सत्यजित तांबे विजयानंतरही भाजपमध्ये जाणं टाळतील?

फोटो स्रोत, facebook
विधान परिषदेच्या निकालांकडे नजर टाकली तर लक्षात येईल की महाविकास आघाडीची या निवडणुकीत चांगलीच सरशी झालीय. पाच पैकी तीन म्हणजेच नागपूर, अमरावती आणि औरंगाबादची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकण्यात यश आलंय.
पण, त्यात आणखी एक मतदारसंघ जोडला गेला असता जर काँग्रेसनं नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली असती.
सत्यजित आता अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेत खरे. पण, ते आता पुन्हा काँग्रेसचा हात धरतील की भाजपचं कमळ हातात घेतील हे लवकरच स्पष्ट होईल.
सत्यजित यांची उमेदवारी जाहीर करण्यात काँग्रेसनं अभूतपूर्व घोळ घातला. नाशिकमध्ये ते इच्छुक असताना त्यांच्या जागी त्यांच्या वडिलांना उमेदवारी देण्यात आली. तेही त्याची घोषणा नवी दिल्लीतून करण्यात आली. इतर उमेदवारांची घोषणा मात्र नाना पटोलेंनी केली. नाशिकमध्ये मात्र नाना पटोलेंनी दिल्लीतल्या त्यांच्या पाठिराख्यांना हाताशी धरल्याचं दिसून आलं
नाशिकमध्ये सत्यजित यांनाच उमेदवारी द्यायला पाहिजे होती, असं नंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी खासगीत आणि जाहीररित्या म्हटलं.

फोटो स्रोत, FACEBOOK/SATYAJEET TAMBE
विदर्भातले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी तर थेट पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून नाना पटोले यांना हटवण्याची मागणीच करून टाकली. नानांनी सत्यजित यांच्या उमेदवारीत घोळ घातल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष दिल्लीतून लादलेला नसावा, अशी मागणी करत आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंच्या दिल्लीतल्या पाठिराख्यांवरसुद्धा टीकेची झोड उठवली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काँग्रेसने सत्यजित यांना उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं. आता निवडून आल्यावर योग्य तोच निर्णय ते घेतील, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
पण, सत्यजित यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा आधीच डोळा होता अशीसुद्धा चर्चा नंतर रंगली होती.
"बाळासाहेब थोरात, माझी एक तक्रार आहे की, अशा प्रकारचे (सत्यजित तांबे) नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका. आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो."
सत्यजित तांबेंनी अनुवादित केलेल्या 'सिटीझनविल' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी साधारण दीड महिन्या पूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं होतं.
फडणवीस बोलत असताना व्यासपीठावर सत्यजित तांबे आणि त्यांचे मामा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातसुद्धा उपस्थित होते.
अर्थात या निवडणुकीत सत्यजित यांना भाजपची मदत झालीय हे आता उघड आहे. पण त्यांची पुढची रणनिती काय असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर, "विजयानंतर पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करेन," असं सत्यजित यांनी म्हटलंय.
पण म्हणून सत्यजित तांबे लगेच भाजपमध्ये जातील अशी शक्यता फार कमी असल्याचं ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांना वाटत.

