भाजपच्या प्रचारात प्रत्येकवेळी का येतं पाकिस्तान?

गुजरातच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख केल्याने देशभरात चर्चेला उधाण आलं आहे.

गुजरात निवडणुकांसाठी काँग्रेसचे नेते सीमेपलीकडून अर्थात पाकिस्तानकडून मदत घेत असल्याचा आरोप मोदींनी केला. बनासकांठामधील पालनपूर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, "काँग्रेसचे अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत अशी पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक जनरल सरदार अरशद रफीक यांची इच्छा आहे."

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपकडून पाकिस्तानचा उल्लेख होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे.

लोकसभा निवडणुकांदरम्यान आणि सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान भाजपनं पाकिस्तानला निवडणूक प्रचाराचा भाग केलं आहे.

जाणून घेऊया केव्हा केव्हा भाजपनं प्रचार रॅलीदरम्यान पाकिस्तानचा संदर्भ जोडला आहे.

  • 9 एप्रिल 2014 रोजी भाजप नेते गिरीराज सिंह झारखंडमधल्या देवगढमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानात जावे लागेल, असं बोलले होते. ते म्हणाले होते, 'जी माणसं मोदींचा विरोध करतात ते पाकिस्तानधार्जिणे आहेत. या लोकांसाठी पाकिस्तान हीच जागा आहे. भारतात त्यांना स्थान नाही.
  • 29 ऑक्टोबर 2015 रोजी बिहार विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. रक्सौलमध्ये आयोजित रॅलीत शहा म्हणाले, "चुकून जरी बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले तर पाकिस्तानात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला जाईल. पाकिस्तानात विजयी जल्लोषाचे फटके वाजावेत असं तुम्हाला वाटतं का?"
  • 4 फेब्रुवारी 2017 रोजी मेरठमध्ये आयोजित एका रॅलीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचा संदर्भ दिला होता. भारतानं सर्जिकल स्ट्राइकसह पाकिस्तानमध्ये घुसून हिशोब चुकता केला असं त्यांनी म्हटलं होतं
  • 6 फेब्रुवारी 2017 रोजी हरिद्वारमध्ये उत्तराखंड विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या सभेत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला होता. काश्मीर अखंड भारताचा भाग आहेच, पण पाकिस्तानचं भारतात विलीनीकरण व्हावं यावर चर्चा घडायला हवी असं ते म्हणाले.
  • 24 फेब्रुवारी 2017 रोजी गोंडा येथे आयोजित सभेत पंतप्रधान मोदी यांनी कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेचं खापर पाकिस्तानवर फोडलं होतं.
  • 27 नोव्हेंबर 2017 रोजी गुजरातमधल्या कच्छ इथं झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "पाकिस्तानच्या न्यायालयानं एका दहशतवाद्याची सुटका केली आणि काँग्रेस या सुटकेचा आनंद साजरा करत आहे. याचं मला प्रचंड आश्चर्य वाटलं. याच काँग्रेसनं आपल्या सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवला नव्हता. चीनच्या राजदूताची भेट घ्यायला ते पुढे सरसावले होते."
  • 10 डिसेंबर 2017 रोजी गुजरात निवडणुकीसाठी बनासकांठा जिल्ह्यातल्या पालनपूरमध्ये आयोजित रॅलीमध्ये मोदी म्हणाले, "एकीकडे पाकिस्तानी सैन्याच्या माजी महासंचालकांना गुजरात निवडणुकीत स्वारस्य आहे, दुसरीकडे पाकिस्तानची माणसं काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित राहतात. या बैठकीनंतर लगेचच काँग्रेसचे नेते गुजरातच्या सामान्य माणसांची, इथल्या उपेक्षित गरीब वर्गाची आणि मोदींची खिल्ली उडवतात. या लोकांवर का संशय घेऊ नये?" असा सवाल मोदींनी केला होता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)