You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामसेतू खरंच रामानेच बांधला होता का?
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेतल्या एका टीव्ही कार्यक्रमाच्या प्रोमोनं भारतातल्या रामसेतूच्या राजकारणाला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे.
11 डिसेंबरला अमेरिकेतल्या एका सायन्स चॅनेलनं भारत आणि श्रीलंका यांना जोडणाऱ्या रामसेतूवरील कार्यक्रमाचा ट्विटरवर प्रोमो प्रदर्शित केला.
"रामसेतूवरील दगड आणि वाळू यांचं परीक्षण करण्यात आलं आहे. पूल बांधण्यासाठी आवश्यक असणारे दगड बाहेरून आणण्यात आले होते. तसंच 30 मैलांपेक्षा अधिक लांबीचा हा पूल मानवनिर्मित आहे," असं या प्रोमोवरून स्पष्ट होतं.
सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवण्यासाठी रामानं वानर सेनेच्या मदतीनं या सेतूची निर्मिती केली, असं रामायण या महाकाव्यात लिहिलं आहे.
भारताशिवाय दक्षिण-पूर्व आशियात रामायण खूप लोकप्रिय आहे. रामायण, त्याच्याशी संबंधित पात्र आणि त्यांच्याशी संबंधित कथा ही एक कल्पना आहे, असं एक मत आहे.
दुसरं एक मत आहे जे वरील मताला चुकीचं मानतं. सायन्स चॅनेलच्या या प्रोमोनंतर रामसेतुवर श्रद्धा असणारे लोक, नेते आणि राजकीय पक्ष या विषयावरील चर्चेत उतरले आहेत.
सेतूभोवतीचं राजकारण
भाजपनं सायन्स चॅनलच्या ट्वीटचा आधार घेत ट्वीट केलं आहे.
त्यात लिहिलं आहे की,"काँग्रेस सरकारनं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून रामसेतूचं अस्तित्व नाकारलं होतं. पण आता शास्त्रज्ञांनी भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे."
या संदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी 'जय श्रीराम' असं ट्वीट केलं आहे. तसंच भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुद्धा याचं स्वागत केलं आहे.
नेमका वाद काय?
रामसेतूबद्दलचा वाद काही नवीन नाही. 2005 साली यूपीए-1 सरकारनं 12 मीटर खोल आणि 300 मीटर रूंद सेतुसमुद्रम प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला. तेव्हापासून याबद्दलच्या वादाला सुरुवात झाली.
या प्रकल्पामुळे बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये असलेला सागरी मार्ग प्रत्यक्षात जाण्या-येण्यासाठी खुला करण्यात येणार होता. पण यासाठी रामसेतूच्या खडकांना तोडावं लागलं असतं.
"यामुळे जहाजाच्या इंधन आणि वेळेत जवळपास 36 तासांची बचत झाली असती. कारण आता जहाजांना श्रीलंकेची परिक्रमा करून जावं लागतं," असं या प्रकल्पाचे समर्थक सांगतात.
या प्रकल्पामुळे रामसेतूला नुकसान होईल, असं हिंदू संघटनांचं म्हणणं आहे.
तसंच या प्रकल्पामुळे पाल्कची खाडी आणि मुन्नारच्या खाडीमधील सागरी पर्यावरणाला नुकसान पोहचेल, असं भारत आणि श्रीलंकेतले पर्यावरणवादी मानतात.
सर्वोच्च न्यायालतील वाद
1860 साली भारतात कार्यरत असलेले ब्रिटनचे कमांडर ए. डी. टेलर यांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला होता.
2005 साली या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली तेव्हा या प्रकल्पाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. रामायणामध्ये उल्लेख केलेल्या बाबींचा शास्त्रोक्त पुरावा नाही, असं तत्कालीन काँग्रेस सरकारनं याचिकेद्वारे स्पष्ट केलं.
भारतीय पुरातत्त्व विभागानंही असंच शपथपत्र दिल्याचं काही अहवाल सांगतात. हिंदू संघटनांच्या प्रदर्शनानंतर याचिकेला मागे घेण्यात आलं.
नंतर सरकारनं कदंब रामायणाचा आधार घेत सांगितलं की, रामानं स्वत:च या पुलाला नष्ट करून टाकलं होतं. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
रामसेतूवरील सायन्स चॅनेलचा कार्यक्रम कधी प्रसारित होईल हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी, रामसेतूचे दगड 7 हजार आणि वाळू 4 हजार वर्षं जुनी असल्याचं वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेत प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाचा प्रोमो रामसेतू मानवनिर्मित असल्याकडे इशारा करतो.
पुरातत्त्व विभागाची भूमिका
प्रश्न हा आहे की, इतक्या वादानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागानं कधी यासंबंधी चौकशी केली की नाही?
ए.के. राय 2008 ते 2013 दरम्यान (डायरेक्टर मॉन्युमेंट्सच्या पदावरून निवृत्त होण्याच्या अगोदर) सेतुसमुद्रम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नोडल अधिकारी होते.
"वादामुळे यात कोणीही हात घालायचा प्रयत्न करणार नाही, कारण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही, तोवर काही होणार नाही. तसंच हे प्रकरण लोकांच्या भावना आणि परंपरांशी जोडलेलं आहे." असं ते सांगतात.
रासमेतू प्रकरणाबद्दल पुरातत्त्व विभाग ठोस भूमिका घेऊ शकतं?
यावर ए. के. राय सांगतात, "पुरातत्त्व विभागानं कधी या प्रकरणाची चौकशी केली नाही. पण असे पुरावेसुद्धा नाहीत ज्याच्या आधारावर आम्ही असं म्हणू शकू की, रामसेतू मानवनिर्मित आहे. असं करण्यासाठी नवीन संस्थांनी यात सहभागी होणं गरजेचं आहे. हो किंवा नाही असं म्हणण्यासाठी आमच्याजवळ कोणताही आधार उपलब्ध नाही."
रामेश्वरमला गेलात तर तुम्हाला तिथं भरपूर कुंड दिसतील. तिथं तुम्हाला काही लोक पाण्यात तरंगणारे दगड दाखवतील.
रामाने नाही तर कोणी बनवला?
"यात काहीच आश्चर्य नाही की, कोरल आणि सिलिका दगड जेव्हा गरम होतो तेव्हा त्यात हवा कैद होते. त्यामुळे तो हलका होतो आणि पाण्यात तरंगायला लागतो. अशा दगडांपासून हा पूल बनवला गेला," असं इतिहासकार माखनलाल सांगतात.
"1480 साली आलेल्या एका वादळामुळे या पुलाचं बरंच नुकसान झालं. त्याअगोदर भारत आणि श्रीलेकंतील लोक पायी आणि सायकलचा वापर करून या पुलावरून ये-जा करत होते." माखनलाल पुढे सांगतात.
रामने नाही तर मग कुणी हा पूल बांधला, असं ते विचारतात.
पण, त्या दाव्यांचं काय जे रामायण आणि त्यातील पात्र काल्पनिक आहेत असं म्हणतात?
यावर माखनलाल म्हणतात की, "जगात मौखिक परंपरा नावाची गोष्टही असते. तुम्ही जर प्रत्येकच गोटीचा लिखित पुरावा मागाल, तर ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हतं त्यांचं काय होईल?"
तुम्ही हे वाचलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)