ऋतुजा लटके यांच्याकडे किती संपत्ती आहे?

ऋतुजा लटके

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, ऋतुजा लटके

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना-भाजपा युती अशा दोन गटात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक होणार आहे.

भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

ऋतुजा लटके यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. तर मुरजी पटेल यांच्यासाठी भाजपा-शिंदे गटाने शक्तीप्रदर्शन केलं असून रिपाईच्या कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि म्हणूनच संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी त्यांचं निवडणूक शपथपत्र सादर केलं आहे.

त्यानुसार, ऋतुजा लटके यांच्याकडे एकूण 43 लाख 89 हजार 504 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

ऋतुजा लटके यांचे पती स्वर्गीय रमेश लटके यांच्या नावावर 22 लाख 58 हजारांची जंगम मालमत्ता, तर 8 कोटी 3 लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

ऋतुजा लटके यांच्या शपथपत्रात काय?

  • ऋतुजा लटके यांचं 2021-22 मधील उत्पन्न 3 लाख 99 हजार रुपये.
  • हातातील रोख रक्कम 75 हजार रुपये
  • वेगवेगळ्या बँकांमध्ये 3 लाखांच्या ठेवी
  • शेअर्स आणि मुच्युअल फंडातील गुंतवणूक - 5 लाख 98 हजार
  • राष्ट्रीय बचत योजना, डाक योजना व इतर योजनांतील गुंतवणूक - 11 लाख 11 हजार 142
  • एकूण जंगम मालमत्ता 43 लाख 89 हजार 504 रुपये. यात सोनेचांदी व मौल्यवान वस्तू- 11 लाख 48 हजार
  • स्थावर मालमत्ता - 51 लाख रुपये किंमतीची
  • ऋतुजा लटके यांच्यावरील वेगवेगळ्या बँका पतसंस्थांचं कर्ज - 15 लाख 29 हजार
  • पती रमेश लटके यांच्यावरील कर्ज - 2 कोटी 4 लाख

ऋतुजा लटके कोण आहेत?

ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली.

परंतु ही घोषणा होण्यापूर्वी ऋतुजा लटके या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या.

ऋतुजा लटके, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 कार्यालयात त्या कार्यकारी सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला.

ऋतुजा लटके या राजकारणात नव्हत्या पण त्यांचे पती रमेश लटके या मतदारसंघात दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत रमेश लटके विजयी झाले.

2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव केला तर 2019 मध्ये ते शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले.

रमेश लटके आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे रमेश लटके या मतदारसंघात जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय आहेत.

रमेश लटके यांची मतदारसंघावर चांगली पकड असल्यानेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाणकार सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)