अजित पवारांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर : 'कोणी काहीही विधान केलं तरी त्याला महत्त्व नाही' #5मोठ्याबातम्या

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'कोणी काहीही विधान केलं तरी त्याला महत्त्व नाही', अजित पवारांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या भूमिकांवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आक्रमक वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

नाना पटोले यांनी 2024 च्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. एवढेच नव्हे तर हायकमांडने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.

आगामी निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्या अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असताना काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीतले मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसते.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "राज्यातील निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे कोणी काहीही विधानं केली तरी त्याला महत्त्व नाही."

लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढवाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय, तसंच 2024 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पाच वर्षे टिकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

2. 'या' कारणामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपत मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र अधिकारी यांच्यासोबत भाजपचे 74 पैकी केवळ 51 आमदारच राज्यपालांच्या भेटीसाठी उपस्थित असल्याने खळबळ उडाली.

भाजपचे उर्वरित 23 आमदार अनुपस्थित का होते यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

शुभेंदु अधिकारी

फोटो स्रोत, Sanjay Das

विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले नेते आता पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करत असताना ही घटना समोर आल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. भाजपमध्ये मोठी फूट पडणार का? अशी चर्चा सुरू आहे.

पण अशा प्रकारची कुठलीही बंडखोरी होणार नाही असा दावा भाजपने केला आहे. शुभेंदु अधिकारी यांच्यासोबत भाजपचे 23 आमदार का गेले नाहीत यासंदर्भात भाजपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुकूल रॉय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकूल रॉय आपल्याच घरातील सदस्य असून त्यांनी विश्वासघात केला नाही अशी प्रतिक्रिया यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिली. पण ज्यांनी विश्वासघात केला त्यांच्यासाठी पक्षात स्थान नाही असंही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

3. श्रीरामांच्या नावावर 'विश्वासघात' म्हणजे अधर्म, राहुल गांधींची प्रतिक्रिया

अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदी प्रकरणातील कथित घोटाळा प्रकरणावरून आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षानंतर आता काँग्रेसनेही भाजपवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हा भ्रष्टाचार म्हणजे अधर्म असल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, "कोट्यवधी लोकांनी आस्था आणि श्रद्धेपोटी परमेश्वराच्या चरणी दान अर्पण केले. या निधीचा दुरुपयोग अधर्म आहे. भाविकांच्या आस्थेचा हा मोठा अपमान आहे."

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

प्रियांका गांधी यांच्या टीकेनंतर आता राहुल गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "प्रभू श्री राम हे स्वत: न्याय आहेत. सत्य आहेत. धर्म आहेत. त्यांच्या नावाने धोकेबाजी हा अधर्म आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार तेजनारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी आरोप केलेत की "राममंदिरासाठी 2 कोटी रूपयांनी खरेदी केलेली जमीन काही मिनिटातच 18.5 कोटी रूपयांमध्ये पुन्हा खरेदी केली गेली."

रामजन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी हे आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत खोडून काढले. माध्यमांना दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटलंय की "श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जेवढी जमीन विकत घेतली आहे तिची किंमत खुल्या बाजारातल्या किमतीपेक्षा खूप कमी आहे."

4. वाखरी ते पंढरपूर पायी वारी होणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी वारीच्या पालख्या बसनेच नेण्यात येणार असल्या तरी वाखरी ते पंढरपूर दरम्यानचे दीड किलोमीटर पायी वारी होणार आहे. यंदा आषाढीची वारी पायी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी आणि देवस्थानांकडून करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालख्या एसटी बसने नेण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी भूमिका राज्य सरकारने घेतली.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

सरकारच्या सुधारित नियमावलीनुसार मानाच्या दहा पालख्यांनाच वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 वारकरी तर उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांच्या सहभागासाठी परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या 10 पालख्यांसाठी विशेष 20 बस देण्यात आल्या आहेत.

वारी

पायी वारीत यंदा खंड पडू देऊ नका असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दिला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी कोण आहेत तुषार भोसले? असं विचारत प्रतिक्रिया दिली. कोरोनाचे संकट असल्याने वारकऱ्यांची चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं.

5. निवृत्त पोलिसाने शुल्लक वादातून आपल्याच दोन मुलांवर पाच गोळ्या झाडल्या

नवी मुंबईत सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्याच दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी आहे. शुल्लक कारणावरून वाद झाल्याने राग अनावर होऊन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 2 मध्ये निवृत्त पोलीस भगवान पाटील राहतात. त्यांची दोन्ही मुलं त्यांच्यापासून वेगळी राहतात. गाडीचा विमा भरण्यासाठी भगवान पाटील यांनी दोन्ही मुलांना घरी बोलवलं होतं. यावेळी तिघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भगवान पाटील यांचा राग अनावर झाला आणि त्यांना आपल्याच दोन मुलांवर रिव्हॉल्वरने पाच गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या विजय पाटील यांच्या हाताला, खांद्याला आणि पायाला लागल्या. तर दुसरा मुलगा सुजय पाटील याच्या हाताला लागून गोळी निघून गेली.

याप्रकरणी रबाळे पोलिसांनी भगवान पाटील यांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)