You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅसिड हल्ल्यापासून बचावलेल्या ट्रान्सजेंडर पाकिस्तानच्या निवडणूक रिंगणात
- Author, झुल्फिकार अली आणि व्हिक्टोरिया बिसेट
- Role, बीबीसी न्यूज
नायाब अली जेव्हा 13 वर्षांची होती, तेव्हा त्यांचा नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिकरीत्या छळ करण्यात आला होता. नंतर तिच्या प्रियकराने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. एक ट्रान्सजेंडर महिला म्हणून तिचं आयुष्य वादळी होतं.
पण पदवीधर असलेली नायाब पुढच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीत एक ट्रान्सजेंडर उमेदवार म्हणून रिंगणात उभी ठाकली आहे.
"तुमच्याकडे राजकीय ताकद आणि देशाच्या महत्त्वांच्या संस्थांचा भाग असल्याशिवाय तुम्हाला तुमचे हक्क मिळत नाही, असं मला जाणवलं," त्यांनी बीबीसीला सांगितलं.
या निवडणुकीत ट्रान्सजेन्डर समुदायाचे अनेक लोक उभे आहेत. पाकिस्तानमध्ये या समाजाातील लोकांना हक्क मिळण्याच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची घटना आहे.
अनन्वित छळ
पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडर लोकांचा रुढीवादी समाजाकडून अनन्वित छळ झाला आहे. या समाजाला हिजडा किंवा ख्वाजा सिरा असं म्हणतात. या समाजावर कायमच अन्याय झाला आहे. शिक्षण, नोकरी आणि आरोग्य या मूलभूत हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं.
मुघल दरबारांमध्ये हिजडे गायक, नर्तक किंवा अगदी सल्लागारपदी काम करायचे. मात्र ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी बहुतांश ट्रान्सजेंडर समाजाला गुन्हेगार ठरवण्याचा धडाका लावला. त्यांना योग्य मार्ग सोडून गेलेले, असं ठरवत ब्रिटिशांनी त्यांचे नागरी हक्क नाकारले.
उझमा याकूब या ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांसाठी लढणाऱ्या Forum for Dignity Initiative गटाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या मते ट्रान्सजेंडर लोकांना त्यांचे हक्क प्रदान करण्यात पाकिस्तानने या प्रदेशात आघाडी घेतली आहे.
राष्ट्रीय ओळखपत्रांमध्ये 'तृतीयपंथी' अशी ओळख देणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक लागतो, तेही अगदी दशकापूर्वी. आणि गेल्या वर्षीच त्यांच्या पासपोर्टमध्येही हा पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेक पाश्चिमात्य देशांतसुद्धा हा पर्याय उपलब्ध नाही.
मे महिन्यात पाकिस्तानने एक नवीन विधेयक संमत केलं, ज्यामुळे पाच लाख ट्रान्सजेंडर्सना त्यांचे मूलभूत हक्क दिले. त्यानुसार इंटरसेक्स, ट्रान्सवेस्टाइट्स (विरुद्धलिंगी व्यक्तींचे कपडे घालायला आवडतात असे लोक) आणि हिजड्यांविरुद्ध भेदभाव करण्यास पाकिस्तानात कायदेशीर बंदी घालण्यात आली.
यामुळे हा समाज सार्वजनिक आयुष्यातही तितकाच सक्रिय झाला आहे. मार्चमध्ये एका टीव्ही चॅनलने एका ट्रान्सजेंडर महिलेला निवेदक म्हणून घेतलं. तसंच मागच्या महिन्यात एका ट्रान्सजेंडर महिलेने चित्रपटात पदार्पण केलं.
हल्ली ते आम्हाला मारूनच टाकतात
परंतू पाकिस्तानमध्ये ट्रान्सजेंडर लोकांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे.
ज्या ट्रान्सजेंडर पुरुषांना जन्मत: स्त्री म्हणून ओळख मिळाली आहे त्यांच्याकडून समाजाच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत.
त्याच वेळी ट्रान्सजेंडर स्त्रियांना पुरातन काळापासून मात्र वेगळं ठेवतात. त्यांना नृत्य करण्यास, भीक मागण्यास, किंवा देहविक्रय करण्यास भाग पाडलं जातं. त्यामुळे त्यांचा छळ होतो, शारीरिक अत्याचार आणि बलात्कार होण्याचे प्रकार घडतात.
अनेक लोक अशावेळी गुरूंचा आधार शोधतात. हे गुरू विखुरलेल्या ट्रान्सजेंडर समाजाचे नेते असतात. या गुरूंची सेवा करण्याच्या बदल्यात ते त्यांना अन्न, निवारा, अशा गोष्टी देतात.
"जेव्हा तुम्ही घर सोडता तेव्हा या ट्रान्सजेंडर लोकांच्या गटात सगळ्यांत सुरक्षित वाटतं," असं मारिया खान सांगतात. "आपल्या भावंडांनी आणि शेजाऱ्यांनी छळ केल्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं. तिथे कोणी कोणाचीच नक्कल करत नाही, तुम्हाला मारत नाही, नावं ठेवत नाही, कारण सगळे तुमच्यासारखेच असतात," त्या सांगतात.
