5G मुळे कॉल ड्रॉप कमी होतील? तुमचं फोन बिल कमी होईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुभम किशोर,
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
भारतात 5जी चा लिलाव 26 जुलैपासून सुरू झाला. देशातल्या चार कंपन्या या लिलावात भाग घेतील. या शर्यतीत सगळ्यात आघाडीवर रिलायन्स जिओ दिसतंय. या कंपनीने दूरसंचार विभागाकडे 14 हजार कोटी रुपये जमा केले आहेत.
भारती एअरटेल ने 5500 कोटी, तर अदानी समुहाने 100 कोटी रुपये जमा केले आहेत. वोडाफोन आयडियाने 2200 कोटी रुपये जमा केले आहेत. अदानी समुहाने स्पष्ट केलं आहे की, त्यांना टेलिकॉम सेक्टरमध्ये यायचं नाही तरीही 5जी मुळे त्यांच्या कामात सुसूत्रता येईल.
या लिलावाचं काय महत्त्व आहे आणि त्यामुळे तुमच्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होईल?
देशात 5G लहरींचा लिलाव सुरू झालाय, ज्यामुळे इंटरनेट आणखी वेगवान होणार आहे. पण 5G मुळे कोरोना पसरतो, अशा अफवा कुणी आणि का पसरवल्या?ऐका ही गोष्ट दुनियेची
स्पेक्ट्रमचा लिलाव म्हणजे काय?
स्पेक्ट्रमचा लिलाव या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगताना आयआयटी रोपरचे प्राध्यापाक सुदिप्त मिश्रा सांगतात, "आधी आपण रेडियोचा वापर करायचो. त्यात AM, मिडियम वेव्ह, आणि FM असायचं. त्यात लिहिलेलं असायचं की आपण किती मेगाहर्टस किंवा किलोहर्टस पर्यंत जाऊ शकतो? म्हणजे आपण वेगवेगळ्या फ्रिक्व्हेंसीवर वेगवेगळ्या गोष्टी ऐकू शकतो.
त्याचप्रकारे 1जी, 2जी, 3जी, 4जी, 5जी अशा फ्रिक्व्हेंसी असतात. त्या फ्रिक्व्हेंसीची एक रेंज आहे. तिचा वापर मोबाईल च्या नेटवर्कसाठी होतो.
आपण जे नेटवर्क वापरतो त्याची विभागणी पाच स्पेक्ट्रममध्ये केली जाते. 5जी नेटवर्कही तसंच आहे. त्याची विभागणी हाय,लो, मिडियम अशी करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी सरकार 72 गिगाहर्ट्झचा लिलाव करणार आहे. त्यात लो स्पेक्ट्रम (600 मेगा हर्ट्झ, 700 मेगा हर्ट्झ, 800 मेगा हर्ट्झ, 900 मेगा हर्ट्झ, 1800,2100 आणि 23 मेगा हर्ट्झ) मिड (3300 मेगा हर्ट्झ) आणि हाय (26 गिगा हर्ट्झ) च्या स्पेक्ट्रमचा समावेश आहे.
जूनमध्ये सरकारतर्फे एक निवेदन जारी करण्यात आलं आहे, त्यात, "मिड आणि हाय बँड स्पेक्ट्रम चा वापर करून टेलिकॉम कंपन्या 5 जी टेक्नॉलॉजीवर आधारित सेवा देतील. त्याचा वेग 4 जी पेक्षा दहा पटीने जास्त असू शकतो."
तुम्हाला काय फायदा होईल?
5जी हे मोबाईल नेटवर्कची ही पाचवी जनरेशन आहे. ते अधिक जास्त फ्रिक्वेन्सीवर काम करेल. त्यामुळे अपलोड आणि डाऊनलोडची स्पीड वाढण्याची अपेक्षा आहे.
सुदिप्त सांगतात, "3जी आणि 4जी मध्ये हे कळतं की इंटरनेटचा स्पीड प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ऑपरेटरला आता कमी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे इंटरनेट स्वस्त झालं. त्यामुळे ते आता इतर सेवाही देऊ शकत आहेत. 5जी मुळे अनेक सेवा आणि मॅपिंग अप्लिकेशन्स सुधारतील."

