अंधेरी-पूर्व पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या विजयाचे 3 अर्थ

अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 65 हजार 618 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील मते 'नन ऑफ द अबॉव्ह' (NOTA) ला मिळाली. एकूण 12 हजार 721 मते NOTA ला मिळाली.
ऋतुजा लटके यांच्याखालोखाल मतदारांनी 'नोटा'ला मतं दिली आहेत. त्यामुळे ऋतुजा यांची लढत ही अपक्षांपेक्षाही नोटाविरुद्ध असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
या निवडणुकीमुळे राज्याचं संपूर्ण राजकारणच ढवळून निघालेलं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान झालं होतं.
या निवडणुकीच्या काही महिने आधीच शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिवसेनेवरच दावा केला. हे प्रकरण कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेलं.
शिवसेनेत झालेल्या या फुटीचे पडसाद या निवडणुकीवर पाहायला मिळाले. ही निवडणूक कोणत्या चिन्हावर होईल याचा प्रश्न निर्माण झाला. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर दोन्ही गटांनी दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह गोठवलं.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे देण्यात आले आणि त्यांना ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले. तर उद्धव ठाकरेंच्या गटाचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे देण्यात आले. त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले.
फुटीनंतर मशाल या निवडणूक चिन्हावर उद्धव ठाकरे गट लढवत असलेली ही पहिली निवडणूक होती. चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गटात लढत होईल असे वाटत असताना शिंदे गटाने ही जागा भाजपसाठी सोडल्याचे म्हटलं. त्यामुळे मुरजी पटेल यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केलेला अर्ज मागे घेतला होता.
या पार्श्वभूमीवर अंधेरी-पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल बऱ्याच गोष्टींकडे अंगुलीनिर्देश करतो. आज बीबीसी मराठीने आयोजित केलेल्या विशेष शोमध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी आणि सकाळच्या राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर यांनी केलेल्या विश्लेषणाचा संपादित अंश -
1. 'शिवसेना संपलेली नाही'
सुधीर सुर्यवंशी यांच्या मते, "या निवडणुकीची पार्श्वभूमी सर्वप्रथम समजून घेतली पाहिजे. बंडानंतरची निवडणूक होती. पण अंधेरी-पूर्वचा निकाल उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपलेले नाहीत, हे सांगतो.
ते म्हणतात, "आमदार-खासदार सोडून गेले तरी लोक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, हे या निवडणुकीत अधोरेखित झालं आहे. मागच्या वेळी युती असूनही रमेश लटके यांनी 62 हजार मते घेतली होती."

फोटो स्रोत, facebook
"या निवडणुकीत युती नसताना, एक गट फुटलेला असताना इतकी मते मिळाली म्हणजे लोक अजूनही आपल्यासोबत आहेत, असा संदेश यातून जातो. जरी समोर विरोधक नसला तरी शिवसेनेसाठी महापालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम होती."
"कोणत्याही निवडणुकीला सामोरे जात असताना तुमचं मनोधैर्य महत्त्वाचं असतं. या निवडणुकीत पक्षाचं नवं नाव, नवं चिन्ह असतानाही उद्धव ठाकरे यांनी मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते घेतली, हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे," असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
याविषयी बोलताना मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या, "शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत दोन मन्वंतरं झाल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. पहिलं मन्वंतरं म्हणजे हिंदुत्ववादाचं पेटंट असलेल्या भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली आघाडी. त्या पाठोपाठ शिवसेनेला 40 आमदारांनी केलेला जय महाराष्ट्र हे दुसरं मन्वंतर. यानंतर होणारी ही निवडणूक आहे."
त्या पुढे म्हणतात, "रमेश लटके हे अतिशय लोकप्रिय आमदार होते. त्यांच्याविषयी जनतेमध्ये सहानुभूती आणि आपलेपणा होता. भाजपने माघार घेतली तरी शिवसेनेने आपली संपूर्ण यंत्रणा निवडणुकीत उतरवली होती. त्यांनी गंभीरपणे निवडणूक लढवल्याचं फळ त्यांना मिळवलं आहे. मशाल चिन्हावर मिळवलेला पहिला विजय त्यांना सुखावणारा आहे."
2. नोटा की भाजपचा डमी उमेदवार?
अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. भाजपने उमेदवार मागे घेतला होता, पण नोटा हा त्यांचा डमी उमेदवार होता की काय, अशी शंका येते, असं मत सुधीर सुर्यवंशी यांनी व्यक्त केलं.
ते म्हणतात, "या निवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना दिलेली उमेदवारी अचानक मागे घेतली होती. पण भाजप उमेदवार नसताना नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. माझ्या आजवरच्या पत्रकारितेत कोणत्याही विधानसभा निवडणुकीत नोटाला इतकी मते मिळाल्याचं मी पाहिलं नाही.

