You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्रान खान यांनी घेतली पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून शपथ
माजी क्रिक्रेटपटू आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांची पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शुक्रवारी संसदेत झालेल्या मतदानात त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.
जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. दोन दशकं राजकारण केल्यानंतर त्यांच्या पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तेच पाकिस्तानचे पंतप्रधान होतील अशी शक्यता त्याच वेळी वर्तवण्यात आली होती.
शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपलं मताधिक्य संसदेत दाखवलं. खान यांना 176 मतं मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मतं मिळाली.
या शपथविधीसाठी सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्धू, कपिल देव यांच्यासह अनेक मान्यवरांना पाकिस्तानला निमंत्रित केलं होतं.
त्यापैकी सिद्धू या सोहळ्यास उपस्थित होते.
तत्पूर्वी, जर पंतप्रधान म्हणून आपली निवड झाली तर आपण आर्थिक सुधारणांवर लक्ष देऊ, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
इम्रान खान यांनी कॅप्टन म्हणून 1992 साली पाकिस्तानला क्रिकेट वर्ल्डकप जिंकवून दिला होता. पाकिस्तानचा सगळ्यांत यशस्वी कॅप्टन म्हणूनही त्यांची ओळख आहे.
इम्रान यांनी 1996 मध्ये PTI पक्ष स्थापन केला आणि राजकारणात प्रवेश केला. पण त्यांना राजकारणात दखल घेण्याजोगं यश संपादन करण्यासाठी 2013 साल उजाडावं लागलं. त्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये PTI तिसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला.
पहिले दोन पक्ष होते - पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ शरीफ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP).
असं नेहमीचं म्हटलं जातं की, इम्रान यांना पाकिस्तानी लष्कराचा छुपा पाठिंबा आहे. त्यांचे राजकीय विरोधक त्यांना कायम लष्कराचा 'लाडका' म्हणून संबोधतात. पण इम्रान यांनी आपल्या पार्टीच्या लोकप्रियतेमागे लष्कराचा काहीही हात नाही, असं स्पष्ट केलं आहे.
लष्कराने आपल्या पक्षाला 2018 निवडणुकांसाठी मैदान खुलं करून दिलं, या आरोपांचाही त्यांनी इन्कार केला आहे.
रंगीत संगीत जीवनशैली
पूर्णवेळ राजकारणात येण्याआधी इम्रान खान यांच्या UKमधल्या रंगीत-संगीत जीवनशैलीची पाकिस्तानात खूप चर्चा होत होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय माध्यमांनी खूप रस दाखवला.
त्यांनी तीन लग्न केली आणि त्यांचीही चर्चा झाली.
आता मात्र त्यांच्याकडे PTIचाच नव्हे तर एक धार्मिक नेता म्हणूनही पाहिलं जातं. इम्रान खान त्यांच्या दानधर्मासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या आईच्या नावे एक मोफत कॅन्सर हॉस्पिटल उभारलं आहे. त्यांच्या आईचा मृत्यू याच रोगाने झाला.
महत्त्वाच्या मुद्द्यांवर इम्रान यांची भूमिका
- भ्रष्टाचाराविरोधात लढा हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता.
- इम्रान खान आधी विरोधीपक्ष नेते होते. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या परिवाराने केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करणाऱ्यांपैकी एक इम्रान खान होते.
- जुलै महिन्यात शरीफ यांच्या विरोधात निकाल आला आणि त्यांना कैदेची शिक्षा झाली. याचाही इम्रान यांनी आपल्या प्रचारात पुरेपूर वापर करून घेतला.
- राजकारणातल्या घराणेशाहीवरही इम्रान खान यांनी खूप टीका केली आहे. त्यांच्यामते ही घराणेशाहीच पाकिस्तानमधल्या नाकर्त्या सरकारला आणि कमजोर प्रशासनाला जबाबदार आहे.
- पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराची महत्त्वाची भूमिका आहे, ही बाब त्यांना मान्य आहे. चांगलं सरकारच नागरी आणि लष्करी नेत्यांमधले संवेदनशील संबंध व्यवस्थितपणे हाताळू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)