You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्टीफन हॉकिंग यांच्या PhDला एका दिवसात 20 लाख हिट्स
प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांच्या PhDचा प्रबंध नुकताच ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतरच्या अवघ्या एका दिवसात हा प्रबंध तब्बल 20 लाख वेळा पाहण्यात आला.
1966 साली स्टीफन हॉकिंग यांनी या प्रबंधावर काम केलं होतं.
केंब्रिज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हा प्रबंध प्रकाशित करण्यात आला आहे. आणि त्यावर इतके 'हिटस्' आले की केंब्रिज विद्यापीठाच्या प्रकाशन विभागाची वेबसाइट क्रॅश झाली.
'प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग यूनिवर्स' असं शीर्षक असलेला हा प्रबंध पाच लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यापीठातील डॉ. ऑर्थर स्मिथ यांनी या आकड्याला विस्मयकारक म्हटलं आहे.
'सर्वांत जास्त पाहिला गेलेला प्रबंध'
"विद्यापीठाच्या अपोलो संग्रहालयातला हा प्रबंध इतर दस्तावेजांपेक्षा सर्वांत जास्त प्रमाणात अभ्यासकांनी पाहिला आहे," असं स्कॉलर्ली विभागाचे उपप्रमुख डॉ. स्मिथ यांनी सांगितलं.
"जगातील कोणत्याही संग्रहालयाचा विचार केल्यास स्टीफन हॉकिंग यांचा प्रबंध हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वांत जास्त प्रमाणात वाचण्यात आणि पाहण्यात आल्याचा माझा अंदाज आहे," असं स्मिथ म्हणतात.
कोण आहेत स्टीफन हॉकिंग्स
- 8 जानेवारी 1942ला इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे त्यांचा जन्म झाला.
- 1959 साली ऑक्सफर्ड विद्यापीठात 'नैसर्गिक विज्ञाना'चा अभ्यास करण्यासाठी प्रवेश, त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात PhDचं शिक्षण सुरू.
- 1963 साली 'मोटर न्यूरॉन' हा आजार झाल्यामुळे स्टीफन हॉकिंग अजून दोन वर्षं जगतील, असं डॉक्टरांचं भाकित.
- 1974 साली त्यांनी सिद्धांत मांडला की 'ब्लॅक होल'मधून किरणोत्सार होतो. पुढे याला 'हॉकिंग रेडिएशन' असं नाव देण्यात आलं.
- 1988 साली त्यांचं 'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक प्रकाशित. या पुस्तकाच्या एक कोटीपेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.
- 2014 साली स्टीफन हॉकिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'द थेअरी ऑफ एव्हरीथिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला. एडी रेडमेन यांनी या चित्रपटात हॉकिंगची भूमिका साकारली होती.
एका दिवसात 20 लाख हिट्स!
वयाच्या चोवीसाव्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांनी 134 पानांचा एक दस्तावेज लिहिला होता. त्यावेळी हॉकिंग केंब्रिजच्या ट्रिनिटी हॉलमध्ये पोस्टग्रॅज्युएशन करत होते.
1962 पासून हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात खगोलतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. पुढे त्यांनी 'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक लिहिलं जे विज्ञान क्षेत्रातील आजवरचं सर्वांत प्रभावी पुस्तक मानलं जातं.
सोमवारी मध्यरात्री स्टीफन हॉकिंग यांचा प्रबंध सार्वजनिक करण्यात आला. त्यानंतर जगाभरातल्या आठ लाख युनिक ब्राऊजर्सनी हा प्रबंध जवळपास 20 लाख वेळा पाहिला आहे.
2017 मध्ये आतापर्यंत दुसरा सर्वाधिक वाचला गेलेला प्रबंध फक्त 7,960 वेळा डाउनलोड करण्यात आला आहे.
इतरही प्रबंध सार्वजनिक होणार?
यापूर्वी स्टीफन हॉकिंग यांचा प्रबंध वाचण्यासाठी लोकांना 65 पौंड एवढी रक्कम विद्यापीठाला शुल्क म्हणून द्यावी लागत होती.
हॉकिंग यांच्याप्रमाणेच विद्यापीठाच्या इतर माजी संशोधकांनी त्यांचे कार्य सार्वजनिक करावं, यासाठी केंब्रिज विद्यापीठ त्यांना प्रोत्साहित करणार आहे.
"ज्ञान आणि माहिती बंदिस्त करून ठेवल्यास त्याचा कुणालाही फायदा होत नाही," असं डॉ. स्मिथ सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)