You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निर्बंधांनंतर कतारची अन्नस्वयंपूर्णतेसाठी धडपड : 10,000 गाई आयात, तंत्रज्ञानावर भर
कतारला सध्या गाई हव्या आहेत. हजारो गाई! या गाई नसतील तर हा छोटासा देश आपल्या 27 लाख लोकांची अन्नाची गरज भागवू शकत नाही. यामुळे त्यांना इतर देशांवर अन्नासाठी अवलंबून रहावं लागत आहे.
5 जून 2017 रोजी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि इजिप्त या देशांनी कतारशी संबंध तोडून टाकले. यामुळे कतारच्या लोकांनी घरात अन्न साठवण्यास सुरुवात केली, विशेषतः दुग्धजन्य पदार्थांसाठी एकच गर्दी झाली.
त्यांना कल्पना होती की त्यांच्याकडे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपैकी बहुतांश वस्तू सौदी अरेबियाकडून येत होत्या.
कतारचा सौदीला जोडणारा एकमेव भूमार्ग आता बंद झाल्याने त्यांना इराण, तुर्कस्तान आणि इतर देशांमधून दुग्धजन्य पदार्थांची आयात करावी लागत आहे, ती ही जास्त पैसे मोजून.
या निर्बंधांमुळे कतारला जाग आली आणि त्यांनी आता आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच एका बलादना नावाच्या स्थानिक डेअरीने इंग्लंड आणि अमेरिकेतून 600 हून जास्त गाई आणल्या. कतारच्या वाळवंटात मध्यभागी या गाईंसाठी खास एक गोठा बांधण्यात आलेला आहे.
बलादना त्यांच्या सध्या असलेल्या गोठ्यांपेक्षाही मोठा गोठा बांधत आहेत, ज्यात सुमारे 13,000 गाई ठेवता येतील.
बलादनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन जोसेफ डोर यांनी बीबीसीला सांगितलं की या वर्षभरात आणखी 3000 गाई आयात करण्याचा त्यांच्या डेअरीचा मानस आहे. आणि पुढच्या वर्षी ते 10,000 आयात करणार आहेत.
"मे 2018 पर्यंत या 14,000 गाई 300 टन दूध देतील, ज्यामुळे कतार दुधाच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होईल," ते पुढे सांगतात.
"अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याबद्दल कतारमध्ये जागरुकता वाढत आहे. आम्ही भविष्यासाठी काही गोष्टींची आखणी केली आहे आणि आम्ही त्या दृष्टीने वाटचाल करत होतोच. पण काही दिवसांपूर्वी आमच्यावर निर्बंध लादल्यामुळे स्वयंपूर्णतेच्या दिशेत आमचा वेग आणखी वाढला आहे," डोरे सांगतात.
गाईंसाठी बांधण्यात येणारा नवीन आणि अद्यावत गोठा या वर्षाअखेरीस बांधून तयार होईल. हा या प्रदेशातला सगळ्यांत मोठा गोठा ठरेल, जिथे एकाच वेळी 100 गाईंचं दूध काढण्याची सोय असेल. तसंच 80 गाईंचं दूध एकाच वेळी काढता येईल अशा तीन यंत्रणाही या गोठ्यात असतील.
या संपूर्ण कामासाठी 300 कोटी कतारी रियाल (9 कोटी डॉलर्स) एवढा खर्च येईल, असं डोर म्हणतात. आयर्लंडचे रहिवासी असणाऱ्या डोरे यांना खास या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी बोलवण्यात आले आहे.
"निर्बंध येण्याआधी कतार पूर्णपणे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीवर अवलंबून होता. 80 ते 85 टक्के ताज्या दुधाचे पदार्थ या देशांमधून यायचे. आता स्वयंपूर्ण होण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कारण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींमधल्या प्रस्थापित कंपन्यांसारखं आम्हाला काम करावं लागेल. येणारी प्रत्येक संधी आम्ही साधणार आणि स्वयंपूर्ण होऊन दाखवणार."
डोर यांच्यामते कतार मध्ये गाई आयात करून पाळणं फक्त आर्थिकदृष्ट्या परवडलं नाही तर त्यातून फायदाही झाला.
"दूध आयात करण्यापेक्षा गाईंचा चारा आयात करणं कधीही चांगलं. एक किलो चाऱ्याला गाय दोन किलो दूध देते. बरं, या गाई ग्राहकांपासून जवळ असल्याने ग्राहकांनाही ताजं दूध मिळतं."
दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त 80 टक्के भाजीपालाही कतार युरोप आणि इतर देशांमधून आयात करतो. इथल्या काही शेतीतज्ज्ञांना वाटतं की कतारची भाजीपाल्याची सगळी गरज त्यांच्याच देशात भागू शकते."
कतारमध्ये असणाऱ्या 1600 शेतांपैकी फक्त 300 शेतांमध्ये पिकं घेतली जातात. तीही हंगामी. मात्र उत्तर कतारमध्ये असणारं 'अॅग्रीको' हे फार्म गेल्या तीन वर्षांपासून वर्षभर शेतात उत्पादन घेतात.
एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत कतारमधलं हवामान अतिशय वाईट असतं. प्रचंड उकाडा, शुष्क आणि दमट अशा वातावरणात कुठलही पिक घेणं शक्य नाही, असं अॅग्रीकोचे व्यवस्थापकीय संचालक नस्र-अल-खलाफ यांनी बीबीसीला सांगितलं.
"वर्षभर सगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकवणारं आमचं फार्म पहिलं आहे. कित्येक वर्षांच्या रिसर्चमधून विकसित केलेल्या शास्त्रीय पद्धतींद्वारे आम्ही शेती करतो. आणि आम्हाला त्यात यश मिळालं आहे."
नासर-अलं-खलाफ यांच शेत 1,20,000 चौरस मीटर क्षेत्रात पसरलं आहे. यात ग्रीनहाऊसेस आहेत, ज्यांमध्ये खलाफ टोमॅटो, कांदे, मशरूम्स, पालेभाज्या आणि फळही पिकवतात.
कतार सरकार स्थानिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या योजना आखत आहे, असं खलाफ सांगतात.
"शेती संदर्भात काय करायचं, कसं करायचं याची माहितीही आम्ही सरकारला देत आहोत. मला खात्री आहे की इतर फार्मसुद्धा, अशी माहिती सरकारला देत असतील. येत्या काही वर्षांत आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. पण मला वाटतं की त्यानंतर आम्ही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ," खलाफ म्हणतात.
त्यांच्यामते कतारला भाजीपाल्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला अजून तीन ते पाच वर्षं लागतील. पण तरीही सध्या असणारं तंत्रज्ञान वापरून कतार सगळ्या प्रकारची पिकं घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, कतार ऊस किंवा मका पिकवू शकत नाही.
स्थानिक मीडियाच्या मते कतार सरकारने गोदामं बांधायला इथल्याच एका कंपनीला कंत्रात दिलं आहे.
ही गोदामं 30 लाख लोकांना दोन वर्षं पुरेल एवढं अन्नधान्य साठवू शकतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)