You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवाझ शरीफ आणि मरियम यांच्या सुटकेचे कोर्टाने दिले आदेश
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना झालेली शिक्षा कोर्टानं स्थगित केली आहे. त्यांची लवकरच सुटका होईल.
भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरल्याने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर मरियम यांना सात वर्षांची शिक्षा झाली होती.
या शिक्षेला त्यांनी आव्हान दिले होते. त्यावर कोर्टांनं दोघांचीही शिक्षा स्थगित करण्याचा आदेश दिला.
पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांच्या आधी, दोन महिन्यांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती.
गेल्याच आठवड्यात शरीफ यांची पत्नी कुलसून नवाझ यांचं लंडनमध्ये कर्करोगानं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नवाझ शरीफ आणि मरियम यांना काही दिवस त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. ते पुन्हा तुरुंगात परतले होते.
इस्लामाबादच्या भ्रष्टाचार विरोधी कोर्टाचे न्यायाधीश महमूद बशीर यांच्या न्यायालयात साडेनऊ महिने चाललेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीनंतर जुलै महिन्यात नवाझ शरीफ आणि मरियम यांना शिक्षा सुनावली होती.
बुधवारी नेमकं काय घडलं?
नवाझ शरीफ, मरियम आणि सफदर अवान यांना इस्लामाबादच्या भ्रष्टाचार विरोधी कोर्टानं शिक्षा सुनावली होती. त्यावर कोर्टानं आता स्थगिती दिली आहे.
"त्या मालमत्ता नवाझ शरीफ यांच्या आहेत हे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला यश आलेलं नाही. मरियम यांनाही त्याच आरोपपत्रानुसार शिक्षा सुनावण्यात आली हेही सिद्ध करता आलेलं नाही," असं न्यायमूर्ती अथार मिनाल्हा यांनी सुनावणीत स्पष्ट केलं.
त्याचं हे प्रकरण आता वरिष्ठ कोर्टात अपिलात आहे. त्याच्या सुनावणीची तारिख ठरलेली नाही. अर्थात, आज देण्यात आलेल्या निर्णयावरही अपील केलं जाऊ शकतं.
शरीफ यांची लवकरच जामिनावर सुटका होणे अपेक्षित आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)