You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीन : शी जिनपिंग 'माओंनंतरचे सर्वांत शक्तिशाली नेते'
चीनच्या सर्वकालीन महान देशप्रमुखांमध्ये दिग्गज कम्युनिस्ट नेते माओत्से तुंग यांच्याबरोबरीने आता शी जिनपिंग यांचाही समावेश झाला आहे.
चीनवर राज्य करणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीने राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विचारांना देशाच्या संविधानात समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चीनमधील सगळ्यांत महत्त्वाच्या कम्युनिस्ट पार्टी अधिवेशनात घेण्यात आलेल्या या निर्णयासह जिनपिंग यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणखी एक कार्यकाळ पक्का झाला आहे.
2012 मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासून जिनपिंग यांनी सत्तेवरची पकड घट्ट केली. म्हणूनच संविधानात शी जिनपिंगचे यांचे विचार सामील करण्यात यावेत, यावर कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये झालेल्या निवडणुकीत एकमत झाले.
पुढच्या पाच वर्षांसाठी देशाची सूत्रं कोणाच्या हाती असावीत, हे ठरवण्यासाठी हे अधिवेशन आयोजित केलं जातं, म्हणून चीनच्या राजकारणात याला फार महत्त्व आहे.
बीजिंगमध्ये झालेल्या या गुप्त परिषदेला यंदा दोन हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
काय आहेत शी जिनपिंग यांचे विचार
18 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनाच्या पूर्वार्धात जिनपिंग यांनी तीन तासांचे प्रदीर्घ भाषण केलं होतं. भाषणादरम्यान जिनपिंग यांनी नव्या युगात चीनच्या गुणवैशिष्ट्यांसह समाजवादाची संकल्पना मांडली.
कम्युनिस्ट पार्टीचे मुख्य पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी 'शी जिनपिंग विचारधारा' संविधानात समाविष्ट होईल, असे संकेत दिले होते. तेव्हाच जिनपिंग यांचं वाढतं प्रस्थ सिद्ध झालं होतं.
संविधानात जिनपिंग यांच्या विचारांचा समावेश झाल्यास कम्युनिस्ट पार्टी नियमांच्या संदर्भाविना प्रतिस्पर्धी जिनपिंग यांना आव्हान देऊ शकणार नाहीत, असं बीबीसी चीनचे संपादक कॅरी ग्रेसी यांनी सांगितलं.
कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांचे स्वत:चे विचार होते. मात्र माओत्से तुंग यांचे विचार वगळता संविधानात कोणत्याही नेत्याच्या विचारांना स्थान देण्यात आलेलं नाही. माओ आणि डेंग जियाओपिंग या दोघांच्या विचारांना घटनेत समाविष्ट करण्यात आलं आहे.
जिनपिंग यांच्या विचारांसह चीनमध्ये नव्या धाटणीचा समाजवादाचं पर्व सुरू झालं आहे. शालेय मुलं, महाविद्यालयीन विद्यार्थी, सरकारी कर्मचारी यांच्यासह नऊ कोटी कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य शी जिनपिंग यांच्या विचारांचा अभ्यास करतील.
कम्युनिस्ट पार्टीने तर या पर्वाला आधुनिक चीनचा तिसरा टप्पा म्हटलं आहे.
पहिल्या टप्प्यात माओ यांनी गृहयुद्धात अडकलेल्या चीनला बाहेर काढण्यासाठी लोकांना एकजूट केलं. जियाओपिंग यांच्या कालावधीत चीनची लोकांची एकी वाढली आणि देशाची प्रगती झाली. याच काळात अन्य देशांमध्ये चीनची प्रतिमा उंचावली.
तिसरा टप्पा जिनपिंग यांचा आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या नियमांचं उल्लंघन होत नाही, तोपर्यंत जिनपिंग यांना कुणीही आव्हान देऊ शकत नाही.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)