस्तानात परतले. लंडनमध्ये असलेल्या फ्लॅटच्या मालकीबाबत त्यांना पुरेसं स्पष्टीकरण देता आलं नाही. याच आरोपाखाली आता ते तुरुंगात आहे.
लष्करावर कटकारस्थान करण्याचा आरोप त्यांनी लावला आहे. तसंच आपण भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, असा त्यांचा दावा आहे. लष्कराने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पक्षातर्फे निवडणुकीच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पंतप्रधानपदी विराजमान होण्याची त्यांची इच्छा आहे.
इम्रान खान (PTI), वय - 65
सध्याच्या जागा- 32
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इम्रान खान यांनी दोन दशकांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. पण त्यांनी अद्याप कधीही सरकार चालवलं नाही. अनेक निरीक्षकांचं असं मत आहे की, यावेळी लष्करातर्फे त्यांना पुढे आणलं जात आहे आणि त्यांच्या स्पर्धकांचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
खान यांनी लष्कराशी कोणतेही संधान बांधल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्याच वेळी बीबीसीशी बोलताना सध्याचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी मात्र पाकिस्तानातले सर्वांत जास्त लोकशाहीवादी नेते इम्रान आहेत असं सांगितलं. त्यांच्या PTI पक्षाला अल-कायदा सारख्या गटांचा पाठिंबा आहे.
बिलावल भुट्टो (PPP), वय 29
सध्याच्या जागा- 46
ऑक्सफर्डमध्ये शिकलेले बिलावल भुट्टो झरदारी हे पाकिस्तानच्या सगळ्यात जुन्या राजकीय घराण्याचे ताज्या दमाचे उमेदवार आहे. त्यांची आई बेनझीर भुट्टो आणि त्यांचे आजोबा झुल्फिकार अली भुट्टो यांनी पंतप्रधानपद भूषवलं होतं.
झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवण्यात आलं आणि बेनझीर भुट्टो यांची हत्या करण्यात आली. 29 वर्षीय बिलावल हे पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले आहेत. ते म्हणतात की, त्यांना त्यांच्या आईच्या शांतता, प्रगती, समृद्धी, लोकशाहीवादी पाकिस्तानाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. निवडणुकीच्या अंदाजानुसार त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असेल.
3. कुणाला कुठून जागा मिळतील?
PML-N या पक्षाचा पंजाब प्रांतात वरचष्मा आहे. ही नवाझ शरीफ यांची मायभूमी आहे आणि हा देशाचा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला आणि देशातला सगळ्यांत जास्त मोठा मतदारसंघ आहे. नॅशनल असेंब्लीतल्या 272 जागांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त जागा या मतदारसंघात आहे आणि या निवडणुकीतली सगळ्यात मोठी लढत या मतदारसंघात होणार आहे.
खान यांच्या पक्षाला सगळ्यांत जास्त संघर्ष करावा लागणार आहे. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत खैबर पख्तुनख्वा या भागात त्यांची कामगिरी चांगली झाली होती.
भुट्टो यांचा PPP पक्ष ग्रामीण भागात सगळ्यांत जास्त लोकप्रिय आहे आणि सिंध भागातील दक्षिण बाजूला मतदार केंद्रित झालं आहेत.
4. आता पुढे काय होईल?
या निवडणुकीत तीनपैकी दोन पक्षांनी मतांच्या वैधतेबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे शरीफ आणि खान यांच्या पक्षात रंगतदार लढत होण्याची शक्यता निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. जर यापैकी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भुट्टो आणि इतर पक्षांचा पाठिंबा सरकारस्थापनेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
जर PML-N विजयी झाले तर भारत आणि अमेरिका सुटकेचा नि:श्वास टाकतील कारण इम्रान खान यांची लष्कराशी जवळीक आहे आणि ते मुस्लीम कट्टरवादावर सौम्य भूमिका घेतात. कट्टरवादाच्या विरोधात असलेल्या लढाईत अमेरिका पाकिस्तानबरोबर आहे. तरी अफगाणिस्तानात असलेल्या कट्टरवादी गटांना सुरक्षा देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिका पाकिस्तानवर नाखुश आहे आणि त्यामुळे ट्रंप यांनी लष्करी मदतीत कपात केली आहे.
जर PTI पक्ष जिंकला आणि त्यातही शरीफ तुरुंगातच राहिले तर PML-N पक्ष आपल्या समर्थकांना रस्त्यावर येण्यास उद्युक्त करेल.
शेवटी कोणताही पक्ष जिंकला तरी लष्कर आपलं वर्चस्व राखण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)