चीनच्या डोक्यात 'हम दो, हमारे तीन'चा विचार

    • Author, केरी अॅलन
    • Role, बीबीसी मॉनिटरिंगसाठी

'हम दो, हमारे दो' हे धोरण चीन लवकरच बदलणार आहे. त्यामुळे देशात दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहन मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2019 हे वर्ष Year of the Pig म्हणून ओळखलं जाणार आहे. त्यासाठी चीनमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला पोस्टाच्या स्टॅंपचं अनावरण करण्यात आलं. या स्टॅंपमधल्या चित्रामुळे, चीन हम दो, हमारे दो हे धोरण बदलणार याबद्दलच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

या स्टॅंपवरच्या चित्रात, डुकराचं एक जोडपं त्यांच्या 3 पिलांसोबत दिसत आहे.

अर्थात, एवढ्यावरून चीननं आपल्या धोरणात बदल केल्याचं म्हणणं आव्हानात्मक आहे.

दोन वर्षांपूर्वी 'एक मूल धोरण' रद्द करण्यापूर्वी चीननं Year of the Monkeyचा पोस्टेज स्टॅंप काढला होता. त्यात एक माकड 2 पिलांसोबत दाखवलं होतं, असं निरीक्षण चीनच्या सिना वीबो या मायक्रोब्लॉग साइटवर नोंदवण्यात आलं आहे.

तसंच गेल्या काही महिन्यांपासून चीनचं सरकार, नागरिकांनी एकापेक्षा अधिक अपत्यांना जन्म द्यावा यास प्रोत्साहन देत आहे. यासाठी स्थानिक अधिकारी करांमध्ये सवलत, घर आणि शिक्षणासाठी अनुदानही देण्याच्या तयारीत असतात.

हा बदल अगदी टप्प्यात आला आहे, असं चीनमधील माध्यमांचं म्हणणं आहे.

"हम दो हमारे दो, हे धोरण राष्ट्रीय प्रजनन दर प्रभावीपणे वाढवत नाही," असं काही दिवसांपूर्वी China Times या वर्तमानपत्राच्या संपादकीयात म्हटलं होतं.

आनंदी कुटुंबाची थीम

एक मूल धोरणाची सुरुवात 1979मध्ये झाली आणि 2015मध्ये ते रद्दबातल करण्यात आलं. पण, पालकांचा या धोरणाबदलाला थंड प्रतिसाद मिळाला.

एक अपत्य सांभाळणं कठीण आहे, तिथे दोन अथवा दोनपेक्षा अधिक अपत्यांचा सांभाळ कसा करणार, असा सवाल काही पालकांनी उपस्थित केला.

आनंदी कुटुंब ही या स्टँपची थीम आहे, असं China Daily या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

यातील एक डुक्कर सुखी जीवनाच्या दिशेनं निघाला आहे, तर दुसरीकडे डुक्करांचं 5 सदस्यांचं एक कुटुंब आनंदीपणे जगत आहे, असं त्यावर दाखवण्यात आलं आहे.

चीनचं नववर्ष जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सुरू होतं. येणाऱ्या नवीन वर्षाचा विचार करून सरकारही धोरणांमध्ये नवनवीन कल्पना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतं.

नवीन आलेला स्टॅंप म्हणजे सरकारनं दिलेला एक सिग्नलच आहे, असं सोशल मीडियावर हजारोंनी म्हटलं आहे.

इतिहासाला धरून लोकांच्या प्रतिक्रिया?

"1980च्या स्टॅंपमध्ये एकच माकड दाखवण्यात आलं होतं. पण 2016च्या स्टॅंपमध्ये माकडासोबत 2 पिलं दाखवण्यात आली होती आणि एक मूल धोरण रद्दबातल केल्यानंतर हा स्टॅंप प्रकाशित करण्यात आला होता, असं वीबो यूझर शेडांग मॅगे यांनी म्हटलं आहे.

देशातील जन्मदर कमी करण्यासाठी 1979मध्ये चीननं एक मूल धोरण सुरू केलं होतं. 1970मध्ये प्रति महिना 5.8 टक्के मुलांपर्यंत घसरलेला हा दर 1978मध्ये 2.7 टक्के एवढा झाला होता.

