अमृता फडणवीस हिंदुत्वावाद्यांच्या संकुचित विचारांना आव्हान देत आहेत का?

    • Author, हेमंत देसाई
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रात सर्वसामान्य माणूस कितपत सुरक्षित आहे, याची आकडेवारी उपलब्ध आहे. अगदी नागपुरातही वारंवार हिंसक गुन्हे घडत आहेत. हिंसाचार शारीरिक आणि शाब्दिक, अशा दोन्ही प्रकारचा असतो.

दुसऱ्या प्रकारचा हिंसाचार खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुनःपुन्हा अनुभवावा लागत आहे. गेल्या वर्षी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मुंबईतील एका मनोविकार तज्ज्ञावरील बलात्काराच्या घटनेची चर्चा सुरू होती.

तेव्हा अमिताभ बच्चनसमवेतच्या म्युझिक अल्बमच्या व्हीडिओत अमृताजींनी जो पेहराव केला होता, त्याबद्दल अल-नसीर झकारिया यांनी अश्लाघ्य शेरेबाजी केली होती. त्यास अमृताजींनी सडेतोड उत्तरही दिलं होतं.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्येलाही समाजमाध्यमांवरील विकृत प्रतिक्रियांच्या माऱ्याला तोंड द्यावे लागलं होतं.

आता निमित्त नाताळाचं

आताचं निमित्त म्हणजे, नाताळानिमित्त गरीब मुलांना भेटवस्तू देण्याच्या उपक्रमासाठी अमृता फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाचं.

गरीब मुलांना नाताळाची मजा अनुभवता यावी, म्हणून लोकांनी पुढाकार घेऊन भेटवस्तू द्याव्यात, असं आवाहन अमृता यांनी केलं.

खरंतर, ही खूप चांगली गोष्ट. धर्माधर्मात, एकमेकांत सद्‌भाव आणि प्रेम निर्माण करणारी. परंतु अमृता फडणवीस या ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देत आहेत, त्यांच्या प्रथा-परंपरांचा पुरस्कार करत आहेत, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अजेंड्याला चालना देत आहेत, अशी तोफ समाजमाध्यमांतून त्यांच्यावर डागण्यात आली.

सणांविषयी इतकी आस्था असेल, तर फटाकेमुक्त दिवाळीला विरोध का केला नाही, अशी पृच्छाही ट्रोलिंग करणाऱ्यांनी केली.

वास्तविक फटाकेमुक्त दिवाळीला विरोध न करता पाठिंबाच देऊ, असं उत्तर अमृताजींनी द्यायला हवं होतं. कारण खुद्द मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी दिवाळीच्या वेळी तशी सामूहिक शपथ घेतली होती. हे पर्यावरणपूरक असेच पाऊल होते.

गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्री उत्सवांतला धांगडधिंगा आणि त्यानिमित्त सार्वजनिक रस्त्यांवरील होणारं आक्रमण अशा गैर गोष्टींवर टीका केली, तर उद्या अशाच प्रवृत्ती त्यासही ट्रोल करतील.

मात्र यावेळी 'हिंदू धर्माचा मला अभिमान आहे' असा खुलासा अमृताजींना करावा लागला. आपल्या देशात साजरे होणारे अनेक सण मी साजरे करते. आपल्या देशाची ती खरी भावना आहे आणि त्यामुळे देशा-धर्माबद्दलचं प्रेम कमी होत नाही, असंही त्यांनी सार्थपणे म्हटलं आहे.

मुक्त विचारसरणीच्या धनी

अमृता फडणवीस यांचे शिक्षण सुरुवातीला नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी देवेंद्रजींच्या प्रचारकार्यात भाग घेतला होता. भाजपच्या विचारधारेचा प्रचारही त्यांनी केला आहे.

अमृताजींचे वडील नेत्रविकारतज्ज्ञ, तर आई प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ आहेत. त्या स्वतः वित्तविषयातील MBA आहेत आणि ॲक्सिस बँकेत वरिष्ठ हुद्द्यावर काम करत आहेत.

शालेय वयात त्यांना ख्रिश्चन धर्माची ओळख झाली आणि आज त्या आधुनिक बँकिंग जगतात कार्यरत असल्या, तरी त्यांचे विचार मोकळे आहेत.

मात्र नाताळानिमित्त गरीब मुलांना भेटवस्तू देण्याचं आवाहन त्यांनी करताच, त्याचा निषेध करत, कुणी 'पुढच्या वेळी देशद्रोही भाजपला आम्ही मतदान करणार नाही'. 'व्हाय सान्ता? कुडंट यू डू सेम थिंग ड्युरिंग दिवाली?' 'दिवाळी गणेशपूजा किंवा चेन्नई-मुंबईतील पुराच्या वेळी तुम्ही कुठे होता'?' असे सवाल त्यांना विचारले जात आहेत.

