सोशल : 'आता रस्ते आहेत तरी कुठे? खड्डेमय झाला आहे महाराष्ट्र माझा'

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. या वक्तव्याबाबत बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं? जाणून घेऊया.

अनेक वाचकांनी फडणवीस सरकारवर टीका करत किंवा खिल्ली उडवत आपली मतं व्यक्त केली आहेत.

अजय चौहान म्हणतात, "चंद्रकांत पाटील तुम्ही कितव्यांदा खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करणार आहात? आता रस्ते आहेत तरी कुठे, खड्डेमय झाला आहे महाराष्ट्र माझा"

विजया पाटील म्हणतात, "मुंबई-गोवा हायवे किंवा आंबोली मार्ग पाहा. पर्यटन जिल्हा असूनही सिंधुदूर्गमधल्या रस्त्यांची दुर्दशा पाहता मराठवाड्यातील रस्त्यांची कल्पनाही करवत नाही." त्यासोबतच चंद्रकांत पाटील फक्त जाहिरातबाजी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अभिजीत राऊत यांनी तर "एका भाजप भक्ताचं मनोगत" व्यक्त करत लिहिलं आहे- "गेल्या ३ वर्षांत रस्त्यांवर कुठे ही खड्डे पडलेले नाहीत. जे खड्डे आहेत ते आघाडी सरकारच्या काळातील असून तो त्यांचा नाकर्तेपणा आहे. तुम्ही त्यांना जाब न विचारात भाजपला का विचारत आहेत?"

अलिबागचे अमेय जोशींनी सरकारवर मिश्कील टीका केली आहे - "मंत्री साहेबांना कदाचित रस्ताच दिसणार नाही, असं म्हणायचं होतं. त्यात 15 डिसेंबर 2017 की 2019, असं स्पष्ट उल्लेखही नाही. त्यात आता त्यांचे भक्त १५ डिसेंबरनंतर काय युक्तीवाद करावा, याचा विचार करत असतील," असं त्यांनी म्हटलं आहे.

तसंच, "राज्य सोडा निदान आमच्या गावातील खड्डे जरी भरले तरी देव पावला म्हणायचं!" असा टोला लागावला आहे.

तृप्ती सावंत म्हणतात, "एप्रिल फूल यंदा डिसेंबरमध्येच!" तर अभिजीत वानखेडे यांनी एक सल्ला दिला आहे-

तर चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवत गिरीश पिसे म्हणतात, "दादा, मागच्या वेळेस पण तुम्ही असंच बोलले होते, 'खड्डे दाखवा, पैसे मिळवा', मी तर अॅप्पल (कंपनी, फोन नव्हे)/ फेसबुक/ गुगल विकत घ्यायच्या विचारात होतो. पण तुम्ही ऐनवेळी घोषणा फिरवली आणि आमचा हिरमोड केलात. नाहीतर आज अंबानीच्या मागे आमचाच नंबर होता."

पण या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये विशाल मोकल यांनी पाटिलांना एका खडा सवाल विचारला आहे - "आत्तापर्यंत ज्यांचा खड्यात पडून मृत्यू झाला आहे आणि यापुढे जे मृत्यू होतील, या सर्व अपघाताची जबाबदारी घेणार का?"

तर शुभम गौराजे म्हणतात, "मला वाटत आहे सरकारने आता 'चला हवा येउ द्या'सारखा एक शो काढावा आणि तिथे आपली हे स्किट्स सादर करावे. तेवढंच आमचं मनोरंजन होईल."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)