You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंतराळवीर व्हायचं आहे? मग हे वाचाच
- Author, रिचर्ड हॉलिंगम
- Role, बीबीबी फ्यूचर
अंतराळवीर होण्याचं स्वप्न बघणं आणि प्रत्यक्षात अंतराळात जाणं यात खूपच अंतर आहे. अंतराळवीर व्हायचं म्हणजे बुद्धिमत्तेला जोड द्यावी लागते खडतर प्रशिक्षणाची.
'नासा'नं तुमची निवड केली, म्हणजे अंतराळात प्रवेश मिळालाच असं होत नाही. कारण आरोग्य उत्तम हवं, साहसाची तयारी हवी, कोणत्याही परिस्थितीत झटपट निर्णय घेण्याची क्षमता हवी आणि जोडीला संयमही हवाच. थोडक्यात तो 'द राईट स्टफ' असावा लागतो.
'नासा'नं 1950 मध्ये पहिल्या अंतराळवीराची निवड करताना एअरफोर्समधल्या उत्कृष्ट पायलटला प्राधान्य दिलं. सोव्हिएत युनियननंही तेच केलं. सोबत त्यांनी अंतराळ प्रशिक्षणासाठी महिलांचीही निवड केली. तसंच उंचीसाठी मर्यादाही घालून दिली.
अंतराळवीराची उंची पाच फूट सहा इंचापेक्षा जास्त असू नये. जेणेकरून कॅप्सूलमध्ये त्यांना योग्य पद्धतीनं राहात येईल.
सुरुवातीच्या काळात अंतराळ सफरीसाठी वैज्ञानिक, अभियंते आणि डॉक्टर यांचीच निवड केली जायची. संशोधनासाठी मानव अंतराळात जात असल्याला आता साठ वर्षं होत आली असली तरी त्यासाठी असलेल्या अटी अजूनही त्याच आहेत.
युरोपीयन स्पेस एजन्सीतर्फे 2009 मध्ये निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांचंच उदाहरण घ्या. सहापैकी तीन जण सैन्यात पायलट होते, चौथा व्यावसायिक पायलट होता. उर्वरित दोन अंतराळवीरांच्या छंदांच्या यादीत स्कायडायव्हिंग आणि गिर्यारोहण यांचा समावेश होता.
अंतराळातल्या जीवनासाठी मानवी शरीर अद्याप तयार झालेलं नाही. पृथ्वीवर ऑक्सिजनचं आवरण असतं. त्याशिवाय जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
पृथ्वीपासून दूरवर अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांना सतत ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. अंतराळातील कॉस्मिक रेडिएशनचा सामना त्यांना करावा लागतो. याचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. डोळे कमकुवत होतात. सतत मळमळल्यासारखं वाटतं. शून्य गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून प्रतिकारशक्ती कमी होते.
युरोपीयन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर लुका पॅरामिटानो हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये साडेपाच महिने राहिले आहेत. ते म्हणतात, "तुम्हाला हे बदल जाणवू लागतात. जसजसे दिवस उलटतात, तुमचा चेहरा गोल दिसायला लागतो आणि पाय बारीक होत जातात. तुमचं शरीर हळूहळू त्याला सरावतं."
"सुरुवातीला तुम्ही एकाच दिशेनं आडवं चालता. इतर वस्तूंना धडकण्याची भीती तुम्हाला असते. सहा आठवड्यानंतर सरळ चालण्याचा सराव होतो. स्पेस स्टेशनची ओळख व्हायला लागते," त्यांनी माहिती दिली.
"अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यानं अंतराळवीर तरंगत असतात. त्यामुळे पायांची हालचाल कमी व्हायला लागते," पॅरामिटानो सांगतात. "मी ते कापू शकत नाही. पण हेच पाय जर अतिरिक्त हात झाले तर. एकानं आधार घेता येईल आणि दुसऱ्यानं काम करता येईल."
