You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एका कप कॉफीवरून चीन आणि तैवानमध्ये वादाची उकळी
कॉफीची ती जाहिरात तुम्ही ऐकलीच असेल - 'A lot can happen over a cup of coffee'. बरोबर. कॉफीच्या एका कपावरून खरंच खूप काही घडू शकतं. अगदी दोन देशांमध्ये वादावादीही होऊ शकते.
हो खरंच! लॉस एंजेलिसमधल्या एका कॉफीच्या कपावरून चीन आणि तैवानचे नागरिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
आधी या दोन्हीमधला वाद जाणून घेऊया. तैवान हे चीनच्या मुख्य भूमीपासून विभक्त असलेलं एक मोठं बेट आहे. तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानत असलं तरी चीन त्याला स्वतःचाच अविभाज्य भाग मानतं. त्यामुळे तैवानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देऊ पाहणाऱ्या कोणत्याही घटनेला, गोष्टीला किंवा संकेताला विरोध करायला चिनी लोक तुटून पडतात.
याचीच प्रचिती लॉस एंजेलिसमध्ये आली जेव्हा तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन गेल्या रविवारी तिथल्या एका बेकरीमध्ये आल्या होत्या.
85C बेकरी कॅफे नावाचा हा बेकरी ब्रँड एका तैवानी व्यक्तीच्या मालकीचा आहे. त्यामुळे साहजिकच लॉस एंजेलिसमधल्या या बेकरीच्या शाखेत जेव्हा साई आल्या तेव्हा त्यांचं जंगी स्वागत झालं.
चिनी लोकांना हे पटणारं नव्हतं. त्यांच्या मते या बेकरीने तैवानच्या स्वातंत्र्याच्या बाजूने असणाऱ्या नेत्यांचं केलेलं स्वागत अनुचित आहे.
म्हणून त्यांनी या ब्रँडच्या तैवानमधल्या शाखांवर बहिष्कार टाकण्यासाठी आंदोलन करण्यास सुरुवात केली.
मग वादावर पडदा टाकायला या बेकरीने स्वतःला तैवानच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यापासून दूर सारण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून आणखी एका नव्या वादाने जन्म घेतला. कारण तैवानी नागरिकांना बेकरीची ही भूमिका म्हणजे चीनच्या दबावाला बळी पडण्याचा प्रकार आहे, अशी वाटली.
एवढा वाद होण्याचं कारणच काय?
तैवानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा अतिशय संवेदशनशील आहे.
तैवानमध्ये 1950पासून स्वयंशासित, प्रत्यक्षात कार्यरत असलेली लोकशाही आहे. 1950 साली चीनच्या राष्ट्रवादी सरकारचा कम्युनिस्टांनी पराभव केल्यानंतर राष्ट्रवाद्यांनी तैवानमध्ये आश्रय घेतला.
चीनच्या मते तैवान या चीनचा एक प्रांत आहे आणि स्वतंत्र देश नाही. आणि जर वेळ आली तर लष्करी बळाचा वापर करून आम्ही त्याचं मुख्य भूमीच्या चीनबरोबर विलीनीकरण करू, अशीही चीनची भूमिका आहे.
त्यामुळे त्यांचा आग्रह आहे की इतर देशांनी एक तर चीनची राजनयिक संबंध ठेवावेत किंवा तैवानशी. पण दोन्ही देशांशी एकाच वेळी संबंध ठेऊ नयेत.
गेल्या काही वर्षांत चीन आपल्या दाव्याबद्दल अधिकच आग्रही झाला आहे. हा चीनच्या सार्वभौमत्त्वाशी संबंधित विषय आहे, अशी चीनची भूमिका आहे.
या बेकरीत काय घडलं?
दक्षिण अमेरिकेतील काही राष्ट्रांचे तैवानशी थेट राजनायिक संबंध आहेत. या देशांना भेटी देण्यासाठी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन अमेरिकेत आल्या होत्या. या देशांना जाण्यापूर्वी त्या लॉस एंजेलिसमध्ये थांबल्या, त्यावेळी त्यांनी 85C बेकरी कॅफे या बेकरीला भेट दिली.
तैवानमध्ये सुरू झालेल्या या बेकरी ब्रँडच्या सध्या चीन आणि अमेरिकेतही शाखा आहेत.