फोटो स्रोत, FACEBOOK/SATYAJEET TAMBE
"सत्यजित तांबे लगेचच भाजपकडे जातीस असं सागंणं कठीण आहे. पण सध्या ते कुंपणावर बसून निरीक्षण करतील. पुढच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत आता त्यांच्याकडे वेळ आहे. त्यांच्याकडे हक्काचा मतदारसंघ नाही. त्यामुळे आता येत्या 6 वर्षांते ते एखादा मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न करतील. लोकांचा प्रतिसिद आणि अपेक्षा काय आहे हे पाहून ते त्यांचं राजकारण आखतील असं सध्या तरी दिसतंय," असं गोपाळ जोशी सांगतात.
त्याचवेळी सत्यजित अपक्ष म्हणून राहतील असं दिसत असलं तरी त्यांचा कल भाजपपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडे असल्याचं त्यांच्या सध्याच्या राजकारणावरून दिसतंय.
पण सत्यजित यांचं हे बंड भाजपमध्ये जाण्यासाठी नसून ते स्वतःला राजकीयदृष्ट्या स्थापित करण्यासाठीची हालचाल म्हणून पाहावं लागेल, असं जोशी यांना वाटतं.
त्यासाठी जोशी हर्षवर्धन पाटील यांचं उदाहरण देतात. 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या हर्षवर्धन यांनी तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता अपक्षांची मोट बांधून युती सरकारमध्ये मंत्री झाले. पण नंतर मात्र ते त्यांच्या मूळ विचारांच्या काँग्रेस पक्षात परत गेले.
सत्यजित तांबेसुद्धा परिस्थितीनुसार निर्णय घेतील असं जोशी यांना वाटतं.
'सत्यजित तांबे एवढा मोठा नाही, थोरातांचा नातेवाईक म्हणून त्याची ओळख'
'आमच्यासाठी सत्यजित तांबे महत्त्वाचा नाही. तो कधीही महत्त्वाचा नेता नव्हता. असे अनेक झाले, असं विधान काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी बीबीसीशी याबाबत बोलताना केलं आहे.
विधान परिषदेचे निकाल येण्यास सुरुवात झालीय. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. इथं अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शभांगी पाटील यांच्यात लढत होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी सत्यजित तांबेंवर टीका केली.
"कोण राहुल गांधी यांच्या जवळचं आणि कोण लांबचं? लाखो लोक आहेत. सत्यजित तांबे कोण आहे? काँग्रेस युवकचा अध्यक्ष होता म्हणून सत्यजित तांबे झाला नाहीतर तो कोण? तो अजिबात मोठा नाही. बाळासाहेबांचा नातेवाईक म्हणून त्याचं मोठेपण बाकी काही नाही. मला त्याला महत्त्वच द्यायचं नाही, " असं जगताप यांनी म्हटलंय.
तसंच सत्यजित यांच्या बंडखोरीत बाळासाहेब थोरात यांचा रोल नसल्याचं जगताप यांनी सांगितलंय.
"भाजपने सगळीकडे हेच केलं. पैशांनी काहीही करू शकतो ही त्यांची मानसिकता आहे. काँग्रेस पक्षाने जे केलं ते केलं. आता कारवाई झालेली आहे आणि ती योग्य आहे," असं भाजपवर टीका करताना जगताप म्हणाले आहेत.

तांबेंनी विश्वासघात केला - नाना पटोले
सुधीर तांबे यांनी पक्षाबरोबर विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
"नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणताही निर्णय गडबडलेला नाही. ठरल्याप्रमाणे सर्व झालं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की मुलाला लढायचं आहे तर तसा निर्णय घेतला असता. पण त्यांनी विश्वासघात केला," असं नाना पटोले यांनी म्हटलंय.
तसंच सुधीर तांबे महाविकास आघाडीचे उमेदवार होते, पण त्यांनी निर्णय बदलला. पुढे काय ठरवायचं ते हायकमांड पाहिल, असं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
पटोले यांनी या संपूर्ण प्रकरणात बाळासाहेब थोरात दोषी नसावेत असं आम्हाला वाटतं पण हायकमांड यावर रिपोर्ट घेईल तेव्हा स्पष्ट होईलच, असंही पुढे म्हटलंय.
नाशिकमध्ये काय घडलं?
काँग्रेसने सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला.
त्यानंतर काँग्रेसनं सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबन केलं. सत्यजित तांबेंवरही कारवाई करण्यात आली.
नाशिकमध्ये भाजपनं त्यांचा उमेदवार दिला नाही. तसंच भाजपने अधिकृतपणे कुणाला पाठिंबादेखील जाहीर केलेला नाही. पण भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र सत्यजित तांबेंना भाजपचे लोक मतदान करतील, असं म्हटलं.
अमेरिकेत शिक्षण ते राजकीय कारकिर्दीची सुरूवात
महाराष्ट्रातल्या तरुण राजकारण्यांमध्ये सत्यजित तांबेंची गणती होते. येत्या 27 सप्टेंबरला ते वयाची चाळीशी पूर्ण करतील.
विशीपर्यंत शिक्षण पूर्ण करून, पुढचे वीस वर्षे राजकीय प्रवासही लक्षणीय आहे. अर्थात, त्यांना राजकीय वारसा आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्यांचे सख्खे मामा.
पण सत्यजित तांबेंच्या राजकारणाची सुरुवात झाली ती अहमदनगर जिल्हा परिषदेतून. 'झेडपीचा सदस्य' हे त्यांचं राजकारणातलं पहिलं शासकीय पद. या पदापर्यंत पोहोचण्यापूर्वी ते काँग्रेसचे सदस्य, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकरी होतेच.
नगरमधल्या संगमनेरमध्ये डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांच्या पोटी सत्यजित तांबेंचा 1983 साली जन्म झाला. तांबे कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित. त्यांच्या आई दुर्गाबाई या स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे कन्या. त्यामुळे असा दणकट वारसा सत्यजित तांबेंना आहे.

