You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जॅक मा नेमके कोण आहेत?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
1999 सालची ही गोष्ट आहे. चीनच्या हांगझो या शहरात एका तरुणाने शिक्षकाची नोकरी सोडली. काही मित्रांनासोबत घेत स्वतःच्या फ्लॅटमध्ये ईकॉमर्स कंपनीची स्थापना केली. आता 19 वर्षांनंतर ही कंपनी जगातील अग्रगण्य कंपनी बनली आहे. आणि या कंपनीचे CEO चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक.
या व्यक्तीचं नाव आहे जॅक मा. आणि या कंपनीचं नाव आहे अलीबाबा.
सध्या ते चीनमधून गायब असल्याची चर्चा वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. बीबीसी या वृत्ताची पुष्टी करत नाही.
कोण आहेत जॅक मा?
सर्वसाधारण घरातून आलेल्या जॅक मा यांची आजची संपत्ती 36.6 अब्ज डॉलर इतकी आहे. तर कंपनीचं मूल्य 400 अब्ज डॉलर इतकं आहे. 54 वयाचे जॅक मा म्हणाले, "जग फार मोठं आहे. आणि मी अजूनही तरुण आहे. म्हणून मला नवीन काही करायची इच्छा आहे." बिल गेट्स यांची त्यांनी आदराने उल्लेख केला. ते म्हणाले, "मी सर्वांत श्रीमंत होऊ शकत नाही. पण मी लवकर निवृत्त होऊ शकतो. शिक्षण हे क्षेत्र असं आहे जिथं मी सीईओपेक्षाही जास्त चांगलं काम करू शकतो." निवृत्ती म्हणजे शेवट नसून सुरुवात आहे, असं ते म्हणाले.
चीनमधल्या हाँगझोयू प्रांतात जन्मलेल्या या तरुणाच्या घरचं वातावरण अगदीच सर्वसाधारण. आईवडील पारंपरिक कला लोकांना शिकवून उदरनिर्वाह करत. मोठा भाऊ, लहान बहीण आणि स्वत: हे त्याच्या घरचे होते. कम्युनिस्टांचा गड असलेल्या चीनमध्ये या तरुणाचं बालपण गेलं. स्वदेशीचा मंत्र जपणाऱ्या चीनमध्ये या तरुणाने इंग्रजी विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण पूर्ण करा आणि कामाला लागा, हा कोणत्याही मध्यमवर्गीय घरातला शिरस्ता या तरुणाला पाळणे क्रमप्राप्त होतं. मात्र व्यवहार्य काम येण्यासाठी डिग्री पुरेशी नाही याचा चटका देणारा अनुभव या तरुणाने घेतला.
अनेक नकार पचवत करिअर
झणझणीत चिकनची चेन असलेल्या केएफसीपासून दर्जेदार अध्यापनाचं केंद्र असलेल्या हॉवर्ड अशा सगळीकडून त्या तरुणाने नकार झेलले. कर्तेपणाची झूल अंगावर पडलेल्या या तरुणाने पोलीस भरतीचा पर्यायही चाचपडून पाहिला. पोलिसांनी त्याला थेटच नाकारलं. काही ठिकाणी तुमची अंगकाठी कमकुवत असा शेरा देत नाकारलं. असंख्य नकार पचवलेल्या या तरुणाला इंग्रजीचा शिक्षक म्हणून हाँगझोयू टिचर्स कॉलेजमध्ये नोकरी मिळाली.
हा जॉब करता करता या तरुणाने हैबो ट्रान्सलेशन एजन्सी नावाचा उपक्रम सुरू केला. इंग्रजी भाषांतर आणि दुभाष्याचं कामही तो करून देत असे.
