...म्हणून इम्रान खान यांनी मोदींना शपथविधीला बोलावलं नाही

    • Author, वुसतुल्लाह खान
    • Role, वरिष्ठ पत्रकार, पाकिस्तानातून बीबीसीसाठी

तुम्हाला तर अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद यादव, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे वेगवेगळे बघावे लागतात. पण, या सगळ्या भूमिका वठवणारा एकच माणूस आम्हाला भेटला आहे. या भाग्यवान माणसांचं नाव मला घ्यावसं वाटतंय, पण सध्याच्या म्हातारपणात सोशल मीडियावर शिव्या खायची माझी हिंमत होत नाही.

एक आठवड्यापूर्वी इम्रान खान यांच्या पक्षाचे प्रवक्ते फव्वाद चौधरी यांनी एक वक्तव्य करून हवेत बार उडवून दिला होता. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान मोकळ्या मैदानात शपथ घेतील आणि त्यासाठी सार्क देशांच्या नेत्यांना बोलवण्यात येईल. इम्रान खान यांच्या क्रिकेट आणि फिल्म क्षेत्रातल्या मित्रांना यासाठी आमंत्रण दिलं जाईल. लाखो लोकांप्रमाणे माझ्या आनंदालाही पारावार उरला नाही.

शपथविधीचा फोटो कसा भन्नाट असेल, याचाच मी विचार करू लागलो. पहिल्या रांगेतल्या खुर्च्यांमध्ये पाकिस्तानचे सरन्यायाधीश साकिब निसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुनिल गावस्कर, जनरल बाजवा, आमिर खान, हसीना वाजिद, नवोज्योत सिंह सिद्धू, अशरफ घनी, कपिल देव आणि कपिल शर्मा बसले असतील.

पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या एका नेत्यानं असंही बोलावून दाखवलं की, सलमान खान, शाहरुख खान आणि झिनत अमान सुद्धा येण्यासाठी तयार आहेत.

पण, इम्रान खान यांनी दुसऱ्याच दिवशी शपथिवधी खूपच साध्या पद्धतीनं होणार असून चहासह सुका मेवा आणि बत्तासे वाटले जातील असं सांगितलं. यामुळे आमच्या सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडलं.

'मोदींच्या नावामुळे सगळं बिघडलं'

मला वाटतं पाहुण्यांना बोलावण्याचा सगळा खेळ हा फक्त मोदींच्या नावामुळे बिघडला. कारण, मोदींना आमंत्रण दिलं आणि त्यांनी नकार दिला तर काय होईल, हा विचार केला गेला असावा.

जर, ते खरंच आले आणि काही टीव्ही चॅनलनी खोडसाळपणा केला तर... या चॅनलनी इम्रान खान यांची जुनी वक्तव्य परत चालवली तर, नवाज-मोदी मित्र आहेत, मग मोदीच्या मैत्रीला द्या धक्का.

माझ्या मते पाकिस्तानने एक मास्टरस्ट्रोक वाया घालवला आहे. समजा मोदींनी न येण्यासाठी खोटी कारणं सांगितली असती, तर हृदय मोठं ठेवलं म्हणून पाकिस्तानची वाह-वाह झाली असती. मोदी यांच्याबद्दल सांगितलं जातं की, त्यांची छाती छप्पन इंचाची जरी असली तरी हृदय अजून बचपनचं म्हणजे लहान मुलासारखं आहे.

जर, मोदी आले असते तर अडीच वर्षांपासून दोन्ही देशांच्या संबंधांवर जमलेली धूळ थोडी फार तरी झटकली गेली असती. हे दोन्ही नेते एकमेकांना यापूर्वी भेटले होते आणि आताच्या भेटीतही त्यांनी एकमेकांना पारखून घेतलं असतं.

दोन्ही प्रकरणांमध्ये पाकिस्तानचं नुकसान झालं नसतं, उलट त्यांची प्रतिमाच सुधारली असती.

या बहाण्यानं इम्रान खान यांचे जुने क्रिकेटपटू मित्र आणि बॉलीवूडमधले सुपरस्टारही येऊ शकले असते. यामुळे पाकिस्तानची प्रतिमा चांगली झाली असती आणि भारतात ज्याप्रमाणे पाकिस्तानला असा-तसा देश समजतो, त्या प्रतिमेलाही तडा जायला मदत झाली असती. कारण, भारत पाकिस्तानची हीच प्रतिमा जगात विकण्याचा प्रयत्न करतो.

पण, पाकिस्तानच्या हातातून असं करण्याची संधी आता हुकली आहे. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच सगळं शक्य आहे. तोपर्यंत आशा करुयात की, इम्रान सरकार सुद्धा टिकलं असेल. तसंच, हे सरकार शिकलं असेल की, 'आधी विचार करा, मग बोला ना की आधी बोला मग विचार करा.'

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)