अक्षता तेंडुलकरांचा आरोप- 'शिवसैनिकांनी आंदोलन संपल्यावर मागून हल्ला केला' #5मोठ्याबातम्या

अक्षता तेंडुलकर

फोटो स्रोत, Akshata tendulkar/BJP Facebook

1. शिवसैनिकांनी मागून हल्ला केल्याचा अक्षता तेंडुलकरांचा आरोप

राम मंदिराच्या जमीन खरेदी दरम्यान भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून शिवसेनेने टीका केल्यानंतर बुधवारी (16 जून) सेना भवनसमोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन सुरु असताना शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

या प्रकरणी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली आहे अशी टीका अक्षता तेंडुलकर यांनी केली.

त्या म्हणाल्या, "आंदोलन संपल्यानंतर आम्ही गाडी काढण्यासाठी गेलो असताना शिवसैनिकांनी मागून हल्ला केला. आम्हाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आला," असा आरोप करण्यात आला आहे.

2. राम मंदिर जमीन घोटाळ्याचा आरोप करणारे संजय सिंह न्यायायलात जाणार

अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हे प्रकरण न्यायालयात नेण्याची तयारी करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय सिंह

फोटो स्रोत, Twitter

ते म्हणाले, "मी हे प्रकरण उघड केल्यानंतर कारवाईच्या अपेक्षेने केंद्र सरकार आणि भाजपची वाट पाहिली. पण भाजप सरकारचा विश्वास भगवान रामावर नव्हे तर मालमत्ता विक्रेते आणि भ्रष्टाचाऱ्यांवर आहे. हे प्रकरण न्यायालयात नेण्याची तयारी सुरू आहे."

लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

"ज्या कराराबद्दल बोलले जात आहे तो करार 18 मार्च 2021 रोजी रद्द करण्यात आला होता. राम जन्मभूमी ट्रस्टमध्ये जो जमीन घोटाळा झाला त्यावर कारवाई करण्याऐवजी भाजप सरकार मालमत्ता विक्रेत्यांच्या बाजूने उभी आहे," असा आरोपही संजय सिंह यांनी केला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान, संजय सिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची माहिती 'आप'ने ट्वीट करून दिली आहे. भाजपने कितीही गुंडगिरी केली तरी राम मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

3. 'धनगर समाजाचे नेतृत्त्व संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी करावे'

धनगर आरक्षणासाठी आता खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीने पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत केली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

धनगर समाजाचा वापर केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नेत्यांकडून केला जात आहे त्यामुळे धनगर समाजाच्या प्रश्नांचे नेतृत्त्व खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी करावं या मागणीसाठी कृती समितीचे नेते येत्या दोन दिवसांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेणार आहेत.

व

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी धनगर समाजाच्या प्रश्नांचाही समावेश करून घ्यावा अशी कृती समितीची भूमिका आहे. धनगर समाजातील नेत्यांनी राजकीय स्वार्थ साधल्यानंतर समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत समाजातील नेत्यांनी बैठकीत गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.

आमच्या समाजाचा विचार न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीची महापूजाही करू देणार नाही, असा इशारा शालिवाहन कोळेकर यांनी दिला आहे.

4. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची बैठक

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्य सरकारची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांचा आढावा घेतला.

आगामी आव्हान पाहता औषधांचा साठा, वैद्यकीय उपकरणे, ग्रामीण भागातील औषधांचा पुरवठा याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी लसीकरण करण्यासोबत निर्बंध आणि नियमांचे काटकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचं सांगितलं नाही. अन्यथा दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता दोन महिन्यातच तिसऱ्या लाटेचे आव्हान आपल्या समोर असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

औषध, ऑक्सिजन उपलब्धता, बेड्स, वैद्यकीय उपकरणे याचा पुरेसा साठा आपल्याकडे राहिल याचे नियोजन करण्याच्या सूचनाही प्रशासनला देण्यात आल्या आहेत. यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

5. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतीची कामं सुरू झाली आहेत. काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी पडत असल्याने भाताच्या पिकांच्या रोपांसाठी हे वातावरण पोषक असल्याची स्थिती आहे. अॅग्रोवनने हे वृत्त दिलं आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे.

पाच जून रोजी राज्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर राज्यात अनेठ ठिकाणी चांगला पाऊस पडला. विशेषत: पश्चिमेकडील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधार सरी सुरू होत्या.

सोमवारी (14 जून) सकाळी आठवाजेपर्यंत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 36 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 14 मिलिमीटर पाऊस पडला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)