ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल कोण आहेत? ही निवडणूक महत्त्वाची का ठरत आहे?

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना-भाजपा युती अशा दोन गटात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक होणार आहे.
भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ऋतुजा लटके यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. तर मुरजी पटेल यांच्यासाठी भाजपा-शिंदे गटाने शक्तीप्रदर्शन केलं असून रिपाईच्या कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि म्हणूनच संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया की, निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने आलेले हे दोन उमेदवार कोण आहेत? ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे? ही निवडणूक महत्त्वाची का ठरत आहे? आणि इथल्या मतदारांना काय वाटतं?
उद्धव ठाकरे गट आणि भाजपा-शिंदे गट आमने-सामने
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे गट आणि भाजपा-शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
"रमेश लटके आज जिवंत असते तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असते. उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांना जिवंतपणी त्रास दिला होता. तसंच राजकारणासाठी कुटुंबाचा वापर होत आहे. ," असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसंच आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC
तर "मुरजी पटेल यांचा विजय 25 हजार मतांनी होणार," असं भाकीत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी वर्तवलं आहे.
ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरताना आदित्य ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "ही निवडणूक ज्याप्रमाणे होत आहे लोकांच्या मनात राग आणि दु:ख आहे. एखाद्या महिलेला सतवणं कितपत योग्य आहे? खोके सरकार ऋतुजा लटके निवडणूक कशी लढवणार नाहीत यासाठी प्रयत्न करत होते. कोर्टाने त्यांना सुनावलं आहे. अशा निवडणुकांमध्ये विरोधकांनी उमेदवार देणं अपेक्षित नसतं. पण खोके सरकारचं काळं मन समोर आलं आहे." अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

फोटो स्रोत, ASHISH SHELAR TWITTER
दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे अंधेरीतील माजी नगरसेवक संदीप नाईक यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. संदीप नाईक युवा सेनेचे नेते असून रमेश लटके यांचे ते निकटवर्तीय आहेत.
विरोधकांच्या शह-काटशहच्या राजकारणात उमेदवारी अर्ज अवैध ठरला किंवा कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास खबरदारी म्हणून ठाकरे गटाकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
ऋतुजा लटके कोण आहेत?
ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली.

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC
परंतु ही घोषणा होण्यापूर्वी ऋतुजा लटके या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या.
मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 कार्यालयात त्या कार्यकारी सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला.
ऋतुजा लटके या राजकारणात नव्हत्या पण त्यांचे पती रमेश लटके या मतदारसंघात दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत रमेश लटके विजयी झाले.
2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव केला तर 2019 मध्ये ते शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले.

फोटो स्रोत, FACEBOOK
रमेश लटके आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे रमेश लटके या मतदारसंघात जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय आहेत.
रमेश लटके यांची मतदारसंघावर चांगली पकड असल्यानेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाणकार सांगतात.
काँग्रेस ते भाजपा मुरजी पटेल यांचा प्रवास
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा मुरजी पटेल अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
2019 मध्ये भाजपा-शिवसेना यांच्या युतीने विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यावेळी मुरजी पटेल यांना भाजपाकडून निवडणूक लढवता आली नव्हती. ही जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली आणि रमेश लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळी मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत रमेश लटके यांनी जवळपास 16 हजार मतांनी मुरजी पटेल यांचा पराभव केला.
आता पोटनिवडणुकीसाठी मात्र भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट) यांच्या युतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
2015-16 या काळात मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी केसरबेन पटेल या काँग्रेसच्या तिकिटावर 2012 मध्ये नगरसेविका होत्या.
भाजपात प्रवेश केल्यानंतर 2017 मध्ये मुरजी पटेल आणि केसरबेन पटेल या दोघांनीही महानगरपालिका निवडणूक लढवली. दोघंही भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक बनले. परंतु जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्यांचं कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं.
जनप्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या माध्यमातूनही मुरजी पटेल कार्यरत आहेत. अंधेरी पूर्व एमआयडीसी या परिसरात जनप्रतिष्ठान संस्थेचं कार्यालय आहे.
ही निवडणूक महत्त्वाची का ठरत आहे?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण तापलंय. गेल्या काही काळात वेगाने राजकीय घडामोडी सुद्धा घडल्या.
शिवसेनेत शिंदे गटाने बंड केल्यानंतर संघटना पुन्हा उभी करण्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी चांगली संधी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना कोणाची? या प्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. परंतु या दरम्यान ही पोटनिवडणूक आल्याने या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केली.
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हे युद्ध इथेच थांबलं नाही. तर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा पक्षाचे दोन स्वतंत्र दसरा मेळावे घेण्यात आले. दोन्ही गटांच्या नेतृत्त्वाने एकमेकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून नवीन संकट उभं राहिलं. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी ऋतुजा लटकेंना थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागली.
ही पार्श्वभूमी पाहता ही पोटनिवडणूक आता केवळ मुंबईतल्या एका मतदारसंघाची राहिलेली नाही. तर सुरू असलेल्या राजकीय संघर्षासाठी दोन्ही गटांना या निवडणुकीच्या निमित्ताने खुलं मैदान मिळालं आहे.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "फुटलेल्या शिवसेनेची आता मुंबईत किती ताकद आहे याची लिटमस टेस्ट या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. म्हणून या निवडणुकीला महत्त्व आहे. मोठ्या संख्येने आमदार ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंची ताकद आहे की नाही याचा अंदाज यानिमित्ताने येईल. पक्षात फूट पडल्यानंतर जनसमर्थन मिळतंय का हे सुद्धा यात स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड केली असा आमदारांचा आरोप होता. त्यानंतर आता जनतेच्या दरबारात हा आरोप किती खरा ठरतो आणि मतदार कोणाला साथ देतात हे स्पष्ट होईल."