क्रिया आणि प्रतिक्रियांचा पाऊस

'स्वराज्य' मासिकात लिहिणाऱ्या उजव्या विचारांच्या शेफाली वैद्य यांनी 'आस्क दि इव्हँजलिस्ट्स टू स्टॉप कन्व्हर्शन्स' असं ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून तुमच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यसभेचे खासदार आणि 'पाञ्चजन्य'चे माजी संपादक तरुण विजय यांनी मात्र आपल्या ब्लॉगमधून अमृता फडणवीस यांची पाठराखण केली आहे.

फडणवीस दांपत्यास त्यांनी नाताळाच्या शुभेच्छा दिल्या असून, सामाजिक एकसंधता राखणाऱ्यांची कुचेष्टा करू नका, असं समाजमाध्यमावरील योद्ध्यांना समजावलं आहे.

त्यांच्या मते, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व हिंदूंसाठी एक विहीर, एक देऊळ आणि एक स्मशआनभूमीचं आवाहन केले आहे.

स्वामी विवेकानंद अमेरिकेस गेले, तेव्हा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना विरोध केला; पण हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून स्वामीजी ठामपणे कसे उभे राहिले, हेही विजय सांगतात.

मात्र शिकागो येथील स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानांतील मूळ सूत्र कोणते होते? "पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजवला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून, कितीदा तरी ही पृथ्वी नररक्तानं न्हाऊन काढली आहे."

सक्तीचं धर्मांतर असमर्थनीयच आहे. पण ओरिसात ग्रॅहॅम स्टेनची हत्या बजरंग दलाच्या दारासिंगनं केली, त्याचं समर्थन होऊ शकत नाही.

2000 साली भारतातल्या चार चर्चेसवर बाँब टाकण्यात आले. दोन वर्षांपूर्वी हरियाणातल्या एका चर्चच्या इमारतीवर हल्ला झाला.

नवी दिल्ली, कोलकाता, जबलपूर, आग्र्यातही अशा घटना घडल्या. माता मेरी नि तान्ह्या येशूचे पुतळे फोडण्यात आले. रायपूरमध्ये एका ख्रिस्ती जोगिणीवर बलात्कार झाला.

'हिंदूंचे धर्मांतर घडवणे हे मदर तेरेसांचे मुख्य उद्दिष्ट होते', अशी टीका मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. आम्ही मात्र सेवा करतो ती कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता, असंच ते सुचवत होतं. झारखंडमध्ये संघानं ख्रिश्चन कुटुंबांच्या 'घरवापसी'चं कार्य आरंभलं आहे.

देशभरातील ख्रिश्चनांवरील हिंसाचार थांबवावा, म्हणून 4 डिसेंबर 1998 रोजी 2 कोटी 30 लाख ख्रिश्चन बांधवांनी निषेधदिन पाळला होता.

धर्मांतर आणि तथाकथित सक्तीच्या आंतरधर्मीय विवाहांवरून विहिंप आणि बजरंग दल गुजरातमधलं वातावरण पेटवत आहेत, असं प्रतिपादन त्याच वर्षी गुजरातचे पोलीस महासंचालक सी. पी. सिंग यांनी 'कम्युनॅलिझम काँबॅट'ला मुलाखत देताना केलं होतं.

आधुनिकतेला विरोध हा संघाचा पाया

'एक धर्म, एक ध्वज, एक भाषा' ही संघाची आयडियॉलॉजी आहे. आधुनिकेतला विरोध हा गोळवलकर गुरुजींच्या विचारसरणीचा पाया असल्यानं, त्यांनी हिंदू कोडलाही विरोध केला. भारतीय राज्यघटनेस त्यांनी 'गोधडी' असं संबोधलं.

आज 'सबका साथ सबका विकास'वाल्यांच्या राज्यात लव्ह जिहादच्या उन्मादातून राजस्थानात एका मजुराची निर्दयी हत्या होते. ती करणाऱ्या नराधमास लोक आर्थिक मदत करतात, त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात आणि समाजमाध्यमांतून त्यास पाठिंबा देतात.

याच प्रवृत्ती आज अमृता फडणवीस यांना सतावत आहेत. त्यांना उत्तर देणाऱ्या अमृताजी, हिंदुत्ववाद्यांच्या संकुचित विचारविश्वाच्या चौकटीसच आव्हान देतात का, हाच खरा सवाल आहे.

(हेमंत देसाई हे ज्येष्ठ अर्थ आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)