उद्धव ठाकरे सरकार: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मराठीत अभिभाषण

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठीमध्ये अभिभाषण करत विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिभाषणाच्या सुरुवातीला त्यांनी नवनिर्वाचित सदस्य आणि मुख्यमंत्र्यांचे मराठीत स्वागत केले. कोश्यारी यांनी आपल्या पदाची शपथही मराठीमध्येच घेतली होती.
ते अभिभाषणात म्हणाले, "हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी पावलं उचलू. पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा, दुष्काळाचीही उल्लेख त्यांनी केला. गरिबांचं पोट भरण्यासाठी दहा रुपयात जेवणाची थाळी देणार असंही राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं."
शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्न करु. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी माझे सरकार प्रयत्न करेल. बेरोजगारी कमी करताना भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य देऊ असंही राज्यपाल म्हणाले.
माझे शासन मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी मुंबईत आणि ऐरोलीयेथे केंद्र स्थापन करु, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपाययोजना करु तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करेल अशी घोषणा राज्यपालांनी केली. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र अशी घोषणाही दिली.
तत्पुर्वी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं.
आपली मैत्री लक्षात घेऊन विरोधी पक्षाकडून दिलदार वर्तनाची अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करताना म्हटलं. त्यांच्याबरोबर सर्वपक्षीय नेत्यांनी
या अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा येऊ असं सांगितलं होतं पण टाइमटेबल दिलं नव्हतं. जनतेचा कौल आम्हाला मिळाला पण त्याचा सन्मान काही कारणानं करता आला नाही असं त्यांनी सांगितलं. "मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसाना, मै समुंदर हुँ, लौटकर आऊंगा" अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारला इशारा दिला.
मी विरोधीपक्षनेतेपदाचा सन्मान ठेवेन असं सांगत त्यांनी जे प्रकल्प आम्ही सुरु केले त्याचं उद्घाटनही कदाचित आमच्याच हस्ते होईल असा इशारा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना दिला.
दरम्यान, आज सकाळी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचं अभिनंदन केलं.
"विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत निवडलं जाण्याची महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे. कालपासून सत्ताधारी पक्षाकडूनही आम्हाला तसं आवाहन केलं जात होतं. त्यानुसार आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर भाजपनं किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला," असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे विधानसभेत बोलत होते. "मी पहिल्यांदा सभागृहात आलो आहे. आम्हाला सांभाळून घ्या. अनावधानाने काही चुका घडल्या तर तुम्ही आम्हाला समजही द्या आणि सांभाळून घ्या," असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, ANI
एकमतानं निवड झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंचं अभिनंदन केलं. "सत्ताधारी पक्षानं विनंती केली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा लौकिक जपला जावा यामुळे आम्हीदेखील बिनविरोध निवडणुकीला मान्यता दिली," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"लोकहिताच्या दृष्टीनं विरोधक जेव्हा सभागृहात प्रश्न मांडतील, तेव्हा तुमच्याकडून न्याय मिळेल. महाराष्ट्राच्या विधानसभेची जी परंपरा आहे, ती तुमच्याकडूनही जपली जाईल," अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
"शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडले आहेत आणि विधानसभा अध्यक्ष म्हणूनही आपण शेतकऱ्यांना न्याय द्याल," असंही फडणवीस यांनी पटोलेंचं अभिनंदन करताना म्हटलं. विरोधीपक्ष म्हणून सहकार्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंचं अभिनंदन करताना बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करणाऱ्या विरोधी पक्षाचेही त्यांनी आभार मानले.
'बिनविरोध निवड करून विरोधकांनी कटुता टाळली'
शेतकऱ्यांसाठी कायम झटणाऱ्या नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाना पटोलेंचं अभिनंदन केलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षालाही शुभेच्छाही दिल्या.
"बिनविरोध निवडणूक होणं हे प्रगल्भ, परिपक्व लोकशाहीचं लक्षण आहे. विरोधी पक्षानं आपला उमेदवार देऊन संख्या नसताना पहिल्याच दिवशी कटुता वाढवणं, याचे पडसाद नंतरच्या काळात उमटू शकतात. अध्यक्ष हा कोणाचाही नसतो. त्याचं काम हे विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांना समान न्याय देणं हे असतं. खासकरून विरोधी पक्षाकडे अधिक लक्ष देणं हे त्याचं काम असतं. कारण त्याला समर्थपणानं हे सभागृह चालवायचं असतं," असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
'नाना पटोलेंसारख्या शेतकरी नेत्याच्या निवडीचा आनंद'
आज जी अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली, त्याचं मी स्वागत करतो. नाना पटोलेंसारखा शेतकरी नेता त्या पदावर बसला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी पटोलेंचं अभिनंदन केलं.

फोटो स्रोत, FACEBOOK
त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी भाजपनं केलेल्या सभात्यागावरही त्यांनी टीका केली.
"कालही (विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी) भाजपकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन झालं असतं तर बरं वाटलं असते. ते झालं नाही याची खंत आहे," असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