अध्यक्ष साई बेकरीत आल्याचा तिथल्या कर्मचाऱ्यांना मोठा आनंद झाला. साई या जरी मध्यमार्गी मानल्या जात असल्या तरी चीनच्या मुख्य भूमीत त्यांच्याकडे धोकादायक फुटीरतावादी म्हणून पाहिलं जातं.
बेकरीतील कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना काही भेट वस्तू आणि बेकरीचं मानचिन्ह देऊन त्यावर त्यांचा ऑटोग्राफही घेतला. हे फोटो नंतर साई यांच्या एका सहकाऱ्याने फेसबुकवर टाकले.
हे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच चीनच्या नागरिकांच्या त्यावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. "ही कंपनी दुतोंडी असून अशा कंपनीवर चीनने बहिष्कार टाकला पाहिजे," असं एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.
या एकूण प्रकारानंतर अनेक फूड डिलिव्हरी अॅपनी या बेकरीला त्यांच्या अॅपवरून हटवलं. या बेकरीची मूळ कंपनी असलेल्या 'गौरमे मास्टर' या कंपनीचे शेअर्स तब्बल 7.5 टक्क्यांनी घसरल्याचं ब्लूमबर्गने म्हटलं आहे. म्हणजे कंपनीला जवळपास 12 कोटी डॉलर्सचा फटका बसला आहे.
कंपनीच्या एकूण जागतिक उत्पन्नांत 50 टक्के वाटा हा चीनच्या मुख्य भूमीतील शाखांमधून येतो. त्यामुळे या कंपनीने तातडीने एक निवेदन जारी करत "कंपनीचा 1992 साली झालेल्या एकमतावर पूर्ण विश्वास" असल्याचं म्हटलं आहे.
1992 साली तैवान आणि चीनमध्ये एक मुक्त करार झाला होता, ज्यानुसार "फक्त एक आणि एकच चीन (One China) आहे", असं मानण्यात आलं होतं. पण त्याची नेमकी व्याख्या देण्यात आलेली नाही.
कंपनीने म्हटलं आहे की दोन्ही बाजूंच्या देशवासीयांच्या भावनांत फूट पाडेल, अशा कोणत्याही कृतीच्या विरोधात आमची कंपनी आहे, असं स्पष्टीकरण या कंपनीने दिलं आहे.
पण याचा फारसा उपयोग झाला नाही.
हे स्पष्टीकरण फक्त कंपनीच्या मुख्य चीनमधील वेबसाईटवर असल्याचं लक्षात आल्यावर, ही कंपनी तैवानच्या स्वातंत्र्याच्या विरोधात थेट भूमिका घेत नाही, अशी टीका चिनी नागरिकांनी केली.
तर तैवानमध्ये ही बेकरी चीनच्या दबावाला बळी पडत आहे, असा सूर उमटू लागला.
तैवानची राजधानी तैपाई इथून राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने यावर खुलासा करत चीनची वर्तणूक चुकीची असून यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जागतिक बाजार व्यवस्थेला धोका असल्याचं म्हटलं आहे.
यापूर्वी अमेरिकेतील वस्त्रोद्योगातील कंपनी 'गॅप'ला अशाच एका प्रकरणावरून माफी मागावी लागली होती. 'गॅप'ने बनवलेल्या एका टीशर्टवर चीनचा नकाशा छापण्यात आला होता. पण त्यात फक्त चीनची मुख्य भूमी दाखवण्यात आली होती, आणि चीन दावा करत असलेल्या इतर भूभागांचा समावेश नव्हता.
तर जपानची रीटेल कंपनी मुजीने पॅकेजिंगवर तैवानचा उल्लेख एक स्वतंत्र देश म्हणून केल्यामुळे चीनमध्ये या कंपनीवर दंड ठोठावण्यात आला होता.
चीनने गेल्या काही महिन्यांत हॉटेल आणि विमान कंपन्यांना तैवान हा चीनचा भाग असल्याचं दाखवण्यास सांगितलं आहे. त्यामुळेच अनेक विमान कंपन्यांच्या यादीत आता 'तैपाई - तैवान' असा उल्लेख न करता 'तैपाई, चीन' असा केलेला असतो.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)