You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान : निवडणुकीच्या रिंगणात पुरुषांसमोर उभी ठाकलेली हिंदू महिला
- Author, शुमाइला जाफरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पाकिस्तान
घन:श्यामची दृष्टी जवळपास गेलेली आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी जेव्हा उदबत्ती लावण्यासाठी त्यांनी काड्यापेटीवर काडी घासून पेटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे हात थरथरत होते. आधी बऱ्याचदा त्यांना काडी पेटवणं जमलंच नाही. पूजा सुरू केली तेव्हा त्यांचा चेहरा उदबत्तीच्या धुराच्या मागे अंधुक झाला होता.
घन:श्याम कधीकधी त्यांच्या घराजवळ असलेल्या हिंदू देवळाला भेट देतात. हे देऊळ भारत पाक सीमेजवळ नगपारकर भागात आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये युद्ध झाल्यानंतर काही हिंदू कुटुंबीय इथून पळून गेले तेव्हा हे देऊळ बंद झालं होतं.
त्यांच्या आजोबांनी हे देऊळ बांधलं होतं. युद्ध होईपर्यंत तेच या मंदिराची काळजी घेत होते. एका स्थानिक व्यक्तीने त्यांची जमीन आणि देऊळ बळकावलं, असा दावा करण्यात केला.
खरं तर पाकिस्तानच्या इतर काही भागांत आजही अनेक हिंदू राहतात. पण सर्वांत जास्त हिंदू दक्षिण सिंध प्रांतात राहतात.
पूजा झाल्यानंतर घनःश्याम बोलू लागतात. "माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की, ती जमीन 12,000 फूट होती."
"ही आपलीच जमीन आहे असं घरमालकाचं म्हणणं आहे. जेव्हा माझ्या भावाने जाऊन कडक शब्दात सुनावलं तेव्हा तो जरा चपापला आणि कोर्टात जा म्हणाला," ते पुढे सांगतात.
"पण आम्ही अतिशय गरीब आहोत, आम्हाला परवडत नाही", असं ते पुढे म्हणाले.
तिथून 100 किमी अंतरावर असलेल्या मिट्टी शहरात सुनीता परमार आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. सुनीता या थरपारकर भागातल्या संपन्न हिंदू दलित समाजाच्या आहेत.
एका छोट्या मोटरसायकल रिक्षामध्ये त्यांच्या सासूबाईही त्यांच्या समवेत आहेत. आपल्या प्रचार सभेची सुरुवात करण्याआधी त्या एका सुफी दर्ग्यासमोर दर्शनाला थांबतात.
मरून रंगाची आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम केलेली साडी नेसून त्या दर्ग्यात शिरताना चेहरा पूर्णपणे झाकला जाईल असा घुंघट त्या ओढतात. एक छोटा ताफा त्यांच्या मागे जातो. सिंधी संस्कृतीत मुस्लीम आणि बिगर मुस्लीमसुद्धा सुफी धर्माचं पालन करू शकतात.
त्या दर्ग्यापाशी असलेल्या 50 एक समर्थकांसमोर बोताना त्या म्हणाल्या, "सरंजामी वृत्तीला आव्हान देण्यासाठी मी सज्ज आहे. ही व्यवस्था गरीबांच्या विरुद्ध भेदभाव करते आणि महिलांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत."
"मी स्थानिक पातळीवर असलेल्या प्रशासनाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून समाजाला त्यांच्यापासून सुटका मिळेल." त्या पुढे म्हणाल्या.
सुनिता यांचा दावा आहे की, त्यांच्या समाजातील स्त्रियांनीच त्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. जेणेकरून स्त्रियांचा आवाज कोणीतरी वर पोहोचवेल आणि त्यांच्या हक्कांसाठी त्या लढू शकतील.
पण सुनिता यांच्या विजयाची शक्यता फारच कमी आहे. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याक आहे. पण फाळणीमुळे त्यांच्यावर सगळ्यांत जास्त परिणाम झाला आहे असं मानण्यात येतं
थरपारकर भागात जवळजवळ अर्धी लोकसंख्या हिंदू असली तरी त्यांना राजकीय आधार नाही. त्यामुळे हिंदू उमेदवारांनी इथे निवडणुका जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे. एखाद्या मोठ्या राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तरच थोडीफार शक्यता आहे.
पाकिस्तानमधील हिंदू
हिंदू लोकसंख्या- 33,24,392
हिंदू मतदारांची एकूण संख्या- 17 लाख
अल्पसंख्यांकांसाठी 10 जागा राखीव आहेत.
पूर्ण पाकिस्तानचा विचार केला इथल्या हिंदूंची संख्या 3324392 आहे. एकूण लोकसंख्येच्या 1.6 टक्के आहे.
पाकिस्तानात एकूण हिंदू मतदार 17 लाख आहेत. इथे हिंदू अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. अल्पसंख्याकांसाठी पाकिस्तानात 10 जागा राखीव असतात. पण हिंदू उमेदवार सर्वसामान्य जागेसाठीही निवडणूक लढवू शकतात.
राजकीय साथ
पाकिस्तानमधल्या दलित चळवळीच्या डॉ. सोनू खिंगरानी यांचं म्हणणं आहे की, "थरपारकर भागात एकूण मतदारांपैकी 23 टक्के दलित आहेत. पण त्यांचं कुठेही एकगठ्ठा मतदान होत नाही. त्यांचं कुठेही प्रतिनिधित्व नाही."
20 दलित लोकांनी तिकीटांसाठी अर्ज केला आहे. पण मुख्य प्रवाहातील कुठल्याच राजकीय पक्षांनी त्यांना सामावून घेतलं नाही, अशं खिंगरानी यांचं म्हणणं आहे.
"आमच्यापैकी काही लोक मागच्या काही काळात लोकसभेवर गेले आहेत. पण त्यांचे राजकीय नेत्यांबरोबर वैयक्तिक संबंध होते, त्यामुळे हे होऊ शकलं. पक्षाच्या विचारसरणीशी त्यांची निष्ठा असते. त्यामुळे ते त्यांच्या समुदायाबद्दल किंवा समस्यांबद्दल बोलत नाहीत," त्या पुढे म्हणाल्या.
दलितांसह अनेक हिंदूंनी पाकिस्तानमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे. जोगेंद्रनाथ मंडल देशाचे पहिले कायदा मंत्री होते.
उच्चवर्णीय हिंदू असलेले डॉ. महेश कुमार मलानी यांना नॅशनल असेंब्लीसाठी भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षातर्फे तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे मलानी यांच्या घराच्या बाहेर उत्साहाचं वातावरण आहे.
"हिंदू आणि मुस्लीम मतदारांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही," असं समर्थकां हाता महेश मलानी सांगत होते.
मलानी यांचे पाकिस्तान पीपल्स पार्टीशी जुने संबंध आहे. तसंच ते संसदेचे सदस्यसुद्धा होते.
"मला विश्वास आहे की, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे समर्थक माझा धर्म पाहणार नाहीत आणि ते माझ्या पक्षाला नक्कीच मत देतील. आम्ही नक्की जिंकू," ते पुढे म्हणाले.
पक्षानं समर्थन दिलं नसलं तरी स्पर्धेत अनेक दलित उमेदवार आहेत जे स्वतंत्रपणे लढत आहेत. ते कदाचित जिंकणार नाहीत पण त्याचं अस्तित्व जाणवून देण्यात ते नक्कीच यशस्वी होतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)