पुणे काँग्रेसः छत्री दुरुस्तीच्या उपक्रमावरुन कॉंग्रेस का झाली ट्रोल?

पुणे काँग्रेस, छत्री, पाऊस

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे

'आपल्या जवळची नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करून दिली जाईल' अशा आवाहनाचे बॅनर पुणे काँग्रेसनं पक्ष कार्यालयाच्या आवारात लावले आणि पुण्यासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. कुणी काँग्रेसच्या या 'छत्री दुरुस्ती उपक्रमा'ची खिल्ली उडवतंय, तर कुणी कौतुक करतंय.

हे सगळं प्रकरण काय आहे आणि सोशल मीडियासह पुणेकरांची यावर प्रतिक्रिया काय आहे, हे आपण जाणून घेऊ.

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम हाती घेतला आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पुण्यातील शिवाजीनगर भागातील कॉंग्रेस भवनच्या प्रांगणात छत्र्या दुरुस्त करुन दिल्या जात आहेत. या उपक्रमाबाबतचा फ्लेक्सचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चांना सुरुवात झाली.

या उपक्रमाची एकीकडे खिल्ली उडवण्यात आली तर काहींनी या उपक्रमाचे समर्थन देखील केले.

कुणी म्हणतंय, 'कॉंग्रेसच कॉंग्रेसच्या मुळावर उठली आहे', तर कुणी म्हणतंय, 'कॉंग्रेस सिझनल पॉलिटिक्स करत आहे'.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

तर "गेल्या 10 वर्षात कॉंग्रेसने त्यांचे मैदान लहान मुलांना क्रिकेट खेळण्यास देण्यापासून ते आता छत्री दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येतंय. पुढे लग्न सोहळ्यासाठी मैदान दिलं तर आश्चर्य वाटायला नको," असं म्हणत भारतीय जनता पक्षाच्या पुण्याच्या ट्विटर हॅंडलवर म्हणण्यात आलं आहे.

दुसरीकडे, काही लोकांनी सोशल मीडियावर या उपक्रमाचे कौतुक देखील केले आहे.

"एखाद्या राजकीय पक्षाने छत्री दुरुस्त करुन देण्यात काय अडचण आहे? रक्तदान शिबिरं, आरोग्य तपासण्या, तिळगुळ वाटपाचे कार्यक्रम, हळदीकुंकू, मॅरेथॉन स्पर्धा भरवल्या तर चालतात तर घरातल्या वस्तू दुरुस्त करुन देण्याचा एखादा कार्यक्रम ठेवला तर त्यात खिल्ली उडवण्यासारखे काही नाही," असे देखील काहींनी म्हंटले आहे.

छत्री दुरुस्तीचा उपक्रम हाती का घेण्यात आला ?

या छत्री दुरुस्ती उपक्रमावरुन सोशल मीडियावर कॉंग्रेसला ट्रोल करण्यात येऊ लागलं. बीबीसी मराठीने या उपक्रमामागील कॉंग्रेसची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पुणे काँग्रेस, छत्री, पाऊस

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

या उपक्रमाबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, ''या उपक्रमातून छत्री दुरुस्त करणाऱ्यांना रोजगार मिळतोय. काहींना वाटतं इतका किरकोळ उपक्रम का हाती घेण्यात आला, परंतु ही किरकोळ बाब नाहीये. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. कोरोनामुळे आणि पावसामुळे छत्री दुरुस्त करणारे लोक मिळत नाहीत, आम्ही ते कॉग्रेस भवनमध्ये उपलब्ध करुन दिले आहेत.

ते पुढे म्हणतात, "छत्री दुरुस्त करण्यासाठी कोण मिळत नसल्याने नागरिकांना नवीन छत्री घेण्याचा भुर्दंड पडतो. कोरोनामुळे लोकांना आर्थिक चणचण आहे. त्यात छत्री तुटली असेल तर नवीन घेण्याशिवाय लोकांना पर्याय नाही. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात चुकीचे काही नाही. उपक्रम छोटा असला तरी लोकांना त्याचा फायदा होतोय. सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम पुढे आणला आहे.''

एकीकडे छत्र्या दुरुस्ती तर दुसरीकडे मोफत छत्र्या वाटप

मोहन जोशी यांच्या पुढाकारातून कॉंग्रेस भवनमध्ये छत्र्या दुरुस्त करण्याचा उपक्रम राबविला जात असताना दुसरीकडे पर्वती भागामध्ये कॉंग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांच्यामार्फत नागरिकांना मोफत छत्र्या वाटण्यात आल्या.

या उपक्रमासाठी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे देखील उपस्थित होते. त्यामुळे पुणे शहर कॉंग्रेसमध्ये दोन गट पडलेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

छत्री दुरुस्ती उपक्रमाबाबत लोकांना काय वाटतं?

निवडणुका जवळ आल्या की विविध पक्ष छोटे मोठे उपक्रम राबवत असतात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे विविध पक्षांकडून उपक्रमांची सुरुवात करण्यात येत आहे. कोणी रक्तदान शिबीर घेतंय तर कोणी छत्र्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतंय.

पुणे काँग्रेस, छत्री, पाऊस

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

अशाच एका उपक्रमात भारतीय जनता पक्षाकडून मोफत मिळालेली छत्री दुरुस्त करण्यासाठी हरी नाईक कॉंग्रेस भवनमध्ये आले होते. या उपक्रमाबाबत त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ''छत्र्या दुरुस्त करुन देणं हा उत्तम उपक्रम आहे. लोकांना चांगली सेवा मिळतीये. इथे भेदभाव न करता सर्वांना छत्री दुरुस्त करुन मिळतीये. लॉकडाऊनमुळे छत्र्या दुरुस्त करणारे मिळत नाहीत. या उपक्रमामुळे फायदा होतोय.''

तर आपली तुटलेली छत्री घेऊन दुरुस्तीसाठी आलेल्या गृहिणी लता अडसूळ म्हणाल्या, ''हा उपक्रम गोरगरिबांसाठी चांगला आहे. अनेकांकडे छत्री दुरुस्त करण्यासाठी देखील पैसे नसतात अशावेळी या उपक्रमाचा फायदा होतोय.''

'माझी पैशांची अडचण दूर झाली'

''गेली पाच दिवस इथे बसून मी छत्र्या दुरुस्त करतोय. रोज 25 ते 30 लोक छत्र्या दुरुस्त करुन घेतात. लॉकडाऊनमुळे माझा व्यवसाय देखील होत नव्हता. या उपक्रमाच्या निमित्ताने कॉंग्रेसने मला इकडे बोलावून घेतले. मला दिवसाला अकराशे रुपये दिले जातात. रस्त्यावर बसून व्यवसाय करुन मला दोन तिनशे रुपये मिळायचे. मला पैशांची फार अडचण होती. ती यामुळे दूर झालीये,'' कॉंग्रेस भवनमध्ये छत्री दुरुस्त करणारा रोहिदास कांबळे सांगत होता.

कॉंग्रेसने या आधी कुठले उपक्रम राबवलेत?

पुणे कॉंग्रेसने याआधीही असे बरेच हटके उपक्रम राबवले आहेत.

लॉकडाऊनमध्ये रिक्षावाल्यांसाठी अनुदान मिळण्यासाठी पुढाकार घेतला होता. सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना प्राथमिकतेने लस देण्यात यावी अशी मागणी देखील कॉंग्रेसने केली होती.

मजुरांना, असंघटीत कामगारांना अनुदान मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)