1995मध्ये हा उमदा तरुण अमेरिकेच्या दिशेने रवाना झाला. हा तरुण कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठातून डिग्री घेऊन बाहेर पडलेला इंजिनियर नव्हता. त्याचं गणितही कच्चं होतं. शालेय वर्षांमध्ये दोनदा नापास होण्याची नामुष्की या तरुणावर ओढवली होती. मात्र या तरुणाला वाघिणीचं दूध अर्थात इंग्रजी भाषेचं ज्ञान होतं. झेजिआंग सरकारचं एक कर्ज फिटतं का याची चाचपणी करण्यासाठी या तरुणाला पाठवण्यात आलं होतं. या दौऱ्यात कर्जाचं काम झालं नाही मात्र एका या तरुणाची एका अद्भुत विश्वाशी ओळख झाली. हे जग होतं इंटरनेटचं. याच इंटरनेटवर त्याने चीनविषयी शोधलं पण हाती काहीच लागलं नाही. चीनची माहिती देणारी एखादी व्यवस्था उभी करावी असं या तरुणाच्या डोक्यात आलं. या तरुणाने हा विचार सिअटलमधल्या आपल्या मित्राला बोलून दाखवला. त्या दोघांच्या चर्चेतून chinapages.com या वेबसाईटची निर्मिती झाली.
वेबसाईट तयार झाली, लोकांना आवडू लागली, उपयोगी पडू लागली मात्र या माध्यमातून म्हणावं तसा पैसा मात्र तिजोरीत येत नव्हता. वर्षभरात सरकारच्या झेजिआंग टेलिकॉम कंपनीने या नवख्या कंपनीला ताब्यात घेतलं. हा तरुण बीजिंगला परतला आणि त्याने परराष्ट्र व्यवहार आणि आर्थिक सहकार्य खात्यात नोकरी स्वीकारली. सरकारच्या विविध आस्थापनांच्या वेबसाईट निर्मितीचं काम त्याने हाती घेतलं. लालफितीच्या कारभारात या तरुणाचं मन रमलं नाही आणि 1999 मध्ये त्याने चक्क सरकारी नोकरी सोडली. या तरुणाने उचल खाल्ली आणि पुन्हा एक कंपनी सुरू केली.
अलीबाबा नाव कसं सुचलं?
कंपनीचं नावही मोठं अनोखं- अलीबाबा.
'अलीबाबा आणि चाळीस चोर' ही इसापनीती, पंचतंत्र धर्तीवरच्या गोष्टीतल्या पात्राचं नाव कंपनीला देण्याची कहाणीही सुरस आहे. साम्यवाद्यांचा बालेकिल्ल्यात आयुष्य जाऊनही जॅक यांना अलीबाबाच्या गोष्टी ठाऊक होत्या. सर्वसामान्य माणसाला अपील होईल असं नाव कंपनीला द्यायचं होतं. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरातल्या कॉफी शॉपमध्ये बसल्या बसल्या त्यांनी तिथल्या सेविकेला अलीबाबा नाव ठाऊक आहे का असं विचारलं. तिने होकार दिला. हा शब्द ऐकल्यावर तुझ्या डोळ्यासमोर काय उभं राहतं असं विचारल्यावर ती ओपन सेसमी अर्थात खुल जा सिम सिम असं उत्तर तिने दिलं. या उत्तराने आश्चयर्चचकित झालेल्या जॅक यांनी परिसरातल्या अनेक अनोळखी माणसांना हा प्रश्न विचारला. अनेकांनी होकारार्थी उत्तर दिलं. अलीबाबा उदार, हुशार आणि लोकांसाठी काम करणारा व्यापारी होता. आपल्यालाही असंच काम करायचं आहे हे डोक्यात असलेल्या जॅक यांनी कंपनीसाठी अलीबाबा नाव निश्चित केलं. चीनमध्ये याचा उच्चार अ ली बा बा असा तुटकपणे करतात.
17 मित्रांच्या साथीने अलीबाबाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. ईकॉमर्सची संधी देणारं ते पहिलंच व्यासपीठ होतं. कॉर्पोरेट क्षेत्रात B2B अर्थात बिझनेस टू बिझनेस व्यवहारांचं माध्यम म्हणून ही वेबसाईट आकारास आली होती. सर्वस्वी अनोखी संकल्पना राबवणाऱ्या अलीबाबाची तीन वर्षं तळ्यात मळ्यात अशी गेली. एकाक्षणी या कंपनीवर दिवाळखोरीची टांगती तलवार होती. मात्र जागतिक बाजारपेठेतेल्या तेजीने अलीबाबाचं नशीब बदललं. यानंतरची अलीबाबाची वाटचाल अचंबित करणारी आहे.