पुणे विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर सत्यजित तांबे पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. हॉर्वर्ड केनेडी स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्र आणि राज्यशास्त्रात सत्यजित तांबेंनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि मायदेशी परतले.
2000 साली सत्यजित तांबेंनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते काँग्रेसचे सदस्य आणि नंतर भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे सदस्य होते. 2000 ते 2007 या काळात ते NSUI चे महाराष्ट्र सरचिटणीस होहेत.
मात्र, त्यांच्या खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली, ती 2007 साली. कारण या वर्षी ते अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि याच वर्षे ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसही बनले. सत्यजित तांबेंचं यावेळी वय होतं 24 वर्षे.
जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होणारे ते तरुण सदस्य ठरले होते. 2017 पर्यंत ते जिल्हा परिषदेत कार्यरत होते.
जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात सत्यजित तांबेंनी 'वॉटर एटीएम' नावाची संकल्पना राबवली होती. एक रुपयात 5 लिटर पिण्याचं शुद्ध पाणी असं या योजनेचं स्वरूप होतं.
सत्यजित तांबेंचं 'सुपर' मिशन
2007 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनलेले सत्यजित तांबे पुढे 2011 साली प्रदेश उपाध्यक्ष बनले.
2018 साली झालेल्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत त्यांनी अमित झनक आणि कुणाल राऊत यांचा पराभव केला. काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना सत्यजित तांबेंच्या हातात युवक काँग्रेसची धुरा आली होती. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर त्यांच्या नेतृत्त्वाकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
'सुपर 60' आणि 'सुपर 1000' या त्यांच्या प्रकल्पांनी काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळानंही लक्ष वेधून घेतलं.

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 'सुपर 60' प्रकल्प सत्यजित तांबेंनी राबवला गेला. 2014 साली काँग्रेस ज्या विधानसभा मतदारसंघात पराभूत झाली होती, त्यातील 60 मतदारसंघांत युवक काँग्रेसनं मिशन स्वरूपात काम केलं.
युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सरचिटणीस स्नेहल डोके-पाटील यांच्या माहितीनुसार, "हा प्रकल्प यशस्वी झाला होता. कारण या प्रकल्पाअंतर्गत युवक काँग्रेसनं निवडलेल्या जागांपैकी 28 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. अमित झनक, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख यांचे मतदारसंघही या 'सुपर-60' मध्ये होते."
'सुपर-1000' हे आणखी एक मिशन सत्यजित तांबेंनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आखला होता. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील ज्या तरुणांना राजकारणात विविध पदांवर काम करायचं आहे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची सोय युवक काँग्रेसनं करून दिली.
सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरावेळी युवक काँग्रेसच्या जवळपास 5 हजार जणांना पूरग्रस्त भागात पाठवून मदत करण्याचं काम असो वा कोव्हिड काळात वॉररूम स्थापन करून हेल्पलाईन चालवणं असो, असे उपक्रमही तांबेंनी त्यांच्या कार्यकाळात राबवले.
तसंच, तांबेंच्या नेतृत्त्वाच्या काळातच तृतीयपंथीय सारंग पुणेकर या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या बनल्या. तसंच, लॉकडाऊनच्या काळात युवक काँग्रेसनं जवळपास 500 तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