फोटो स्रोत, facebook
"याचा अर्थ भाजप, RSS विचारांना मानणाऱ्या लोकांनी मतदानास गेल्यानंतर नोटाचं बटण दाबणं योग्य समजलं. शिवाय, या निवडणुकीत काही नोटासंदर्भात काही मेसेज व्हायरल झाले होते. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर वेगळ्या पद्धतीने आम्ही संदेश देऊ, असा प्रयत्नही त्यांनी करून पाहिला होता. याचा अर्थ नोटा हाच भाजपचा डमी कॅन्डिटेट होता का अशी शंका येते. पण हा प्रयत्न फसल्याचं निकालातून दिसून येतं," असं ते म्हणतात.
मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, "मुरजी पटेल यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांनीच नोटाला पसंती दिली तर हरकत नाही, असा विचार लोकांमध्ये पसरवला. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाल्याचं दिसत आहे. मात्र, यामध्ये संघ किंवा भाजप थेट असेल, असं मला वाटत नाही."
त्या पुढे म्हणतात, "दोन महिन्यांनी महापालिका निवडणूक आहे. पण लोकांना नोटा दाबण्याची सवय लागली, तर भाजपसाठी ते त्रासदायक ठरणार आहे. मात्र, तुम्हाला अर्ज भरायला सांगितलं जातं, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन मोठ्या संख्येने अर्ज भरता आणि नंतर अचानक तुम्हाला अर्ज मागे घेण्यास सांगितलं जातं, मुरजी पटेल हे मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या राग या माध्यमातून व्यक्त केला, असं म्हणायला जागा आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
2019 च्या निवडणुकीत लटके, पटेल आणि काँग्रेसचे अमीन उभे होते. त्यावेळीही या मतदारसंघात नोटाला 4311 मते मिळाली होती. हा मतदारसंघ तसा मुंबईचा प्रातिनिधीक आहे. शहरी मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीतील लोक या भागात राहतात. शहरी मध्यमवर्गीयांना सरकार आपल्या कोणत्याच प्रश्नांची दखल घेत नाही, असं वाटतं. त्या लोकांना नोटाने एक पर्याय दिला आहे. तो वर्गही या नोटामध्ये निश्चित होता, असं विश्लेषण नानिवडेकर यांनी केलं.
3. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला फायदा की तोटा?
सुधीर सुर्यवंशी म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादीची मते शिवसेनेला ट्रान्सफर होतील का, हा मोठा प्रश्न निवडणुकीपूर्वी विचारला जात होता. हिंदुत्वाच्या नावावरच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं. त्याचा परिणाम या निवडणुकीवर दिसून आला नाही.
ते सांगतात, "निवडणुका हाच राजकारणातील चाचणी करण्यासाठीचा मापदंड असतो. त्यामुळे अंधेरी-पूर्वच्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीची मते शिवसेनेला ट्रान्सफर होऊ शकतात, हे याचं उदाहरण आहे. वाढलेल्या मतांची आकडेवारी तेच दर्शवते. या निवडणुकीत केवळ 31 टक्के मतदान झालं होतं. तरीसुद्धा पूर्वीपेक्षा जास्त मते घेण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे हे महत्त्वाचं आहे."

फोटो स्रोत, facebook
मृणालिनी नानिवडेकर यांनी महाविकास आघाडीचा शिवसेनेला फायदा झाला की तोटा झाला, याविषयी समजावून सांगताना काही आकडेवारी दिली.
त्या म्हणतात, "या निवडणुकीत मुस्लीमबहुल भागातील मतदार सांगत होते की आता आम्हाला शिवसेनेशी वैर आहे, असं काही नाही. आपण एक लक्षात घ्यायला हवं की सध्याच्या मतदाराने मुंबईच्या दंगली पाहिलेल्या नाहीत. मुंबईच्या दंगली न पाहिलेल्या मतदाराने दसरा मेळाव्यात पाहिलं की उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानोचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे झालं गेलं विसरून जर मुस्लीम मतदार वेगळा विचार करत असतील, तर तो एक वेगळा संकेत आहे."
"2014 साली मोदी लाट असतानाही या मतदारसंघात भाजपच्या सुनील यादव यांना 47 हजार 340 मते होती. रमेश लटके यांना या निवडणुकीत 52 हजार 817 मते होती.
2019 साली मुरजी पटेल अपक्ष असले तरी भाजपचा त्यांना छुपा पाठिंबा होता. या निवडणुकीत त्यांना 45 हजार 800 मते होती. या निवडणुकीत रमेश लटके यांना 62 हजार 770 मते मिळाली होती.
म्हणजे भाजप-काँग्रेस सोबत नसताना सेनेची कोअर मते 52 हजारांच्या आसपास आहेत. काँग्रेसची मते शिवसेनेला मिळाली असतील तर ही आकडेवारी वाढायला हवी. अशा स्थितीत शिवसेनेला आपली कोअर मते कुठे गेली, हेसुद्धा तपासून पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडी म्हणून मते मिळत असतील, तर शिवसेनेचा कोअर मतदार त्यांच्यापासून दूर गेला आहे का, असंही ही आकडेवारी सांगत आहे, असं विश्लेषण नानिवडेकर यांनी केलं.
(शब्दांकन - हर्षल आकुडे, बीबीसी मराठी)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








