You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऐन पाकिस्तान निवडणुकांच्या तोंडावर नवाझ शरीफ यांचं राजकीय टायमिंग चुकलं - दृष्टिकोन
- Author, वुसतुल्लाह खान
- Role, ज्येष्ठ पत्रकार, इस्लामाबाद
पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी कोर्टाने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा तर त्यांची मुलगी मरियम यांना 7 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शरीफ यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू असल्यानं शरीफसुद्धा लंडनमध्येच आहेत.
दरम्यान, पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुकांचं मतदान होत आहे. शरीफ यांच्यावर याआधीच निवडणूक लढवण्याची बंदी आहे. त्यातून ते बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानात नसल्याने त्यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ (PMLN) पक्षाच्या प्रचारावर परिणाम झाला आहे.
नवाझ शरीफ यांच्यावर ही वेळ कशी आली? आणि आता त्यांच्या समोर काय पर्याय आहेत? ज्येष्ठ पत्रकार वुसतुल्लाह खान यांनी केलेलं हे विश्लेषण.
'हमेशा देर कर देता हूं मैं हर काम करने में.'
असं वाटतं की मुनीर नियाजी यांनी ही प्रसिद्ध नज्म नवाझ शरीफ यांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिली आहे.
एकीकडे कोर्टाचं कामकाज कासवगतीने चालत असतं तर दुसरीकडे राजकारण सशासारखं उड्या घेत धावत असतं. जो ससा अतिआत्मविश्वास न दाखवता धावतो तो ही शर्यत जिंकतो. पण असं झालं असतं तर पिढ्यानपिढ्या कासव आणि सशाची गोष्ट कुणी ऐकवली असती का?
चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतला तर तो एकवेळ माफ होऊ शकतो. पण योग्य वेळी चुकीचा निर्णय घेतला तर त्याला मात्र माफी नसते.
कॉमेडी आणि राजकारण हा सगळा टायमिंगचा खेळ आहे. चुकलेली वेळ विनोदाची सगळी मजाच घालवते, अगदी तसंच नेत्याची एक दिवसाची सुस्ती त्याला अनेक वर्षांच्या अडचणीत ढकलू शकते. गाडी आणि चाकातल्या पंक्चरमध्ये जे नातं आहे, तेच राजकारण आणि सुस्ती यांच्यातही आहे.
नवाझ शरीफ यांना पहिली संधी मिळाली होती जेव्हा पनामा पेपर्स सार्वजनिक झाले होते. संसदेत पनामा प्रकरणात 'मी निर्दोष आहे आणि पनामा प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही,' असं न सांगता काय झालं असतं जर ते म्हणाले असते की, 'या पदावर मला तीन वेळा ज्यांनी निवडून दिलं त्या जनतेच्या विश्वासाचा मान राखण्यासाठी, माझ्यावर एक जरी डाग पडला तर मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मी स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच परत येईन.'
अशा दोन-चार 'जुमल्यां'नी राजकीय शेअर मार्केटमध्ये त्यांचा भाव गगनाला भिडला असता. पण असं काही झालं नाही. तर दुसरीकडे त्यांचे सहकारी त्यांचे कान भरत राहिले.
दुसरी संधी त्यांना मिळाली जेव्हा सुप्रीम कोर्टाने पनामा प्रकरणाला सुनावणीसाठी योग्य मानलं नव्हतं आणि नेत्यांना सांगितलं होतं की त्यांनी त्यांचे कपडे कोर्टाऐवजी संसदेतच धुवावेत.
त्यावेळी विरोधी पक्षानेसुद्धा संसदीय समितीच्या वतीने या प्रकरणाचा तपास करण्याची तयारी दाखवली होती. पण नवाज शरीफ यांनी एकतर्फी तपास समितीची घोषणा केली आणि विरोधी पक्षाने हे अमान्य केलं. तर विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला नवाझ शरीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फेटाळलं.
त्यानंतर माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे इम्रान खान यांनी आंदोलनाच्या इशाऱ्याने सुप्रीम कोर्टाला या प्रकरणी सुनावणी घेण्यास भाग पाडलं.
पण या प्रकरणाची तांत्रिक, कायेदशीर आणि व्यावसायिक पद्धतीने बंद खोलीत सुनावणी न होता सुप्रीम कोर्टाच्या पायथ्याशी एक समांतर न्यायालय उभारण्यात आलं. त्यातून न्यायालय समर्थक आणि न्यायालय विरोधक, असे दोन गट समोरासमोर आले आणि मीडियाच्या मेहरबानीने पनामा दलदलीसारखं पसरत गेलं.
नंतर याच दलदलीत वाद-विवाद, शिवीगाळ, तू-तू मैं-मैं यांची झाडं तरारून उगवली.
नवाझ शरीफ सांगायचे की संयुक्त तपास टीमवर (JIT) त्यांचा विश्वास नाही, पण ते JITसमोर हजर मात्र होत होते. न्यायालयाचा निर्णय मान्य केला नाही, पण सत्तेतून बेदखल झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय एका प्रकारे मान्यही केला.
भ्रष्टाचार विरोधी कोर्टावर विश्वास नाही, असं सांगत असतानाच या न्यायालयासमोर ते 100पेक्षा जास्त वेळा हजर राहिले, तर दुसरीकडे जनतेच्या कोर्टात रॅली काढून 'मला का हटवण्यात आलं?' असे प्रश्नही विचारत राहिले.
नवाझ शरीफ फक्त राजकारणी नाहीत. ते पती आणि पिताही आहेत. पण राजकीय नेत्याची परीक्षा हीच असते की त्यांनी आपल्या खासगी जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाव्यात आणि राजकारणातील टाईमिंगचा वापर करण्यासाठी आपले डोळे सतत उघडे ठेवावेत.
नवाझ शरीफ यांच्या पत्नींचं आजारपण गंभीर स्वरूपाचं असल्याने ते काय मानसिक स्थितीतून जात आहेत, याची कल्पना सर्वांनाच आहे. पण पती आणि कुटुंबप्रमुख याबरोबरीनेच ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे प्रमुखही आहेत. आणि या पक्षाचे लाखो समर्थक आहेत.
मतदान फक्त अडीच आठवड्यांवर आलं असताना एका कसलेल्या नेत्याला काय निर्णय घेतला पाहिजे?
त्यांच्या पत्नीची प्रकृती सुधारली नाही तर त्या व्हेंटिलेटवरच राहणार आहेत. त्यांच्या उशाशी बसून ते त्यांच्या पत्नीची काय मदत करू शकतात?
पण सत्यस्थिती ही आहे की निवडणूक व्हेंटिलेटवर नाही आणि ती कधीही नव्हतीच. शरीफ यांना चांगलंच माहिती होतं की न्यायालय त्यांना कसलीही सवलत देणार नाही. अशा वेळी त्यांनी काय करायला हवं होतं?
जर तुम्ही राजकारणात 35 ते 40 वर्षांपासून असाल तर टायमिंगपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असायला हवं, नाही का?
सात दिवसांनंतर जर तुम्ही रिंगणात येऊन प्रचार कराल तरी तेच होणार होतं, जे आज होतंय. उलट सात दिवसांनंतर तर प्रचाराला फक्त एक आठवडाच उरणार.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेराल्ड विल्सन एकदा म्हणाले होते की एक आठवडा खूप मोठा काळ असतो... इतका मोठा की कधी कधी तो वर्षांनुवर्षं लांबू शकतो.
हातांनी बांधलेल्या गाठी दातांनी सोडवता येणं, यालाच तर राजकारण म्हणतात. जर हे जमत नसेल तर तुम्ही आणखी एक झोप घेऊ शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)