भारतीय मुलींना चिनी नवरा का नको असतो?

    • Author, तिलक झा
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग

भारतीय महिला चिनी पुरुषांशी का लग्न करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर चीनमधले इंटरनेट युजर्स शोधत आहेत.

चीनमध्ये Quoraसारखीच एक प्रश्न उत्तरांची वेबसाईट आहे, तिचं नाव आहे Zhihu. या साईटवर हा प्रश्न विचारण्यात आला आहे.

हा प्रश्न एक वर्षांपूर्वी विचारण्यात आला होता पण आता हा थ्रेड पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जण भारतीय महिला चिनी नवरा का स्वीकारत नाहीत या प्रश्नावर स्वतःचा अंदाज व्यक्त करत आहेत.

Zhihu.com हा प्रश्न आतापर्यंत 12लाख वेळा पाहिला गेला आहे.

दोन्ही देशांत लिंगगुणोत्तर बिघडलेलं असल्यानं लग्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज इतकी असून पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत 3 कोटी 40 लाख इतकी जास्त आहे.

चीनमध्ये अनेक वर्षं राबवण्यात आलेल्या एक मुल धोरणाची ही परिणती असल्याचं म्हटलं जातं. तर भारतात महिलांच्या तुलनेत 3 कोटी 70 लाख पुरुष जास्त आहेत.

'मला उत्सुक्ता आहे'

भारतात हुंड्यावर बंदी आहे. पण भारतात वधूचे पालक वराच्या कुटुंबाला दागिने, रोख रक्कम आणि इतर महागड्या वस्तू भेट म्हणून देत असतात. तर चीनमध्ये वधूला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.

चीनमध्ये साखरपुड्याच्या गिफ्टची सधारण किंमत 1 लाख युआन इतकी असते, असं Zhihuवर म्हटलं आहे. एक युआनची किंमत 10 रुपये आहे.

Zhihuनं एका मोठ्या उत्तरात म्हटलं आहे की, "ही रक्कम म्हणजे भारतातील एखाद्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या उत्पन्ना इतकी आहे. त्यामुळे मुलीचं लग्न व्हावं यासाठी पैसे देण्यापेक्षा भारतीय पालकांनी चिनी मुलांशी आपल्या मुलींचं लग्न लावून दिलं तर त्यांना जास्त पैस मिळतील."

"चीनमधली गावं भारतीय गावांपेक्षा चांगली आहेत. जर कुणी शहरी चिनी व्यक्तीशी लग्न केलं तर जीवनशैलीत होणारा बदल मोठा असतो. चीन आणि भारतीय शहरांतील जीवनमान यामध्ये मोठा फरक आहे. भारतापेक्षा चीनमध्ये महिलांना उच्च दर्जा आहे. त्यामुळे भारतीय महिला चिनी पुरुषांशी लग्न करण्याचं प्रमाण कमी का आहे, याबद्दल आश्चर्य वाटतं, तर दुसरीकडे व्हिएतनाम, बर्मा, युक्रेन अशा देशांतील महिलांनी चिनी पुरुषांशी लग्न केल्याची उदाहरण बरीच आहेत," असंही एका उत्तरात लिहिण्यात आलं आहे.

दोन्ही देशांत सांस्कृतिक आदानप्रदान वाढत आहे, परंतु भारतीय महिलांनी चिनी पुरुषांशी लग्न करणं अजूनही दुर्मीळ मानलं जातं.

उदाहरणात चीनमधील मेसेंजिंग अॅप वुईचॅटवर असलेल्या 200 भारतीय-चिनी जोडप्यांत फक्त एका भारतीय महिलेनं चिनी पुरुषाशी लग्न केलं आहे, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं मार्च महिन्यात छापलं होतं.

'फक्त पैशांसाठी लग्न होत नाहीत'

या प्रश्नाखाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये हुंडा हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. काही युजर्सनी हुंडा प्रथेवर प्रश्न उभे केले आहेत. ते म्हणतात वधू निवडताना हुंडा किती मिळणार हे पाहिलं जातं. हुंडा फार मोठा असू शकतो आणि तो मृत्यूलाही कारणीभूत ठरल्याची उदाहरणं आहेत.

