You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
LGBT : समलैंगिक विवाहांसाठी ऑस्ट्रेलियात कायद्यात बदल होणार?
समलैंगिक विवाहांसाठी कायद्यात काय बदल व्हावा यासंदर्भात ऑस्ट्रेलियात जनमत चाचणी घेण्यात येत आहे.
जनमत चाचणीत नागरिकांना आपली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तसं व्यक्त होताना त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचं दडपण नसेल.
समलैंगिक विवाहाला अनुकूलता मिळावी यासाठी देशभरात रॅलींचं आयोजन करण्यात आलं आहे.
समलैंगिकता कायद्यात बदल व्हावा यासाठी शनिवारी आणि रविवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते.
समलैंगिक विवाहाच्या मुद्यावरून ऑस्ट्रेलियात बरीच वर्षं वादविवाद सुरू आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट यांचा समलैंगिक विवाहाला विरोध होता.
यासाठी त्यांना अनेकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं.
ऑस्ट्रेलियाच्या सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी 13 ऑक्टोबरपर्यंत एक कोटी नागरिकांनी जनमत चाचणीत मतदानाचा अधिकार बजावला. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 67 टक्के नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदवला आहे.
उदारमतवादी विचारसरणीच्या देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने विवाहासंदर्भात बदल केले आणि समलैंगिक विवाहांवर बंदी घातली.
20 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील टास्मानिया राज्याने समलैंगिकतेला अधिकृत मान्यता दिली होती. त्यानंतर अशी परवानगी ऑस्ट्रेलियातल्या कुठल्याही राज्यानं दिलेली नाही.
ऑस्ट्रेलियात याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. आता जनमत चाचणीद्वारे यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)