उद्धव ठाकरे 'हिंदुत्व' जपण्यासाठी धडपडतायत का?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानं भाजपसोबतचा त्यांनी तीस वर्षांचा घरोबा तोडला.

भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र असलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केल्यानं राज्यासह देशात राजकीय भूकंप झाला.

धर्मनिरपेक्षता या मूल्यावर आपले पक्ष काम करतात, असं सांगणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेची आगामी काळात कोंडी होईल का, हा प्रश्न सहाजिकपणे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याचाच प्रत्यय मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या दोन्ही पत्रकार परिषदांमधून दिसून आला.

शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर इतर सहा जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळानं मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना 'सेक्युलर' शब्दाबाबत प्रश्न विचारला.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

महाविकास आघाडीनं जे समान किमान कार्यक्रम जाहीर केला, त्याच्या इंग्रजी आवृत्तीत 'सेक्युलर' शब्द आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला गेला, "शिवसेना सेक्युलर झालीय का?" त्यावेळी उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. त्यावर "सेक्युलर शब्दाचा अर्थ काय? घटनेत जे आहे ते आहेच," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वेळ मारून नेली.

त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी उपस्थित पत्रकारानं विचारलं, "तुम्ही जो कुर्ता घातलाय, तो आवडता कलर आहे का?" उद्धव ठाकरे यांनी यावेळी भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "हा जन्मभरचा आवडता रंग आहे आणि हा कुठल्याही लाँड्रीत गेला तरी धुतला जाणार नाही."

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter/@OfficeofUT

फोटो कॅप्शन, अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही ते त्याच भगव्या कपड्यांवर होते. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वाकारण्यासाठी मंत्रालयात आले असतानाही उद्धव ठाकरे भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानं आपला हिंदुत्वाची ओळख पुसट होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे धडपडू लागले आहेत का, या प्रश्नाचा आढावा बीबीसी मराठीनं घेतलाय.

'राजकीय नेते प्रतिकांमधून भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न करतात'

तत्पूर्वी अशा कपड्यांमधून कुठली एखादी विचारधारा किंवा राजकीय भूमिका दर्शवली जाऊ शकते का, याबाबत आम्ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर सायली राजाध्यक्ष यांच्याशी बातचीत केली.

रंगांच्या माध्यमातून राजकीय विचार केला जातो, असं सायली राजाध्यक्ष म्हणतात.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

राजाध्यक्ष पुढे म्हणतात, "विश्व हिंदू परिषद किंवा भाजपचे कार्यकर्ते केशरी रंगाचे कपडे परिधान करणं किंवा नीलम गोऱ्हे यांच्या साड्या तुम्ही पाहिल्याच असाल.

राजकीय नेते असं प्रतिकांमधून आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न करतातच, सोबत बहुतांश लोकही तसा विचारही करतात. मात्र, नुसते भगवे कपडे घालून लोकांच्या मनावर काही परिणाम होईल का, याबाबत मला शंका आहे."

मात्र, "उद्धव ठाकरेंनी भगवे कुर्ते घालून जरी तसा प्रयत्न केला असला, तरी तेवढ्यातून त्यांची हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट होईल, असं वाटत नाही. मुळातच राष्ट्रवाद ही दाखवण्याची गरज नसते. मग कुठलाही पक्ष असो," असंही राजाध्यक्ष म्हणतात.

मात्र, 'शिवसेना काल, आज आणि उद्या' पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणतात, "उद्धव ठाकरेंना आता हा दिखाऊपणा करत राहावं लागेल. पण प्रत्यक्षात हिंदुत्वाच्या बाजूनं कृती करता येणार नाही. तसं काही केल्यास त्याच क्षणी काँग्रेस पाठिंबा काढून घेईल. राष्ट्रवादी बाहेर पडेल की नाही माहित नाही. पण काँग्रेसला ते अजिबात चालणार नाही. किंबहुना, याच मुद्द्यावरून काँग्रेस लांब राहू पाहत होती."