फोटो स्रोत, Getty Images
भारतात मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांना बरेचदा कॉल ड्रॉप होण्यापासून ते इंटरनेटचा वेग कमी असल्याचा त्रास होतो. 5जी आल्यानंतर हे सगळं कमी होईल का? जाणकारांच्या मते या प्रश्नाचं उत्तर देणं सध्यातरी कठीण आहे.
जगाच्या ज्या भागात 5 जी आहे तिथे असं लक्षात आलं आहे की तिथे 5जी नेटवर्कला लागणाऱ्या पायाभूत सुविधा वेगळ्या आहेत. 4जी आणि 3जी नेटवर्कपेक्षा वेगळी जास्त बँडविड्थ आणि आणि कमी वेळ लागणाऱ्या नवीन रेडिओ तंत्रज्ञानासाठी आणखी एका नेटवर्कची गरज पडेल.
5 जी ची स्पीड 10जीबीपीएस आहे, जी 4जी स्पीडच्या 100 एमबीपीएसपेक्षा 100 पट जास्त आहे.
सुदिप्त यांच्या मते, "जर तुम्ही 4जी चा विचार केला तर ती अजुनही पूर्णपणे 4जी नाही. तांत्रिकदृष्ट्या 3.8 जी पर्यंतच ती होती. त्यामुळे 5जी कडून जास्त अपेक्षा जास्त आहेत. त्या किती पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे."
"मात्र 5जी ला फक्त डेटा स्पीडच्या संदर्भात पहायला नको. भविष्यात इंटरनेट ऑफ थिंग्ससाठी हे बरंच कामात येणार आहे."
इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय?
स्पीड हा 5जी चा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. येत्या काळात त्याची उपयुक्तता वाढणार आहे. रोजचे कामसुद्धा त्यामुळे सोपी होण्याची चिन्हं आहेत.
सध्या इंटरनेटचा वापर आपण मोबाईल आणि काँम्प्युटरवर करत आहोत. 5जी आल्यावर ते आपण फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी शीसुद्धा जोडू शकतो. तुम्ही सगळ्या गोष्टींना इंटरनेटशी कनेक्ट करून वापरू शकता.

फोटो स्रोत, Getty Images
5जी साठी चांगल्या पायाभूत सुविधांची गरज पडेल. त्यासाठी कंपन्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. तसंच 5जी किती फायदेशीर ठरेल हे कंपन्यांच्या पायाभूत सुविधांवरसुद्धा तितकंच अवलंबून असेल.
भारतात अशा प्रकारच्या सुविधा मिळण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. मात्र कंपन्या लवकरात लवकर 5 जी आणणार असल्याचा दावा करत आहेत. काही मोबाईल फोन 5जी शी कम्पॅटिबल झाले आहेत.
जर 5 जी एक वर्षांच्या आत आलं तर तुम्हाला काय फायदा होईल?
सुदिप्त सांगतात, "जर शहराचा विचार करायचा झाला तर माझा फोन आणि इंटरनेट फास्ट होईल. ई लर्निंगसारख्या गोष्टी पटापट होतील. सेवा आणि लोकेशन या गोष्टी पटापट दिसतील. जर घरात होम ऑटोमेशन सारख्या गोष्टी असतील तर त्या आणखी सोप्या होतील."
"खेडेगावाबद्दल बोलायचं झालं तर ई-गव्हर्ननंस आणि शेतीशी निगडीत गोष्टी आणखी सोप्या होतील. तंत्रज्ञानाच्या हिशोबाने अनेक नवीन सेवा तयार कराव्या लागतील. त्यासाठी जोपर्यंत या सेवा तयार होणार नाहीत तोपर्यंत फारसा फायदा होणार नाही."
काही कंपन्यांनी नवं तंत्रज्ञान आणलं आहे त्यामुळे 5 जी ला वेळ लागेल हे तितकंसं खरं नाही असंही ते म्हणाले.
तुमचं फोनचं बिल कमी होईल का?
5जी चा देशात किती फायदा होईल हे स्पेक्ट्रमच्या लिलावात किती पैसा कंपन्या खर्च करतात यावर अवलंबून आहे. भारतात टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा कमी आहे. त्यामुळे ज्या कंपनीचा दबदबा आहे ते किमती जास्त ठेवतील.
5जी आल्यावरही 4जी, 3जी, 2जी या सेवा सुरूच राहतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








