You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अॅडल्ट' कंटेंट : जग केव्हा पाहतं?
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
रविवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक परिपत्रक काढून कंडोमच्या जाहिराती टीव्हीवर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेदरम्यानच दाखवता येतील असं जाहीर केलं.
अॅडल्ट कंटेंट म्हणजेच फक्त प्रौढांसाठीचे कार्यक्रम अर्थात लहान मुलांच्या दृष्टीने आक्षेपार्ह मजकूर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भारतात दाखवू नये, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.
यामुळे सरकारी नियंत्रण आणि 'आक्षेपार्ह' मजकुराची व्याख्या याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली.
जगातल्या इतरही काही देशांमध्ये 'केवळ प्रौढांसाठी' असलेला मजकूर टीव्हीवर दाखवण्याबद्दल वेगवेगळे नियम आहेत. त्यावर एक नजर...
'यूके'ची वॉटरशेड
ज्या वेळेनंतर केवळ प्रौढांसाठी असलेला मजकूर टीव्हीवर दाखवण्याची परवानगी आहे त्या वेळेला 'यूके'त वॉटरशेड असं म्हणतात.
फ्री-टू-एअर चॅनल्सना लहान मुलांनी पाहू नये असा मजकूर रात्री 9 वाजेपासून ते सकाळी 5:30 वाजेपर्यंत दाखवता येतो. खाजगी चॅनल्ससाठी ही वेळ रात्री 8 ते सकाळी 6 अशी आहे.
उग्र भाषा, शिवीगाळ तसंच हिंसाचार असणाऱ्या कार्यक्रमांना हा निकष लागू होतो.
'यूके'तल्या ऑफकॉम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 74% लोक आणि 78% पालक रात्री 9ची वेळ ही योग्य वॉटरशेड असल्याचं मानतात असं दिसून आलं आहे.
सार्वजनिक माध्यम असलेल्या बीबीसीचंसुद्धा याबाबत स्वतंत्र धोरण आहे. 'यूके'तल्या सर्व बीबीसी चॅनल्सवर रात्री ९ वाजेपर्यंत दाखवले जाणारे कार्यक्रम लहान मुलांना पाहता यावेत असेच असले पाहिजेत. हे धोरण पुढे असंही म्हणतं की, "प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा उपाय म्हणून अॅडल्ट कार्यक्रम वॉटरशेड वेळेनंतर लगेचच दाखवले जाऊ नयेत."
जाहिरातदारांना सार्वजनिक संवेदनशीलतेचं भान राखतच जाहिराती कराव्या लागतात. अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स एजन्सी ही संस्था आक्षेपार्ह जाहिरातींसंदर्भातल्या तक्रारी हाताळते. जाहिरातींचा मजकूर अश्लील स्वरुपाचा असल्यास त्याबाबतची तक्रार ही संस्था हाताळेल.
अमेरिकेचे 'सेफ हार्बर'
अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने (FCC) टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात नियम घालून दिले आहेत.
FCCच्या नियमांनुसार अनुचित किंवा असभ्य मजकूर असलेला कोणताही कार्यक्रम सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत टीव्हीवर दाखवला जाऊ नये. या तासांना सेफ हार्बर अवर्स असं म्हणतात.
लैंगिक संदर्भ असणारा कोणताही मजकूर असभ्य मजकुराच्या व्याख्येत बसतो. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने असं मानलं आहे की, हा मजकूर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येतो त्यामुळे त्याच्यावर सरसकट बंदी लादता येत नसली तरी लहान मुलांचं त्यापासून रक्षण करण्यासाठी तो प्रदर्शित करण्याच्या तासांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
'असभ्य भाषे'वर सरसकट बंदी नसल्याने FCC याबाबतच्या तक्रारींचा निर्णय त्या त्या वेळी समोर असलेल्या प्रकरणाच्या संदर्भात घेत असतं.
एखादा कार्यक्रम लहान मुलांनी पाहण्यालायक आहे की नाही यावरून त्या कार्यक्रमाला मिळणारी श्रेणी किंवा ग्रेड ठरते. TV-Y ही ग्रेड लहान मुलांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांना दिली जाते तर TV-MA ही ग्रेड केवळ प्रौढांसाठी असलेल्या कार्यक्रमांना दिली जाते.
अश्लील मजकूर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही त्यामुळे तो टीव्हीवर प्रसारित करण्याची परवानगी अमेरिकेत नाही.
FCCने कंडोम किंवा इतर उत्पादनांच्या जाहिराती विशिष्ट काळात दाखवण्यावर बंदी घातलेली नाही. "प्रसारण करणाऱ्यांनी सामाजिक संवेदनशीलतेचं भान ठेवत खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवू नयेत", असं FCCचं सांगणं आहे.
चीनचे कडक नियम
टीव्हीवर काय दाखवलं जावं याबाबत चीनमध्ये कडक नियम आहेत. रेग्लुलेशन्स ऑन ब्रॉडकास्टिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन या कायद्याच्या 32व्या कलमात याबाबत विचार केलेला आहे.
अश्लीलता, अंधश्रद्धा आणि हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रसारण टीव्ही स्टेशन्सनी करू नये असं या का कलमाच्या सहाव्या परिच्छेदात म्हंटलं आहे.
या व्यतिरिक्त कार्यक्रमांना टीव्हीवर प्रसारणासाठी अनेक काटेकोर निकषांची पूर्तता करावी लागते.
कंडोम किंवा तत्सम जाहिरातींनाही इतर कार्यक्रमांसाठी असलेले सभ्यतेचे नियम लागू होतात.
ऑस्ट्रेलियातलं MA15+
ऑस्ट्रेलियात ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस अॅक्ट 1992 या कायद्यानुसार टीव्हीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठीचे निकष ठरवण्यात आले आहेत.
लहान मुलांसाठी अयोग्य ठरू शकतील असे कार्यक्रम रात्री 8:30 ते सकाळी 5 या वेळेत टीव्हीवर दाखवण्यास बंदी आहे. असे कार्यक्रम शाळेला सुटी नसेल अशा दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेतही दाखवले जाऊ शकतात. मुलं त्या वेळेत टीव्ही पाहण्याची शक्यता नगण्य असते, ही बाब ध्यानात घेऊन हे ठरवण्यात आलं आहे.
चित्रपटांना वेगवेगळ्या श्रेणीत म्हणजे ग्रेडमध्ये विभागलं जातं, त्यापैकी प्रौढांसाठी दोन विशेष श्रेणी आहेत. M ग्रेड मिळालेले चित्रपट रात्री 8:30 ते सकाळी 5 या वेळेत टीव्हीवर दाखवले जाऊ शकतात. पण MA15+ ही ग्रेड मिळालेले चित्रपट फक्त रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेतच दाखवले जाऊ शकतात.
लैंगिक आरोग्याचं महत्तव लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियात कंडोम किंवा इतर उत्पादनांच्या जाहिरातींसाठी वेगळे नियम नाहीत. या जाहिराती अति उत्तेजक किंवा उच्छृंखल स्वरुपाच्या नसल्यास त्या टीव्हीवर दाखवल्या जाऊ शकतात. अति उत्तेजक आणि आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी वेगळी यंत्रणा कार्यरत आहे.