तुमचा ‘डिजिटल जुळा' अवतार आता दूर नाही, नोकऱ्यांवर येणार गदा?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेन वेकफिल्ड
- Role, टेक्नॉलॉजी रिपोर्टर
'अरे, मला रस्त्यावरून जाताना एकदम तुझ्यासारखाच माणूस दिसला होता'
आपल्यापैकी अनेकांनी हे वाक्य मित्रांकडून, परिचितांकडून ऐकलं असेल.
पण विचार करा की, जर तुम्हाला स्वतःलाच हुबेहूब तुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तयार करता आली तर? आणि त्यातही तुमची ती जुळी व्यक्ती पूर्णपणे डिजिटल जगातली असेल तर?
आता आपण अशा युगात राहतोय, जिथे वास्तव आयुष्यात ज्या गोष्टी आहेत- मग ते तुमचं शहर असो, तुमचं घर किंवा गाडी असेल त्याचं डिजिटल प्रतिकृती बनू शकते... याला तुम्ही स्वतःही अपवाद नाहीये. तुमचाही 'डिजिटल डुप्लिकेट' तयार होऊ शकतो.
सध्या ज्याची खूप चर्चा सुरू आहे त्या मेटाव्हर्सचा आभासी, डिजिटल जग तयार करण्याचा प्रयत्न आहे, त्या जगात तुमचा 'डिजिटल जुळा' अवतारही अस्तित्वात असेल. पण हे मेटाव्हर्स आहे काय हे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.
हा 'डिजिटल जुळा' अवतार वास्तव आयुष्यातील व्यक्तींप्रमाणेच असेल, पण त्याचा उद्देश अतिशय वेगळा असेल- आपल्या खऱ्याखुऱ्या प्रतिरूपाला अभिप्राय देणं किंवा सुधारणा करण्यासाठी मदत करणं.
सुरुवातीच्या टप्प्यात ही प्रतिकृती म्हणजे 3D कॉम्प्युटर मॉडेल असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचं काम चालेल.
हे दशक संपेपर्यंत आपण विचार करण्याची क्षमता असलेलं डिजिटली जुळं प्रारुप तयार करू शकतो. अर्थात, हे तंत्रज्ञान पहिल्या टप्प्यातीलच असेल, असं तंत्रज्ञान विश्लेषक रॉब एन्डर्ले यांना वाटतं.
"मात्र माणसाची अशी डिजिटल प्रतिकृती तयार करताना नैतिकतेच्या दृष्टिकोनातूनही प्रचंड विचार करणं गरजेचं आहे. कारण नोकरीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची विचार करू शकणारी प्रतिकृती ही अत्यंत महत्त्वाची ठरू शकते," रॉब सांगतात.
पण समजा एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याची 'डिजिटली जुळी' प्रतिकृती तयार केली आणि म्हटलं की, आमच्याकडे तुमची विचार करणारी प्रतिकृती आहे, जिला पगार देण्याचीही गरज नाही. मग तुम्हाला अजूनही नोकरीवर का ठेवायचं?

फोटो स्रोत, INTEL FREE PRESS
भविष्यातल्या मेटाव्हर्सच्या युगात डिजिटल जुळ्या प्रतिकृतीचे मालकी हक्क ठरवणं ही कसोटी असेल, असं रॉब यांना वाटतं.
आपण व्यक्तींच्या डिजिटल प्रतिकृती तयार करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे, पण सध्या हे संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे.
मेटाच्या (आधीचं फेसबुक) हॉरिझोन वर्ल्ड या व्हर्चुअल रिअॅलिटी प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या डिजिटल अवताराला स्वतःचा चेहरा देऊ शकता. पण त्याला पाय किंवा इतर अवयव नाही देता येत. म्हणजेच डिजिटल प्रतिकृती तयार करण्याचं तंत्रज्ञान हे इतक्या प्राथमिक किंवा सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयातील वरिष्ठ रिसर्च फेलो प्रोफेसर सँड्रा वॉचर सांगतात की, माणसाची डिजिटल प्रतिकृती करणं हे एखाद्या वैज्ञानिक काल्पनिक कादंबरीप्रमाणे वाटू शकतं आणि सध्याच्या स्थितीत ते तसंच आहे.
त्या पुढे म्हणतात की, कोणी परीक्षेत यश मिळवलं, आजारी पडलं किंवा एखाद्यानं काही गुन्हा केला तर- ते नैसर्गिक की मानवनिर्मित तंत्रज्ञानातून असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानामुळे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अनेक घटनांचा अर्थ लावण्यात तितके परिणामकारक नाहीये. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचं आयुष्य समजून घेऊन त्याची प्रतिकृती बनवण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असंही सँड्रा सांगतात.
मात्र त्याऐवजी प्रॉडक्ट डिझाइन, वितरण आणि नगर नियोजनासारख्या क्षेत्रांमध्ये डिजिटल प्रतिकृतीच्या संकल्पनेचा वापर हा अधिक व्यापक आहे.

