1917 रशियन क्रांती : जेव्हा गे समुदायाला मिळालं औटघटकेचं स्वातंत्र्य

    • Author, ओल्गा खोरोशिलोवा
    • Role, सेंट पीटर्सर्बग स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी अॅंड डिझाईन

जानेवारी 1921 ची ही गोष्ट. रशियाच्या बाल्टिक फ्लीटचे नाविक अफॅन्सी शौर यांनी पेट्रोग्रॅडमध्ये एका अनोख्या गे विवाह समारंभाचं आयोजन केलं होत. या लग्नाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये लष्करातले 95 माजी अधिकारीही होते.

शिवाय, लष्कर, नौदलमधील काही कनिष्ठ अधिकारी होते. आणखी एक महिला होती, जिनं पुरुषांचा सूट परिधान केला होता.

पेट्रोग्रॅडनं यापूर्वी असं काहीही पाहिलं नव्हतं. फक्त पार्टीसाठी पाहुणे येणार का, याची शौर यांना चिंता होती. म्हणून त्यांनी या भव्य सोहळ्याच्या आयोजनासाठी जीवाचं रान केलं होतं.

रशियन चालीरीतींनुसार या सोहळ्यात शौर यांनी कुठलीही कसर राहू दिली नाही. मस्त मेजवानी, पालकांचे आशिर्वाद आणि त्यानंतर गायनाचा कार्यक्रम, असं सारं काही होतं.

रशियातील गे समुदायासाठी सहिष्णुतेचा हा अल्पसा कालावधी होता.

'ऑक्टोबर क्रांती'नंतर बोल्शेविकांनी देशाचे कायदे रद्दबातल ठरवून नवीन कायदे लिहिले. त्यांनी दोन फौजदारी संहिता लिहिल्या - एक 1922 मध्ये आणि दुसरी 1926 मध्ये, ज्यात गे सेक्सवर बंदीचे नियम नव्हते. पण, पेट्रोगार्डमध्ये असं लग्न होईल, हे काही अपेक्षित नव्हतं.

पण, शौर गुप्तचर पोलिसांचे सदस्य होते. आणि या लग्नसमारंभाच्या अखेरीस सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांना अटक करण्यात आली.

शौर यांच्यानुसार या समारंभाचे आयोजन त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून केलं होतं. त्यांचा असा दावा होता की हे माजी सैनिक क्रांतीचे विरोधक होते आणि त्यांना तरुण 'रेड आर्मी'ला आतून संपवायचं आहे.

शौर यांचे हे आरोप तग धरू शकले नाहीत आणि हा खटला नंतर बंद झाला. या 'क्रांतीच्या विरोधकां'ना तात्पुरती दमदाटी देऊन सोडून देण्यात आलं.

'आपला माणूस' कसा ओळखायचा?

क्रांतीच्या पूर्वीपासूनच रशियातील गे पुरुष एका भूमिगत समुदायाचा भाग होते. एकमेकांना ओळखण्यासाठी त्यांची फॅशनची 'सांकेतिक भाषा' होती.

सेंट पीटरसर्बगमध्ये ते लाल टाय किंवा लाल शाल घालायचे आणि पॅंटचा खिसा शिवलेला असायचा.

काही जण चेहऱ्यावर खूप पावडर आणि मस्कारा लावायचे.

'क्रांती'नंतर हा भूमिगतांचा असा 'मूक नटाचा' हा लुक फक्त गे पुरुषांची फॅशन न राहता अधिकाधिक मुख्य प्रवाहात आला.

आधी क्रांती आणि मग गृहयुद्धानंतर रशियाला फार मोठ्या अडचणींना तोंड द्याव लागलं होतं. यामुळे युरोपातील गे पुरुषांसारखे कपडे आणि अक्सेसरिज इथल्या गे पुरुषांना वापरणं कठीण जात होतं.

कायदेशीर पण तरीही शिक्षा

जर्मन संशोधक मॅग्नस हर्शफेल्ड यांचा बोल्शेव्हिकांवर प्रभाव होता. त्यांनी बर्लिनमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजीची स्थापना केली होती. हर्षफेल्ड जाहीर कार्यक्रमांतून सांगत होते की समलैंगिकता हा आजार नाही तर मानवी लैंगिकतेचं प्रकटीकरण आहे.

1920 च्या फौजदारी संहितांमध्ये गे सेक्सशी संबंधित कायदे नसले तरी समलैंगिकांवर खटले दाखल होत होते. त्यांना नेहमी मारहाण व्हायची, ब्लॅकमेल केलं जायचं किंवा कामावरून काढून टाकलं जायचं.

काही जण शेवटची आशा म्हणून मनोविकारतज्ज्ञ व्लादिमीर बेख्टरेव्ह यांना पत्र लिहायचे आणि आमचं नैराश्य, आमचा हा 'आजार' दूर करा, अशी विनंती करायचे.

