न्यूयॉर्क हल्ला : सुरक्षा पडताळणी आणखी कडक करण्याचे आदेश

न्यूयॉर्कमधल्या लोअर मॅनहॅटन भागात सायकलसाठी राखीव असलेल्या रस्त्यावर एका ट्रकचालकानं बेदरकारपणे गाडी चालवून आठ जणांचा बळी घेतला आहे. या घटनेत 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा छोटा ट्रक चालवणाऱ्या 29 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी गोळीबार करून अटक केली आहे.

या हल्ल्यात अर्जेंटिनाच्या 5 मित्रांचा मृत्यू झाला आहे. अर्जेंटिनाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्जेंटिनाचे 10 मित्र एकत्र मॅनहॅटन परिसरात आले होते. न्यूयॉर्क पॉलिटेक्निक कॉलेजमधून मिळालेल्या डिग्रीला 30 वर्ष झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ते तिथं आले होते.

दरम्यान हल्ल्यानंतर हल्लेखोर 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गृह मंत्रालयाला अमेरिकेत प्रवेश करण्याऱ्यांची सुरक्षा पडताळणी आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी या व्यक्तीचं नाव सायफुलो सायपोव असं सांगितलं आहे. तो 2010 साली एक स्थलांतरित म्हणून अमेरिकेत आला होता. तो फ्लोरिडामध्ये स्थायिक झाला होता.

न्यूयॉर्कचे महापौर बाली द ब्लाझिओ म्हणाले, "हा निष्पाप नागरिकांवर एक भ्याड दहशतवादी हल्ला आहे."

ते पुढे म्हणाले, "आम्हाला कळतंय की आमचं खच्चीकरण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. पण आम्हाला माहित आहे की न्यूयॉर्क मधील नागरिक कणखर आणि संवेदनाक्षम आहेत. दहशत पसरवण्यासाठी केलेल्या या हल्ल्यानं आमचा धीर कधीच खचणार नाही."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत.

"न्यूयॉर्कमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना माझी श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. देवाचे आशीर्वाद आणि संपूर्ण देशाची जनता तुमच्या पाठीशी आहे." असं त्यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या एका ट्विमध्ये त्यांनी "एका विकृत आणि भ्रमिष्ट माणसानं हल्ला केला आहे. संबंधित संस्था यात लक्ष घालत आहेत. अमेरिकेत हे चालणार नाही. इस्लामिक स्टेटचा मध्य-पूर्वेत पराभव केल्यानंतर त्यांना इथं परत येऊ देऊ नये. पूरे झालं." असं म्हंटलं आहे.

न्यूयॉर्कचे पोलीस कमिशनर जेम्स ओनिल यांनी सांगितलं की गंभीर जखमा झाल्या असल्या तरी पीडितांच्या जीवाचा धोका टळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार घडलेला घटनाक्रम

  • स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता एका रिटेलर होम डेपोमधून भाड्यानं घेतलेल्या एका ट्रकनं वेस्ट सेंट ह्युस्टन मार्गावरील सायकलचालकांना आणि पादचाऱ्यांना चिरडलं.
  • त्या गाडीनं नंतर एका स्कूलबसला धडक दिली. त्यात बसमधील दोन वयस्क आणि दोन लहान मुलं जखमी झाले आणि तिथेच ती गाडी थांबली.
  • गाडीचा ड्रायव्हर बाहेर दोन हँडगनसह बाहेर आला आणि 'असे हल्ले पुढेही सुरूच राहतील' असं ओरडला.
  • पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर त्याच्या पोटात गोळी घातली.
  • घटनास्थळावरून एक पेंटबॉल गन आणि पेलेट गन जप्त करण्यात आली आहे.

"या घटनेत जे लोक मरण पावले किंवा जखमी झाले त्यांचा नेहमीप्रमाणे दिवस सुरू होता. काही कामावरून तर काही लोक शाळेतून घरी येत होते. काहीजण फक्त सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होते." कमिशनर सांगत होते.

"न्यूयॉर्कमधल्या अनेक जणांसाठी हा हल्ला म्हणजे एक मोठी आपत्ती आहे." असंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण शहरात हॅलोविन साजरा होत असतांना घटनास्थळी मोडलेल्या सायकलींचा खच पडला होता.

युजिन नावाचा एका प्रत्यक्षदर्शी ABC चॅनल-7 शी बोलताना म्हणाला की त्यानं वेस्टसाईड हायवेवरून सायकलसाठी राखीव रस्त्यावरून एक ट्रक वेगात येताना बघितला. त्या ट्रकनं अनेक लोकांना चिरडलं. त्यांनी गोळ्यांचा आवाज कानावर पडल्याचं सांगितलं.

फ्रँक नावाच्या दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीनं लोकल टीव्ही नेटवर्क NY1ला सांगितलं की, त्यांनी एका माणसाला चौकाकडे धावताना पाहिलं. त्यानं बंदुकीच्या पाच ते सहा फैरी झाडल्या.

"मी त्याच्या हातात काहीतरी असल्याचं पाहिलं, पण काय होतं ते कळलं नाही. पण ती बंदूक असल्याचं सांगण्यात येत आहे." असं त्यांनी पुढे बोलताना सांगितलं.

"जेव्हा पोलिसांनी त्याला गोळी घातली तेव्हा सगळे लोक सैरावैरा पळायला लागले तेव्हा मी थोडावेळा गोंधळलो. मी जेव्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो माणूस कोसळला होता."

बीबीसीचे न्यूयॉर्क प्रतिनिधी निक ब्रायंट लिहितात...

न्यूयॉर्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हल्लेखोर सध्यातरी एकटाच आहे. ही घटना म्हणजे एक मोठ्या कटाचा भाग असल्याचे सध्यातरी दिसत नाही.

सध्या घटनास्थळावर संपूर्ण प्रसंगाची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्यात जास्त प्रमाणात साजरा होणाऱ्या हॉलोविन सणाच्या दिवशीच हा हल्ला झाला आहे.

संपूर्ण फुटपाथ गर्दीनं फुलला होता. लहान मुलं हॉलोविन साजरा करण्यात गुंग होती. पण यातून अशा घटनांना न्यूयॉर्क कसं सामोरं जाईल हे स्पष्ट झालं आहे.

आम्ही सध्या ग्राऊंड झिरोपासून काही अंतरावर आहोत. 2001 साली झालेल्या दु:खद घटनेच्या आठवणी ताज्या करणारी ही जागा आहे. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला आहे हे कळायला पोलिसांना फारसा वेळ लागला नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)