फोटो स्रोत, SANDRA WACHTER
फॉर्म्युला वन रेसिंगमधल्या मॅक्लारेन आणि रेड बुल या टीम त्यांच्या रेसिंग कार्सच्या डिजिटल प्रतिकृती वापरतात.
डिलिव्हरी क्षेत्रातली DHL सारखी बलाढ्य कंपनी त्यांच्या गोदामांचे डिजिटल नकाशे तयार करत आहे आणि आपल्या सप्लाय चेनला ते नकाशे अधिक परिणामकपणे कसं वापरता येईल यासाठीही प्रयत्न करत आहेत.
शहरांच्याही डिजिटल प्रतिकृती तयार केल्या जाताहेत. शांघाय आणि सिंगापूर या दोन्ही शहरांची 'डिजिटल जुळी' भावंड आहेत. बिल्डिंग, वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांचे डिझाइन-कार्यप्रणाली सुधारण्याच्या हेतूने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
आपल्या शहराची डिजिटल प्रतिकृती करण्यामागे सिंगापूरचा उद्देश हा आपल्या नागरिकांना प्रदूषित भागांची माहिती मिळावी आणि त्यांना ते टाळता यावेत हा होता.
इतर ठिकाणी नवीन पायाभूत सुविधा कोठे आणि कशा तयार करता येतील याचा विचार करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं. मध्य पूर्वेमध्ये अनेक ठिकाणी वास्तव आणि डिजिटल जगात एकाचवेळी नवीन इमारती उभारण्यात येत आहेत.
फ्रेंच सॉफ्टवेअर कंपनी दस्सॉ सिस्टिम्सने म्हटलं आहे की, डिजिटल प्रतिकृती तयार करण्यासाठी हजारो कंपन्या आमच्याकडे रस दाखवत आहेत.
अजूनपर्यंत त्यांनी एका हेअर केअर कंपनीला अधिक टिकाऊ शांपूच्या बाटल्या तयार करण्यासाठी डिजिटल प्रतिकृती तयार करायला मदत केली. जेणेकरून अपव्यय टळेल. दस्सॉ इतरही कंपन्यांना भविष्यातही उपयुक्त ठरतील असे प्रोटोटाइप तयार करायला मदत करत आहे.
पण या डिजिटल प्रतिकृतींचं खरं महत्त्व हे आरोग्य क्षेत्रासाठी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दस्सॉ सिस्टिम्सच्या Living Heart project ने मानवी हृदयाचं व्हर्चुअल मॉडेल तयार केलं आहे. त्यावर चाचणी करता येऊ शकते, विश्लेषण करता येऊ शकतं. याचा फायदा म्हणजे डॉक्टरांना 'समजा असं झालं तर...' अशा शक्यतांमध्ये वेगवेगळी वैद्यकीय उपकरणं आणि प्रक्रिया पडताळून पाहणं शक्य होईल.
डॉ. स्टीव्ह लेविन यांनी या प्रकल्पाची सुरूवात केली. त्यामागची त्यांची कारणं ही वैयक्तिक होती. त्यांच्या मुलीला जन्मापासूनच हृदयरोग होता. काही वर्षांपूर्वी वयाच्या ऐन विशीतच तिला हार्ट फेल्युअरचा धोका होता. त्यावेळी त्यांनी व्हर्चुअर रिअॅलिटीमध्ये तिचं हृदय निर्माण करण्याचा विचार केला.
बोस्टन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये खऱ्या रुग्णांच्या हृदयविकारांसंबंधी अधिक संशोधन करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. लंडनमधल्या ग्रेट ऑरमन्ड स्ट्रीट हॉस्पिटलमधल्या इंजिनिअर्सची टीम लहान मुलांमधील दुर्मिळ आणि ज्यावर उपचार उपलब्ध नाहीयेत अशा हृदय रोगांवर संशोधन करण्यासाठी डिजिटल प्रतिकृतीचा आधार घेत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामधला एक वादग्रस्त मुद्दा म्हणजे प्राण्यांवर केले जाणारे प्रयोग. संशोधनासाठी डिजिटल हृदयाचा वापर केल्यामुळे प्राण्यांचा या क्षेत्रातील वापर एकदम कमी होईल, असं दस्सॉ सिस्टिम्सचे ग्लोबल अफेअर्स संचालक सेव्हरिन ट्रोई यांनी म्हटलं.
त्यामुळे आता दस्सॉ हृदयाव्यतिरिक्त इतरही अवयवांबद्दल काम करत आहेत, ज्यामध्ये डोळे आणि मेंदूचाही समावेश आहे.
"एका ठराविक काळानंतर आपल्या सगळ्यांच्याच डिजिटल प्रतिकृती असतील. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी प्रतिबंधात्मक औषधं बनवणं सोपं जाईल. त्यामुळे जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊ, तेव्हा आपल्या वैयक्तिक गरजांनुसार उपचार मिळतील," असं ट्रोईंनी म्हटलं.

फोटो स्रोत, NVIDIA
मानवी अवयवांची प्रतिकृती करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचाही भविष्यात विचार होऊ शकतो. त्यांपैकी एक म्हणजे संपूर्ण ग्रहाचंच डिजिटल व्हर्जन तयार करणं.
अमेरिकेतील सॉफ्टवेअर फर्म Nvidia मध्ये ओम्नीव्हर्स (Omniverse) नावाचा एक विभाग आहे. त्याची स्थापनाच आभासी विश्व तयार करण्याच्या उद्देशाने झाली आहे. त्यांचाच एक प्रकल्प म्हणजे पृथ्वीचं प्रतिरूप तयार करणं आहे. वातावरण बदलाच्या समस्येवर उत्तर शोधण्याच्या दृष्टिने हा प्रयोग महत्त्वाचा ठरू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









