कुलसूम नवाज यांना हाफिज सईदच्या नव्या पक्षाचं होतं आव्हान

    • Author, वुसतुल्लाह खान
    • Role, पाकिस्तानहून बीबीसीसाठी

पाकिस्तानातील पोटनिवडणुकीच्या निमित्तानं हाफिज सईदचा राजकीय प्रवेश चर्चेत आला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पायउतार व्हावे लागले. त्यांनी पदभार सोडल्यानं 120 लाहोर मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली.

शरीफ यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांनी विजय मिळवत सत्ता घरातच राहील यावर शिक्कामोर्तब केलं. कर्करोगाच्या उपचारांसाठी कुलसुम सध्या लंडनमध्ये आहेत.

मरियमकडे होती प्रचाराची धुरा

कुलसूम यांच्या अनुपस्थितीत त्यांची मुलगी मरियमनं प्रचाराची धुरा सांभाळली. या विजयासह लाहोर मतदारसंघात शरीफ यांनी आपली सद्दी कायम राखली.

पण, कुलसुम यांच्या विजयापेक्षा या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलेल्या उमेदवाराची चर्चा आहे. कारण, या अपक्ष उमेदवाराला पाठबळ आहे ते जमात-ऊद-दावाचा म्होरक्या हाफिझ सईदचं.

लाहोरमधल्या या मतदारसंघानं नवाज शरीफ यांना तीनवेळा पंतप्रधानपदाच्या खुर्चीची धुरा मिळवून दिली आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांनी तहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या उमेदवार यास्मिन रशीद यांच्यावर 15,000 मताधिक्यानं बाजी मारली.

शरीफ यांचा पक्ष मुस्लिम लीग नवाज आणि तहरीक-ए-इंसाफ यांच्यातील लढतीची चर्चा पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये आहे.

पण, हाफिज सईदच्या पाठिंब्याच्या बळावर तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारलेला उमेदवार दुर्लक्षित आहे.

मिल्ली मुस्लिम लीगचा उदय

शेख मोहम्मद याकूब यांचा प्रचार मिल्ली मुस्लिम लीगनं केला. मिल्ली मुस्लिम लीग अधिकृत राजकीय संघटना नाही.

मात्र ही संघटना जमात-उद-दावा या जहालमार्गी संघटनेचाच भाग आहे. पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडे मिल्ली मुस्लिम लीगची राजकीय पक्ष म्हणून नोंद नाही.

त्यामुळे शेख मोहम्मद याकूब अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले. मात्र त्यांच्या प्रचारासाठी मिल्ली मुस्लिम लीगनं मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला.

प्रचारात हाफीजचे पोस्टर

शेख यांच्या प्रचारसभांमध्ये हाफिज सईदचे पोस्टर झळकत होते. जहालमार्गी असल्याचा आरोप असलेल्या संघटना तसंच व्यक्तींचा उल्लेख निवडणूक प्रचारात टाळावा असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं. पण, तरीही हाफिजचा चेहरा प्रचाराचा भाग होता.

दरम्यान, जानेवारीपासून हाफिज सईद नजरकैदेत आहे. मात्र जमात-ऊद-दावा संघटनेपासून स्वतंत्र झाल्यावर मिल्ली मुस्लिम लीगनं अवघ्या दीड महिन्यात राजकारणात घेतलेली उडी जाणकारांनाही चकित करणारी आहे.

पहिल्याच प्रयत्नात तिसऱ्या क्रमांकापर्यंत वाटचाल करत मिल्ली मुस्लिम लीगनं राजकीय पंडितांनाही बुचकळ्यात टाकलं आहे.

जागतिक स्तरावर जहालवाद पसरवणाऱ्या टोळ्यांना पाकिस्ताननं रोखावं असं नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जागतिक नेत्यांनी सुनावले होते. तेव्हापासून पाकिस्तान सरकारमध्ये दोन गट पडले आहेत.

पाकिस्तानचा जहालवादी संघटनांशी संबंध नाही एवढं सांगणं जागतिक समुदायासाठी पुरेसं नाही. त्यासाठी परराष्ट्र धोरणात बदल करावा लागेल असं एका गटाचं म्हणणं आहे.

जहालवादी संघटना राजकारण्यात येण्याची संधी दिली तर त्यांना हिंसेपासून परावृत्त करण्याचा एक मार्ग दिला आहे असं जगाला सांगता येईल अशी दुसऱ्या गटाची भूमिका आहे.

मात्र, जहालवादी संघटना राजकीय कामकाजात आपल्या हिंसक विचारांनुसार काम करण्याची शक्यता आहे. असं झालं तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्यानं जागतिक स्तरावरील नेते चिंतित आहेत.

मुंबई हल्ल्याचा आरोप असलेला हाफिज सईद राजकारणात सक्रिय झाल्यास तो त्याची विचारधारा सोडणार नाही असं राजकीय विश्लेषक खालिद अहमद यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय बंदी

हाफिजचा राजकीय प्रवेश झाल्यास पाकिस्तानची सूत्रं हिंसक विचारांची संघटना किंवा व्यक्तीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यांना रोखणं अवघड होऊ शकतं.

कारण त्यांना निवडणुकीत जनाधार मिळालेला असेल, जो नाकारता येणार नाही. त्यांना राजकारण्यात येऊ देण्याचा निर्णय बुमरँगप्रमाणे उलटू शकतो. आंतरराष्ट्रीय समूहातर्फे बंदीच्या भीतीपोटी दुसरं संकट ओढवून घेण्याची शक्यता आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)