You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : भर मुंबईत कसे खणतायत मेट्रोसाठी बोगदे?
- Author, रोहन टिल्लू, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
जमिनीवरून खाली नेणारा लोखंडी, निमुळता जिना, मध्येच दरडीला टेकून जाणारी तशीच चिंचोळी वाट, आजूबाजूने खाली निथळणारं भूगर्भातलं पाणी आणि खाली पसरलेलं अजस्र यंत्र... माहीमच्या नया नगर भागात चाललेलं भुयारी मेट्रोचं काम थक्क करणारं आहे.
मुंबईमध्ये सध्या एकाच वेळी अनेक मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो प्रकल्पाबद्दल मुंबईकरांच्या मनात प्रचंड कुतुहल आहे. मुंबईत होणारा हा पहिलावहिला भुयारी मेट्रो प्रकल्प आहे.
भुयारी मेट्रोचं काम कसं चालतं, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने आपल्या वेबसाईटवर काही व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत. तरीही मुंबईच्या पोटातलं हे काम कसं चालतं, याबाबत जाणून घेणं चित्तथरारक आहे.
हे काम करण्यासाठी जर्मन बनावटीची टनेल बोअरिंग मशीन मुंबईत आली आहेत. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पासाठी अशी 17 यंत्रं लागणार असून त्यापैकी सहा मुंबईत पोहोचली आहेत.
या सहा मशीनपैकी एका मशीनचं काम सुरू झालं आहे.
कुठे चाललं आहे काम?
मुंबईत भुयारी मार्ग बनवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे ते ही भुयार खोदणारी यंत्रं जमिनीखाली पोहोचवण्याचं! ही यंत्रं एकदा जमिनीखाली पोहोचली की, वरच्या वाहतुकीला कोणताही धक्का न लावता भुयार खोदण्याचं काम सुरू असतं.
मुंबई मेट्रोरेल महामंडळाने ही यंत्रं मुंबईच्या पोटात उतरवण्यासाठी सात जागा शोधून काढल्या आहेत. हा प्रकल्प सात टप्प्यांमध्ये होणार असून प्रत्येक टप्प्यात दोन किंवा तीन भुयारी यंत्रं जमिनीखाली जाणार आहेत.
या सात जागांमध्ये कुलाबा वूड्स, कफपरेड (2), आझाद मैदान (2), सायन्स म्युझिअम, वरळी (2), नया नगर माहीम (3), विद्यानगरी, कालिना (3), सहार रोड, अंधेरी (2) आणि मरोळ नाका (3) या जागांचा समावेश आहे.
त्यापैकी पहिलं यंत्र माहीम इथे रहेजा हॉस्पिटलच्या समोर नया नगर इथे जमिनीखाली जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
त्यासाठी 30 मीटर खोल गोलाकार खड्डा खणण्यात आला. हा खड्डा खणल्यानंतर बाजूची माती, ढेकळं पडू नयेत, यासाठी सिमेंटचा वापर करून भिंतींना मुलामा देण्यात आला.
काम कसं चालणार?
हे टनेल बोअरिंग मशीन साधारण 110 मीटर एवढं लांब आहे. त्यामुळे ते एकत्र खाली जाणं शक्य नाही. त्यासाठी या मशीनचे 12 भाग करण्यात आले आहेत.
यापैकी पहिला भाग नुकताच जमिनीखाली गेला असून त्या मार्फत खोदकाम सुरू करण्यात आलं आहे.
एक यंत्र दर दिवशी साधारण पाच ते आठ मीटरचं खोदकाम करतं. पण अजून हे यंत्र पूर्णपणे जोडलेलं नाही. त्यामुळे सध्या हा वेग प्रतिदिन चार ते पाच मीटर एवढंच खोदकाम करत आहे.
जसजसा या यंत्राचा पहिला भाग पुढे जाईल, तसतसे इतर भाग खाली आणून पहिल्या भागाला जोडले जाणार आहेत.
कामगारांच्या सुरक्षेचं काय?
यासाठी जमिनीखाली 20-25 कामगार एका यंत्रावर काम करत आहेत. तर हे यंत्र चालवणारा नियंत्रण कक्ष सध्या जमिनीवर आहे.
जमिनीखाली इतक्या खोलवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येक कामगाराला विशेष बूट, जॅकेट आणि हेल्मेट घालणं अनिवार्य आहे.
तसंच बोगद्यात काम करताना श्वास गुदमरू नये किंवा हवा कमी पडू नये, यासाठी एक मोठा पाइप बोगद्याबाहेर काढून तो वर जमिनीपर्यंत नेण्यात आला आहे.
या पाइपमधून बाहेरची शुद्ध हवा कायम बोगद्यात जाईल, याची काळजी घेतली जाते.
हा प्रकल्प 2021मध्ये पूर्ण करण्याची कालमर्यादा मुंबई मेट्रोरेल महामंडळाने ठरवली आहे. भुयार खणायचं हे काम पुढली दोन वर्षं चालणार आहे. या दोन वर्षांमध्ये मुंबई पोखरून 33.5 किलोमीटर एवढ्या लांबीचा भुयारी मार्ग तयार होईल.
तुम्हाला हे माहिती आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)