पण याच समुदायातील लोकांना वाटतं की त्यांना धोक्याचं प्रमाण वाढतंय.
"ट्रान्सजेंडर लोकांचेही आता खून होत आहेत. आधी अॅसिड हल्ले व्हायचे, मारहाण व्हायची, पण आता तर थेट आम्हाला मारून टाकतात," नायाब सांगतात.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते 60 ट्रान्सजेंडर स्त्रियांची गेल्या तीन वर्षांत हत्या झाली आहे. खैबर पखतुंख्वा भागात हे प्रकरण झालं होतं, जिथे अलीकडच्या काळापर्यंत पाकिस्तानी तालिबान्यांची उपस्थिती होती.
अलिशा ही अशीच एक स्त्री होती. या 23 वर्षांच्या कार्यकर्तीला एका स्थानिक गँगने 2016 मध्ये गोळ्या घातल्या. कोणतेही उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला, कारण रुग्णालयात तिला महिलांच्या वॉर्डमध्ये दाखल करावं की पुरुषांच्या, हेच तिथल्या कर्मचाऱ्यांना कळलं नाही.
कुटुंबीयच करतात खून
मनशेरा शहरातील मारिया यांना हा धोका चांगल्याच पद्धतीने माहिती आहे. त्या खैबर पखतुंख्वा भागातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना गुन्हे विशेषत: ऑनर किलिंगबद्दल प्रचंड चीड आहे. कुटुंबाच्या किंवा समाजाच्या कथित 'मानासाठी' होणाऱ्या या किलिंगचा इथल्या स्थानिक ट्रान्सजेंडर्सना मोठा धोका वाटतो.
"आमचा खून करण्यासाठी आमच्या कुटुंबातले लोकच सुपारी देतात," त्या सांगतात. "माझ्या घरावर झालेल्या गोळीबारातून मी कशीबशी बचावले. माझ्या घराच्या अंगणात अजूनही त्याच्या खुणा आहेत."
मारिया यांनी नुकत्याच हझारा विद्यापीठातून पदवी घेतली. निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयाला स्थानिक लोक चांगला प्रतिसाद देत आहेत, असं त्या सांगतात. त्या प्रचाराचा खर्च स्वत: करत आहेत आणि या खर्चालाही स्थानिक मदत करत आहेत.
त्यांच्या मते "याआधीच्या राजकारण्यांनी लोकांसाठी काहीही केलं नाही". त्या निवडून आल्या तर त्यांच्या भागात असलेला पाण्याचा प्रश्न त्या मार्गी लावणार आहेत.
'निवडणूक हे श्रीमंतांचं काम'
निवडणूक लढवणं सोपं आहे, पण निवडणूक जिकणं तितकंसं सोपं नाही, याची कल्पना नदीम कशिश यांना आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या दोन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्या उभ्या आहेत. माजी क्रिकेटर इम्रान खान आणि मावळत्या सरकारचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांच्याशी त्यांची थेट लढत होत आहे.
राजधानी इस्लामाबादेत असलेला त्यांचा मतदारसंघ पाकिस्तानचा सगळ्यांत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. इथेच संसद, सुप्रीम कोर्ट अशा महत्त्वाच्या संस्था आहेत.
ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मेकअप आर्टिस्ट नदीम त्यांच्या समुदायासाठी स्वत:चा एक रेडिओ प्रोग्राम करतात.
त्यांच्या मते विधेयक संमत झालं तरी कोणत्याही राजकीय पक्षाला या प्रश्नावर काम करायचं नाही. "आमच्यासाठी काम करणं त्यांच्या अजेंड्यावर नाही. म्हणून मला संसदेत निवडून जायचं आहे."
"माझ्याकडे बॅनर, झेंडे, वाहतूक अशा गोष्टींसाठी पैसे नाही. म्हणून माझ्या रेडिओच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या पैशातून मी प्रचाराचा खर्च करत आहे," असं त्या सांगतात.
निवडणूक आयोगाने बंधनं घातल्यानंतरही पाकिस्तानचे राजकारणी निवडणूक प्रचारावर अमाप पैसा खर्च करतात.
"हा सगळा श्रीमंतांचा खेळ आहे, हे सगळ्यांना माहिती आहे," नदीम सांगतात. "माझा अर्ज भरण्यासाठीसुद्धा माझ्याकडे पैसे नाही."
पाकिस्तानचं निवडणूक आयोग निवडणूक लढवण्यासाठी 30,000 रुपये आकारतात. तसंच प्रादेशिक निवडणुक लढवण्यासाठी 20,000 रुपये भरावे लागतात.
एका अहवालानुसार आठ ट्रान्सजेंडर लोकांना पैसे नसल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता. पण नदीम पाकिस्तानच्या राजकारणाला आवाहन देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
"ही आमची वेळ आहे. ट्रान्सजेंडर लोकांच्या सहभागामुळेच पाकिस्तानची लोकशाही प्रक्रिया पूर्णत्वाला पोहोचेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)