You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमान प्रवासात विनयभंग, झायरानं मांडली इंस्टाग्रामवर व्यथा
दंगलफेम अभिनेत्री झायरा वसीमनं तिचा विनयभंग झाल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली आहे. दिल्ली-मुंबई विमान प्रवासादरम्यान एअर विस्तारामध्ये तिचा विनयभंग झाल्याचं तिनं म्हटलं आहे.
तर एअर विस्तारानं या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
17 वर्षांच्या झायरानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं, "माझ्या सीटच्या मागे बसलेल्या एका वयस्कर व्यक्तीनं माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मी झोपेत असताना ही व्यक्ती माझ्या मानेला आणि पाठीला हात लावत होती."
विश्वसुंदरी मानुषी छिल्लरनं झायराचा व्हीडिओ शेअर केला आहे. "मी तुझ्या पाठिशी आहे," असा दिलासा तिनं तिला दिला आहे.
झायरासोबत छेडछाड झाल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर एअर विस्तारानं आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे. "अशा प्रकारचं गैरवर्तन कदापी खपवून घेतलं जाणार नाही," असं विस्तारानं आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
या व्हीडिओमध्ये झायरा म्हणते, "मी आत्ताच विमानातून उतरले आहे. माझ्यासोबत काय झालं हे मला तुम्हा लोकांना सांगावं वाटत आहे. कुणी असं कसं वागू शकतं यावर माझा विश्वासच बसत नाही. अशा वर्तनामुळे कोणतीही मुलगी प्रवासामध्ये सुरक्षितता अनुभवू शकणार नाही. हे वर्तन खूपच भयानक आहे."
महिला आयोगाने घेतली दखल
महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी व्हावी असं महिला आयोगानं म्हटलं आहे.
"हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे," अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी दिली आहे.
"डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं (DGCA) या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी आम्ही केली आहे," असं राहटकर यांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांनी देखील झायराच्या तक्रारीची नोंद घ्यावी असं त्या म्हणाल्या.
झायरानं स्वतःला एकटं समजू नये आम्ही तिला न्याय मिळवून देऊ असं राहटकर म्हणाल्या आहेत.
हे पाहिलं का?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)