You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खेळाडू आणि बॉलिवूडमधील तारका यांच्या विवाहाची गोष्ट!
विराट कोहली-अनुष्का शर्मा
महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय क्रिकेट टीमची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेणारा विराट कोहली आणि बॉलिवूड दिवा अनुष्का शर्मा हे दोघं सोमवारी इटलीत विवाहबद्ध झाले. या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा गेली अनेक वर्षं सुरू आहे.
या दोघांनी सुरुवातीला काहीच भाष्य केलं नव्हतं. पण भारताच्या अनेक सामन्यांना अनुष्काची हजेरी, त्यांचं पार्टीत एकत्र वावरणं यावरून अनेक संकेत मिळत होते.
नंतर त्या दोघांनी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या कधी फेटाळल्याही नाहीत. आता हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. पण खेळाडू आणि बॉलिवूड तारका अशी अनेक जोडपी आपल्याकडे आहेत.
हरभजन सिंग-गीता बसरा
आपल्या 'दुसरा'नं भल्या भल्या बॅट्समनना चकवणारा हरभजन सिंग अभिनेत्री गीता बसराच्या सौंदर्यामुळे क्लीन बोल्ड झाला. क्रिकेट फॅन्सचा लाडका भज्जी त्याच्या धम्माल स्वभावासाठी ओळखला जातो.
दिल दिया है, द ट्रेन किंवा जिला गाजियाबाद अशा चित्रपटांमधून भूमिका करणाऱ्या गीता बसरा आणि हरभजन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती.
2015मध्ये दोघांनी लग्न केलं आणि या चर्चेला गोड पूर्णविराम दिला. आता या दोघांना एक मुलगीही आहे.
युवराज सिंग-हेझल कीच
भारतातल्या कोट्यवधी तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकवणारा युवराज सिंग तीन वर्षं एखाद्या मुलीची मनधरणी करत आहे आणि ती मुलगी त्याला अजिबातच भाव देत नाही, यावर तुमचा विश्वास बसेल का?
पण असं खरंच घडलं होतं. युवराजनेच दिलेल्या माहितीनुसार लंडनमध्ये ते पहिल्यांदा भेटले. त्यानंतर तीन वर्षं तो तिला भेटायचा प्रयत्न करत होता. शेवटी दोघांनाही ओळखणाऱ्या त्यांच्या एका मित्राच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली.
या दोघांनी 2015मध्ये बालीमध्ये साखरपुडा केला आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच दोघांनी लग्न केलं. चंदिगढजवळच्या एका गुरुद्वारेत लग्न झाल्यावर हेझलचं नाव आता गुरबसंत कौर असं ठेवण्यात आलं आहे.
झहीर खान-सागरिका घाटगे
घाटग्यांच्या राजघराण्यातील सागरिका लोकांसमोर आली ती 'चक दे इंडिया'मधून. त्या चित्रपटात तिनं साकारलेली प्रीती सबरवाल सगळ्यांनाच आवडली होती. त्या चित्रपटात तिचा साखरपुडा एका क्रिकेटपटूशी झाल्याचं दाखवण्यात आलं होतं.
सागरिकाच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही असा योग यायचा होता.
भारताचा माजी वेगवान बॉलर आणि आपल्या यॉर्करनं भल्याभल्यांची भंबेरी उडवणारा झहीर खान आणि सागरिका यांच्या अफेअरच्या अफवा पसरायला सुरुवात झाली आणि 'बातों बातों में' प्रेमही जुळलं.
ते दोघं पहिल्यांदा एकत्र दिसले ते युवराजच्या लग्नात! त्यानंतर यंदा एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचं लग्नही झालं.
महेश भूपति-लारा दत्ता
भारतासाठी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिलावहिला टेनिस खेळाडू महेश भूपति आणि मिस युनिव्हर्स लारा दत्ता यांच्या अफेअरची चर्चाही जोरदार रंगली होती. अखेर 16 फेब्रुवारी 2011 ला दोघांनी लग्न केलं.
चारच दिवसांनी त्यांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीनं पुन्हा एकदा लग्न केलं.
काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पावसादरम्यान लारा दत्तानं महेश भूपतिचे विंबल्डनमध्ये वापरलेले टॉवेल्स घरातलं पाणी पुसायला वापरल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाल्याचीही चर्चा होती. पण दोघांचं नातं घट्टं आहे.
मन्सुर अली खान पतौडी-शर्मिला टागोर
क्रिकेटच्या दुनियेत टायगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवाब मन्सुर अली खान पतौडी यांना बॉलिवडू अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या गालावरच्या खळीनं भुरळ घातली. या दोघांची प्रेमकथा एका सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळी नाही.
नवाब मन्सुर अली खान पतौडी यांनी शर्मिला टागोर यांचा होकार मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले. चार वर्षं पत्र-पुष्पगुच्छ पाठवून त्यांनी शर्मिला यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला.
चिरयौवनाचं वरदान घेऊन आलेल्या पॅरिससारख्या नितनितांत सुंदर शहरातल्या एका रस्त्यावर अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्यांनी शर्मिला यांना मागणी घातली आणि 1969मध्ये दोघांचं लग्न झालं.
मोहसिन खान-रिना रॉय
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी! पण प्रेमाला सीमेचं बंधन नसतं, हे रिना रॉय आणि मोहसिन खान या दोघांनी सिद्ध केलं.
रिना रॉय हिंदी चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री आणि मोहसिन खान पाकिस्तानच्या टीममधला उमदा खेळाडू! या दोघांचं लग्न झालं आणि घर सांभाळायला रिना यांनी बॉलिवूडला अलविदाही केलं.
पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लवकरच या दोघांचा घटस्फोट झाला.
मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी
'Ya... The boys played well...' विजयाचा किंवा पराभवाचा स्वीकार करताना हमखास या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करणारा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल संगीता बिजलानी यांच्या प्रेमाचा सिलसिला 1990पासून सुरू झाला.
अझरचं लग्न झालं होतं, पण संगीताशी लग्न करायला म्हणून त्यानं पहिल्या बायकोला घटस्फोट दिला.
संगीता आणि अझर 1996मध्ये विवाह बंधनात अडकले. अझर मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकला, तेव्हा संगीतानेच त्याला साथ दिली होती. पण हे बंधन 2010पर्यंतच टिकलं.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)