फोटो स्रोत, ASHISH SHELAR TWITTER
संदीप प्रधान पुढे सांगतात, "मला असंही वाटतं की ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल किती मताधिक्याने ही निवडणूक जिंकतात किंवा हरतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर ऋतुजा लटके मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकल्या तर उद्धव ठाकरेंना किंवा पक्षाला मिळत असलेली सहानुभूतीची लाट मतांमध्ये दिसली असं म्हणता येईल. कोण किती मतांनी जिंकणार आणि पराभूत होणार यावरूनही जनमताचा अंदाज दिसेल."
अंधेरी पूर्व मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी या मतदारसंघातून तीन टर्म आमदार होते.
या मतदारसंघात उच्चभ्रू वसाहती जशा मोठ्या संख्येने आहेत त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय आणि झोपड्यांमध्ये राहणारा वर्ग लक्षणीय आहे. तसंच अल्पसंख्याक समाजातील मतदार सुद्धा मोठ्या संख्येने असल्याचं जाणकार सांगतात.
रमेश लटके दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यापूर्वी काँग्रेसचे सुरेश शेट्टी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. असं असलं तरी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुनील यादव यांचा केवळ जवळपास पाच हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2019 मध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली तरी त्यांना जवळपास 45 हजार 800 मतं मिळाली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शिंदे गटाच्या बंडानंतर ही पहिली निवडणूक आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सुद्धा बदललं आहे. त्यामुळे मतदार या परिस्थितीकडे कसं पाहतात याचा प्राथमिक निकाल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. खरा निकाल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी ही निवडणूक आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे."
"दुसरा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिसणारी सहानुभूती प्रत्यक्षात त्यांच्या किती कामी येऊ शकते याचाही अंदाज यानिमित्ताने येईल. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता काँग्रेस आणि रा.काँग्रेस आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात या दोन्ही पक्षांच्या मतदारांची मदत ऋतुजा लटके यांना होऊ शकते. तसंच मनसेने आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे मराठी मतं शिवसेनेकडे जाऊ शकतात,"
'राजकारणी तर बंगल्यात राहतात आम्ही मात्र भोगतो'
अंधेरी पूर्वेकडील साकीनाका, एमआयडीसी, वीर नेताजी पालकर चौक, गोंदवली, अंधेरी-कुर्ला रोड, भवानी नगर, विजय नगर, पवईचा काही भाग, इ. हे परिसर या मतदारसंघात आहेत. या भागांत अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
काही दिवसांपूर्वीच या मतदारसंघात पाण्याच्या मुद्यावरून आंदोलन पेटलं. तर एआरएचे रखडलेले प्रकल्प हा सुद्धा प्रमुख मुद्दा आहे. परंतु पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून केलं जाणारं राजकारण विकासासाठी नसून केवळ कुरघोडीसाठी आहे असं इथल्या मतदारांना वाटतं. यापैकी काही मतदारांशी बीबीसी मराठीने संवाद साधला.
अंधेरी पूर्व मतदारसंघात गेल्या 50 वर्षांपासून राहणारे श्रीकांत पारेकर शिक्षक आहेत. पोटनिवडणुकीवरून सुरू असलेलं राजकारण पाहता मतदार म्हणून काय वाटतं? विकाससाठी होणारं हे राजकारण आहे असं वाटतं का? या प्रश्नांची उत्तरं देताना ते म्हणाले, "मी कोणत्याच पक्षाचा सदस्य नाही. आमच्या मतदारसंघातली कामं होणं गरजेचं आहे. नुसतं राजकारण करून काय उपयोग आहे."
ते पुढे म्हणाले, "मी दोन्ही नेत्यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण ऐकलं. दोघांनीही आपण कसे बरोबर आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संबंध भाषणांशी नाही. विकासकामं होण्याशी आम्हाला मतलब आहे. त्याविषयी कोणी बोलतच नाही."
आणखी एक महिला मतदार म्हणाल्या, "आमच्या भागातले एसआरए प्रकल्प रखडले आहेत त्याकडे कोण लक्ष देणार. अनेक जणांचं घराचं स्वप्न अपूर्ण राहिलं. ती माणसं आता हयात नाहीत. याकडे कोण लक्ष देणार. राजकारणी तर मोठ्या बंगल्यांमध्ये, मोठ्या घरांमध्ये राहतात आम्ही मात्र झोपडीत राहतो. आम्हाला भोगातो. निवडून येणाऱ्याकडूनच आम्हाला अपेक्षा असणार ना."
3 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर 6 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