अंतराळवीर व्हॅलरी पॉलीयाकोव्ह यांनी अंतराळात आतापर्यंत सर्वाधिक काळ व्यतीत केला आहे. ते 437 दिवस अंतराळात होते. अंतराळात किंवा स्पेस क्राफ्टमध्येच अंतराळवीर फिट राहू शकतील. अशी व्यवस्था करता येईल का असाही विचार केला जात आहे.
यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट आहे, त्यांना रेडिएशनपासून वाचवणं. तसंच त्याच्यासाठी लाइफ सपोर्ट सिस्टमची व्यवस्था असणंही गरजेचं आहे.
पण अंतराळात मानवाला योग्य वातावरण तयार करण्याऐवजी मनुष्यालाच अंतराळासाठी अनुकूल करता आलं तर? जसं पॅरामिटानो सुचवतात.
अनेक कार्यशाळांमध्ये अंतराळात वस्ती उभारण्याविषयी चर्चा करण्यात आली. या कार्यशाळांमध्ये अभियंते, वैज्ञानिक आणि संशोधक सहभागी झाले होते.
अमेरिकी न्यूरो सायंटिस्ट रॉबर्ट हॅम्पसन मानतात की, अंतराळात वस्ती निर्माण करणं सोप काम नाही. तसंच या कामासाठी अनेक वर्षं लागतील. तोपर्यंत अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांची जडणघडण अशी केली जावी ज्यात ते तिथल्या वातावरणात स्वतःला फिट ठेऊ शकतील.
काही प्रमाणात, आजच्या अंतराळवीरांप्रमाणे, भविष्यातील अंतराळ स्थानकांच्या संभाव्यतेच्या आधारावर दीर्घ कालावधीच्या स्पेसफ्लाइटसाठी अंतराळवीरांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. ते रेडिएशनपासून स्वतःला वाचवण्यात सक्षम असतील. त्यांची हाडं मजबूत असतील आणि प्रतिकार क्षमता असेल. ही वैशिष्ट्ये पुढील पिढीत येतील ज्यांना फक्त अंतराळातील वातावरणच माहिती असेल.
"तुम्ही जर एखादं तरुण जोडपं स्टारशीपवर वस्ती वसवण्यासाठी घेऊन गेलात तर त्यांची मुलं त्या वातावरणाशी जुळवून घेणारी होतील. पृथ्वीशी नाही," हॅम्पसन सांगतात.
अनेक पिढ्यांनंतर हा अंतराळातील मानववंश पृथ्वीवरील त्यांच्या पूर्वजांपेक्षा वेगळा असेल. पण फार फरक नसेल. त्यांना दोन हातच असतील. "उत्क्रांती खूप हळू होत असते", हॅम्पसन म्हणतात. "प्रश्न हा आहे की आम्ही उत्क्रांतीला किती चालना देऊ शकतो?"
शक्यता ही आहे की, जेव्हा आम्ही मोठ्या संख्येने पृथ्वी सोडायला सुरुवात करू, तेव्हा आम्हाला नवं वातावरण आत्मसात करावं लागेल. दुसऱ्या पृथ्वीचा शोध घेण्यापेक्षा त्या वातावरणाशी जुळवून घेणारा मानव वंश तयार झाला पाहिजे. कदाचित त्याला चार हातसुद्धा असतील.
"गुरुत्वाकर्षणाची मर्यादा नसलेल्या वातावरणात राहण्याचा विचार करणं अधिक मजेशीर आहे," पॅरामिटानो म्हणतात. "जुळी पृथ्वी सापडण्याची शक्यता कमीच आहे. असं नवीन वातावरण जिथं मनुष्य राहू शकेल ही कल्पनाच मला अधिक आकर्षक वाटते... पण फक्त मलाचं!" ते हसत सांगतात.
हा व्हीडिओ पाहिलात का?
आणखी वाचा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)