जगभरातल्या बड्या उद्योगसमूहांनी अलीबाबाची दखल घेतली आणि कंपनीने बाळसं धरलं.
अलीबाबाची गरूड भरारी
2005मध्ये अलीबाबाने 'याहू' या इंटरनेट विश्वातल्या कंपनीशी हातमिळवणी केली. 'याहू'ने अलीबाबा कंपनीत 40 टक्के भागीदारी मिळवली.
अवघ्या दहा वर्षात अलीबाबाने अमेरिकेतल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये आयपीओद्वारे पदार्पण केलं. यातून 21.8 बिलिअन अमेरिकन डॉलर्स पैसा उभा राहिला. अमेरिकेच्या इतिहासात पदार्पणाच्या आयपीओने केलेली ही सर्वाधिक मिळकत होती.
आजच्या घडीला 240 देशांमध्ये पाय रोवलेल्या अलीबाबा कंपनीचे 79 दशलक्ष सभासद आहेत.
अलीबाबा डॉट कॉम, टाओबाओ मार्केटप्लेस, टीमॉल, ईटाओ, अलीबाबा क्लाऊड कम्प्युटिंग, जुहूआसुसान, 1688 डॉट कॉम, अलीएक्स्प्रेस डॉट कॉम आणि अली पे अशा नऊ कंपन्या आहेत.
2012मध्ये अलिबाबाचा आर्थिक पसारा ट्रिलिअन युआनपल्याड गेला आहे.
जॅक यांच्या गगनभरारीचं रहस्य त्यांच्या विचारप्रक्रियेत आहे. इंटरनेट या माध्यमाची ताकद त्यांनी इतरांआधी ओळखली. स्वत: तंत्रज्ञान किंवा व्यापाराचे जाणकार नसतानाही त्यांनी खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आणलं. कंपनीच्या कक्षा रुंदावताना अनेक छोट्या कंपन्यांना हाताशी घेतलं. केवळ एका वस्तू किंवा सेवेपुरतं मर्यादित न राहता बहुढंगी होण्याचा जॅक यांचा विचार पूर्ण विचाराअंती झाला होता.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी निश्चलनीकरणाची घोषणा केली. या घोषणेनंतर रोख पैशाचा दुष्काळ झाला आणि ईवॉलेट कंपन्यांचं उखळ पांढरं झालं. पेटीएम या कंपनीने जोरदार मुसंडी मारत आगेकूच केली. या पेटीएमला अलीबाबाचं पाठबळ आहे.
गेल्या वर्षी कंपनीच्या 18व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित पार्टीमध्ये जॅक यांनी मायकेल जॅक्सनप्रमाणे नृत्य सादर केलं होतं. काळे कपडे आणि बाईकवर बसून आलेल्या जॅक यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी द लायन किंग साऊंडट्रॅकवर नृत्य सादर केलं होतं. आशियातील तिसरी श्रीमंत व्यक्ती असलेल्या जॅक 38.8 बिलिअन अमेरिकन डॉलर्स एवढ्या प्रचंड संपत्तीचे मालक आहेत.
राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असंख्य पुरस्कार पोतडीत असणाऱ्या जॅक यांच्या नावावर उत्तुंग आर्थिक कमाईचे विक्रमही नावावर आहेत. निखर्वपती बटूमुर्ती असलेले जॅक यांनी 54व्या वर्षी निवृत्त घेत मूळ कामाकडे म्हणजे शिक्षण क्षेत्रात जाण्याचं पक्कं केलं आहे. संपत्तीसंचय करणाऱ्या या धनाढ्याची नाळ अजूनही शिक्षणासारख्या मूलभूत विषयाशी जोडलेली आहे हे चीनसाठी आश्वासक चित्र आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)