तर काही प्रतिक्रियांमध्ये भारतात हुंडा प्रथा थेट नसल्याचं म्हटलं आहे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मुलीवर असणारं प्रेम दाखवण्यासाठी हा पैसा खर्च करत असल्याचं म्हटलं आहे.

बीजिंग विद्यापीठातले हे वुई यांनी या थ्रेडमधल्या भाषेवर टीका केली आहे. ते म्हणतात लग्न हा काही फक्त पैशांचा विषय नसतो.

चीनमध्ये प्रचंड चाललेल्या दंगल या सिनेमातल्या स्त्री पात्रांची तुलना त्यांनी भारतीय महिलांशी केली आहे.

ते लिहितात, "भारतातल्या शहरी मध्यवर्गीय इंग्रजी बोलणाऱ्या मुली या चीनमधल्या महिलांशी वेगळ्या नाहीत. त्या मुक्त विचारांच्या, चिंतामुक्त आणि परदेशी व्यक्तीशी लग्न करायला तयार असतात. जर तुम्हाला भारतीय बायको हवी असेल तर तुम्ही त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य आणि प्रेम करणारं कुटुंब दिलं पाहिजे. त्या तुमच्या 1लाख युआनसाठी लग्न करणार नाहीत."

आणखी एक युजर म्हणतो, "सीमेपलीकडे होणारी लग्न गुंतागुंतीची असतात. दोन्ही देशातल्या भौतिक सुखवस्तूंची तुलना हेच सर्वस्व नाही," या उत्तराला तब्बल 1500 युजर्सनी लाईक केलं आहे.

संधी आणि कौटुंबिक मूल्यं

काही युजर्सनी चीनच्या तुलनेत भारतात जेंडर गॅप जास्त असल्याचं म्हटलं आहे.

आणखी एक युजर फेंग कैवन्ली म्हणतात, "खऱ्या आयुष्यात फार कमी भारतीय महिलांनी चिनी पुरुषांना भेटण्याची संधी मिळते. फार कमी भारतीय महिला चिनी पुरुषांशी लग्न करतात, यामागे हे महत्त्वाचं कारण आहे."

"भारतीय पुरुष चीन आणि हाँगकाँगमधल्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांत काम करतात. पण फार कमी भारतीय महिला चीनमध्ये काम करतात. तर दुसरीकडे चिनी पुरुषांचं भारतापेक्षा आफ्रिकेत काम करण्याचं प्रमाण फार जास्त आहे. त्यामुळे चिनी पुरुष आफ्रिकन मुलींशी सर्रास लग्न करताना दिसतात."

फेंग पुढे लिहितात, भारतीय महिलांवर कौटुंबिक जबाबदारी जास्त असते. ते असंही लिहितात की चिनी पुरुषांना स्पर्धकही जास्त आहेत आणि भारतीय पुरुषांशी त्यांची तुलना होऊ शकत नाही.

आणखी एक युजर लिहितो की, भारतीय संस्कृती पुराणमतवादी आहे आणि ग्रामीण भारतातले पालक त्यांच्या मुलींची लग्न इतर जातींमध्ये करायला तयार होत नाहीत, अशा स्थितीमध्ये दुसऱ्या देशातल्या वेगळ्या वंशातल्या पुरुषाशी आपल्या मुलीचं ते लग्न कसं करू देतील.

तर काही कमेंटमध्ये भारतीय कुटुंब त्यांच्या मुलींची लग्न चिनी पुरुषाशी करण्यापेक्षा गौरवर्णीय व्यक्तीशी करणं कसं पसंद करतात, असं लिहिलं आहे.

'अधिक असहिष्णू'

काही जणांनी पाश्चत्य माध्यमांनी पूर्व आशियातील पुरुष आणि स्त्रियांची प्रतिमा नकारात्कम केली असल्याचं म्हटलं आहे.

एका महिलेनं म्हटलं आहे की, देशाचा जर आत्मविश्वास प्रबळ असेल तर तो देश सहिष्णू असतो आणि तो आपल्या महिलांना परदेशी लग्न करू देतो.

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि घटनांचे विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)