ही पत्रं आणि इतर काही कागदपत्रं दाखवतात की गे समुदायातील लोक फारच धाडसी होते. त्यातील काही लोक महिलांचे कापडे परिधान करत होते तर काहीजण महिलांसारखे लांब केस ठेवत आणि खऱ्या महिलांसारखेच दिसत.

अमीर-उमराव आणि साधे लोक

विशेष म्हणजे क्रांतीनं वर्ग विभागणी मोडून काढली असली तरी गे सामाज काही वर्गांमध्ये विभागला होता. या समुदायात दोन प्रकारचे लोक होते आणि ते आपापसात मिसळत नसत.

पहिले कथित अॅरिस्टोक्रॅट अर्थात अमिर-उमराव होते. त्यांच्यात अधिकारी, झारच्या लष्करातील आणि नौदलातील पदाधिकारी, कल्पक, विचारवंत यांचा समावेश होता.

दुसरा समुदाय हा साध्या लोकांचा होता. नाविक, सैनिक, कारकून यांचा त्यात समावेश होता. क्रांती पूर्वीच्या सेंट पीटरर्सबगच्या स्टायलीश सलूनचा ते भाग नव्हते आणि क्रांतीनंतरच्या अमीर उमरावांचा नाही.

1920 मध्ये जर्मनीतील 'ट्राव्हेस्टी' थिएटर सोव्हिएट गे लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध झालं होतं. बर्लिनच्या 'एल डोराडो' नाईटक्लबचा स्टार हॅन्सी स्टर्म त्यांच्यात फारच लोकप्रिय होता.

साध्या वर्गातील देखण्या पुरुषांना अमिर-उमराव क्वचितच त्यांच्या कार्यक्रमांत बोलवायचे. जे पुरुष महिलांचे कपडे घालायचे त्यांच्यावर तर कुठलीच बंदी नव्हती. ते स्टार व्हायचे आणि मग अमिर-उमरावांचे गुलाम बनायचे. प्रसिद्ध बॅले डान्सर मटिल्डा क्षेस्निनस्काया ही झार निकोलस-II ची अशीच बनलेली रखेल होती.

त्यांचे वॉर्डरोब सुंदर कपड्यांनी सजलेले असायचे. हे कपडे व्यवसायिक टेलरकडून शिवून घेतलेले असायचे. पेट्रोग्रॅडमधले प्रसिद्ध टेलर लिफर्टकडून ते भाड्याने किंवा शिवून घेतलेले असायचे.

क्रांतीच्या पूर्वी लिफ्रेट शाही दरबारसाठी कपडे पुरवायचा तसंच मारिन्सके थिएटरसाठी कपडे बनवायचा.

आणि ते सर्व संपले

शौर यांनी आयोजित केलेल्या या शाही लग्नानंतर अशा लग्न समारंभाचे आयोजन पुन्हा झालं नाही. तशा अटकही पुन्हा झाल्या नाहीत.

समलैंगिकतेकडे सहिष्णुतेनं पाहिलं जात असलं तरी हा समुदाय 1930 पर्यंत आपल स्वातंत्र्य गमावू लागला होता.

1933 मध्ये 175 गे व्यक्तींना अटक झाली आणि या या प्रकरणाला 'लेनिनग्रॅड होमोसेक्शुअल केस' म्हणून ओळखलं गेलं. या केसचे बरेच भाग सार्वजनिक झाले नसले तरी त्यांच्यावर क्रांतीच्या विरोधासाठी ब्रिटिश गुप्तचरांसमवेत काम करणं, 'रेड आर्मी'ला नीती भ्रष्ट करणे, असे आरोप लावण्यात आले होते.

शौर यांनी 1921 मध्ये ज्या हेतूनं त्या लग्नाचं आयोजन केल होतं तो विचार महत्त्वाची भूमिका बजावत होता, असं मानलं जातं. पण गुप्तचर पोलीस विसरले नव्हते की असले "अनैसर्गिक संबंध ठेवणारे लष्कर आणि नौदलाला भ्रष्ट करत आहेत".

1930 मध्ये हीच मांडणी पुन्हा करण्यात आली आणि गुप्तचर पोलिसांनी जबरदस्तीनं घेतलेल्या जबाबांमध्ये तेच नोंदवलं आहे.

'लेनिनग्रॅड होमोसेक्शुल केस'नंतर 1934 मध्ये समलैंगिकतेचा पुन्हा गुन्हा म्हणून संहितेत समावेश करण्यात आला. आणि समलिंगीसाठीची औटघटकेची ही सहिष्णुता आणि स्वातंत्र्य संपुष्टात आली.

ओल्गा खोरोशिलोवा बीबीसी रशियाच्या अॅना कोसिनस्काया यांना दिलेली माहिती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)