स्वेन शी यांनी नवीन स्टॅंपचा फोटो शेयर करताना म्हटलं आहे की, "मला आशा आहे की प्रत्येक जण ही बाब समजू शकतो. हे फक्त लोकांना दुसऱ्या अपत्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी नव्हे तर 3 अपत्यांसाठीही तयार राहण्यासाठी दिलेला इशारा आहे."

दरवर्षी सुमारे 25 दशलक्ष लोक बेरोजगार होतात आणि त्यांना सामाजिक सुरक्षेची गरज भासते, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

शी यांची पोस्ट 1000 वेळा शेयर करण्यात आली आणि ती चीनच्या वृद्ध महासंघानं मांडलेल्या आवाहनाचाच सूर दाखवते.

2050पर्यंत देशातल्या 1.3 अरब लोकांपैकी एक चतुर्थांशपेक्षा जास्त लोक वयाची पासष्टी पार करणार आहे, असं महासंघाचं म्हणणं आहे.

लिंग समानतेचा दर ढासळला

चीनमधील प्रजननक्षमतेचा दर हा जगात सर्वांत कमी असलेल्या देशांपैकी आहे आणि प्रति महिला 2.1 अपत्य इथपर्यंत खाली आला आहे.

एक मूल धोरणामुळे देशातील लिंग समानतेचा दरही ढासळला होता. शिवाय मुलगाच हवा, अशा मानसिकतेमुळे बळजबरीनं गर्भधारणा आणि मुलीचा गर्भातच मृत्यू असं प्रकार उघडकीस येत होते.

एका अभ्यासानुसार, चीनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या 3.3 कोटीनं अधिक आहे. पण, लोकांनी अधिक अपत्यांना जन्मास घालावं, यासाठी सरकारच्या प्रयत्नांत कोणतीही कमतरता नाही.

आपण एकपेक्षा अधिक मुलांचा सांभाळ करू शकत नाही, असं अनेकांनी वीबो या साईटवर म्हटलं आहे.

"मी सध्या तरुण आहे आणि संघर्ष करत आहे, सध्या माझी अवस्था तरंगल्यासारखी आहे," असं छेन तांग्जी यांनी म्हटलं आहे. तर "मी 3 अपत्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ आहे आणि तीन मूल धोरण अव्यवहार्य वाटतं," असं छून जिरून यांनी म्हटलं आहे.

"अधिकच्या अपत्यांसाठी सध्याची परिस्थिती फारशी अनुकूल नाही. अर्थव्यवस्था आणि लोकांची उर्जा लुप्त होत चालली आहे," असं शानशान झियाशिन यांनी म्हटलं आहे.

लोकांना अधिक अपत्यासाठी प्रोत्साहन देण्यापूर्वी शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करायला हवेत, असंही काही लोकांचं म्हणणं आहे.

"लोकांना डुकरांसारखं जीवन व्यतित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी सरकारनं शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात आणि अधिक नर्सरी सुरू कराव्यात," असं एकानं म्हटलं आहे.

तर तीन मूल धोरणामुळे महिलांच्या करिअरवर सर्वाधिक परिणाम होईल, असंही निरीक्षण एकानं नोंदवलं आहे.

धोरण लागू होणार?

"मला मोठं घर घेणं झेपणार नाही त्यामुळे ते माझ्यासाठी गरजेचं नाही. तसंच मुलाचा सांभाळ करणंही माझ्या ऐपतीबाहेर आहे म्हणून तेही माझ्यासाठी गरजेचं नाही," असं ट्रिकॅट यांनी म्हटलं आहे.

क्वालियांग केहाओ यांच्या मते, "ज्या स्त्रियांना अजून अपत्य नाही त्यांना नोकरी देण्यात टाळाटाळ होत आहे."

नवा स्टॅंप तीन मूल धोरणाचा निदर्शक नसावा, असंही शक्य असू शकतं. कारण, 2007मध्ये अशाच एका स्टॅंपमध्ये डु्कराचं जोडपं 5 पिलांसोबत दाखवलं होतं.

पण चीन हे धोरण अवलंबेल असं अनेकांना वाटतं आहे.

"पुढील वर्षापासून पूर्णपणे उदारमतवादी जन्म धोरण लागू होण्याची 90 टक्के शक्यता आहे," असं तज्ज्ञ ही यान्फू यांनी China Times ला सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)