तर, गेल्या 30 वर्षात महाराष्ट्रात शिवसेनेची हिंदुत्वाची व्होटबँक तयार झालीय. ती कायम राखण्याच्या आव्हानामुळं हे करावं लागतं, असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी म्हणतात.

मनोहर जोशींच्या शपथविधीवेळीही सेनेनं भगव्या रंगाचा वापर केला होता का?

मनोहर जोशींच्या रूपानं ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, त्यावेळी असा प्रतिकांचा वापर केला नव्हता, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली. प्रकाश अकोलकर हे मनोहर जोशींच्या शपथविधीला उपस्थितही होते.

अकोलकर सांगतात, "मनोहर जोशींनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना असं काहीही केलं नव्हतं. कारण तेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार असल्यानं असं काही करण्यचा प्रश्नच नव्हता. ते पूर्णपणे सरकारी स्टाईल होतं. शिवाय, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे हेही समोर खाली बसले होते."

मनोहर जोशी, बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, "सध्या देशात हिंदुत्वाचं वातावरण आहे. आधी ज्यावेळी शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला होता, तेव्हा काँग्रेसची राजवट होती. आता तशी स्थिती नाही. ही सर्व सत्ताकारणाची लढाई आहे. धर्मकारणाचा वापर सत्तेसाठी केला जातोय," असं अकोलकर म्हणतात.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यानं उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा मुद्दा कायम राखणं आव्हानात्मक असेल का, असा प्रश्न निर्माण होतोच.

मात्र, शिवसेनेनं काँग्रेससोबत जाणं हे काही नवीन नाही, असं प्रकाश अकोलकर म्हणतात : "शिवसेना अनेकदा काँग्रेससोबत गेली आहे. सत्तेचं राजकारण वेगळं आणि मतपेट्यांचं राजकारण वेगळं असतं. मुंबईच्या महापौपदासाठी मुरली देवरा, राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना बाळासाहेब असताना शिवसेनेनं मग आताही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर काँग्रेसला समर्थन दिलं होतं. पण पुढे त्यांना या मुद्द्यांची अडचण झाल्याचं तसं काही दिसून आलं नाही."

...पण यापुढे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर सेनेला तडजोड करावी लागेल का?

तुमची कोणतीही विचारधारा असो, कुठलीही आघाडी असो, राजकारणात तडजोडी कराव्याच लागतात, असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी म्हणतात.

ते पुढे म्हणाले, "आघाडी कुठलीही असो, तिथे काहीतरी तडजोड करावी लागतेच. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं 1999 साली सरकार बनलं, तेव्हा सोनिया गांधी परदेशी असल्याचा पवारांचा मुद्दा होताच. मात्र, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आलीच. ज्यावेळी तुम्ही आघाडी करता, त्यावेळी वादग्रस्त मुद्द्यांवर तडजोडी कराव्याच लागतात."

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Twitter/@PawarSpeaks

या तडजोडींमुळं शिवसेनेची गळचेपी होईल का, याबाबत प्रकाश अकोलकर म्हणतात, "शंभर टक्के गळचेपी होणार आहे. कारण शिवसेनेची मतपेटी हिंदुत्वाची आहे आणि बऱ्याच शिवसैनिकांना हे (काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं) मान्य नाही."

मात्र, विचारधारेत केलेल्या तडजोडीमुळं लोक शिवसेनेपासून दुरावतील का, याबाबत प्रकाश अकोलकर म्हणतात, "लोकांची कामं केल्यास विचारधारा हा मुद्दाच राहणार नाही. कारण लोकांना शेवटी काय हवंय? विचारधारा हा मुद्दा दुय्यम ठरेल आणि कामांना प्राधान्य दिलं जाईल."

हिंदुत्वाच्या नावानं बाळासाहेबांनी जमवलेली मतं जातील की काय, असं उद्धव ठाकरेंना भीती असेल, पण लोकांच्या दृष्टीनं आपली कामं किती होत आहेत, हे महत्त्वाचं असेल, असंही अकोलकर म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)