नाना पटोले : साकोली ते मुंबई व्हाया दिल्ली नानांचा राजकीय प्रवास

फोटो स्रोत, Nana Patole/facebook
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली होती. 4 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात.
काँग्रेसचे नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलांसारख्या दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा पराभव केला आणि ते 'जायंट किलर' ठरले.
मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले.
नाना पटोलेंच्या या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
'शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता'
नाना पटोले आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले. मात्र भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले.
"शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता, अशी नाना पटोलेंची ओळख आहे," असं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण व्यक्त करतात.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले यांचं नाव जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.
चव्हाण यांनी म्हटलं, "नाना पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारे नेते आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रुपानं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील."
तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं, की नाना पटोले 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, तर एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच अनेक वर्षांपासून त्यांना सभागृहातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
आक्रमक आणि अनुभवी नेतृत्व
नाना पटोलेंना त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखलं जातं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्ष प्रचारात कुठेही दिसत नाही, अशी चर्चा सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढली होती.
या यात्रेदरम्यान त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती.
"भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासनं देण्यात येतात. त्याची पूर्तता होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत," असं त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Nana Patole/facebook
नाना पटोलेंच्या राजकीय प्रवासाविषयी महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात, "2019ची लोकसभा निवडणूक वगळता कुठल्याही पक्षात असो वा स्वतंत्र लढलेले असो, पटोले कधीच हरले नाही. निवडणूक जिंकायची कशी, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. मोदींविरोधात देशभरातल्या 282 खासदारांपैकी कुणीच आवाज उठवला नाही, पण पटोलेंनी ते केलं आणि मोदींचा एक चॅलेंजर म्हणून ते वर आले."
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यानंतर नाना पटोलेंना त्यांच्या आक्रमक नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आले.
तेव्हा त्यांनी म्हटलं, "महाराष्ट्र विधानसभेची देशभरात वेगळी प्रतिष्ठा राहिली आहे. ती कायम ठेवण्याची मी प्रयत्न करेन. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षाला कधीकधी आक्रमक व्हावं लागतं. वेळेनुसार आक्रमकता वापरली जाईल."
दलितांचा विरोध?
2019च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोलेंना काँग्रेसकडून नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पटोलेंच्या नावाची चर्चा होत असतानाच नागपूरच्या काही आंबेडकरवादी संघटनांनी त्यांना तिकीट न देण्याची मागणी राहुल गांधींकडे केली.
2006 साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीमध्ये भोतमांगे कुटुंबातील चार लोकांची कुणबी समाजातील काही लोकांनी हत्या केली होती. त्यावेळी कुणबी समाजाच्या आरोपींच्या समर्थनात नाना पटोलेंनी जाहीर भूमिका घेतली होती त्यावरून त्यांना विरोध झाला होता.

फोटो स्रोत, Nana Patole/facebook
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही स्पष्ट केलं होतं, की कुठल्याही परिस्थितीत ते पटोलेंना पाठिंबा देणार नाही. "त्यांची खैरलांजी प्रकरणातली भूमिका संशयास्पद होती. ते आरोपींच्या पाठीशी उभे राहिले म्हणून पटोलेंना तिकीट देणं काँग्रेससाठी धोक्याचं ठरेल," असंही त्यांनी म्हटलं होतं.
यावर पटोले यांनी 'हफिंगटन पोस्ट'शी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. "मी जातीयवादी नाही. मी त्यावेळी आरोपींना संरक्षण दिलं असतं तर लोकांनी तेव्हाच माझी राजकारणातून हकालपट्टी केली असती. नागपुरातून मला तिकीट मिळतंय म्हणून विरोधकांनीच शिजवलेला हा कट आहे."
लोकसभेत पराभव, विधानसभेत विजय
2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली.

फोटो स्रोत, Nana Patole/facebook
या लढतीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपच्या परिणय फुके यांचा पराभव केला. 2009 मध्ये नाना पटोले याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तर 2014मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. चार वर्षांनंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये परतले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








