आपल्या डेटाचा बॅकअप कसा घ्यायचा? डेटा सुरक्षित कसा ठेवायचा?

हार्डडिस्क
    • Author, मॅरी-अॅन रसन
    • Role, टेक्नॉलॉजी ऑफ बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज

माझा पर्सनल डेटा मी अत्यंत सुरक्षित ठेवला आहे, असंच मला नेहमी वाटत होतं. पण मी चुकीची होते..

माझ्या वैयक्तिक फाईल्स मी दोन HDD म्हणजे एक्सटर्नल हार्डडिस्कवर कॉपी केलेल्या होत्या, आणि जुलै महिन्यात 24 तासांच्या आतच दोन्ही हार्ड ड्राईव्ह खराब झाल्या.

एक हार्ड ड्राईव्ह योग्य रितीने काम करून नसून दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना दर्शवत आहे, अशी सूचना विंडोज 10 कडून पाठवण्यात आली. तर दुसऱ्या ड्राईव्हमधून काही तरी क्लिक केल्यासारखा आवाज येत असून कंप्युटरमध्ये ती डिटेक्टच होत नसल्याचं, मला सांगण्यात आलं.

या सर्वांमुळे आपला डेटा सुरक्षित ठेवण्याचा योग्य मार्ग काय? आणि त्यातही काही अडचण आली, तर मग आपण काय करायचं? असा विचार करण्यास मला एक ग्राहक म्हणून भाग पाडलं.

एक्टर्नल हार्ड ड्राईव्ह म्हणजे कंप्युटरला जोडता येणारे पोर्टेबल स्टोरेज डिव्हाईस असते. त्याचे दोन प्रकार असतात. हार्ड डिस्क ड्राईव्ह्ज (HDD). त्यात फिरणाऱ्या चुंबकीय चकत्यांचा (मॅग्नेटिक डिस्क) वापर करून डेटा स्टोअर केला जातो.

दुसरा नवीन प्रकार म्हणजे, सॉलिड स्लेट ड्राईव्ह्ज(SSD). यात चीपचा वापर करून फ्लॅश स्टोरेज तंत्राचा वापर केला जातो.

मी 2015 मध्ये 1टीबी क्षमता असलेल्या वेस्टर्न डिजिटल या HDD ड्राईव्हचा वापर करण्यास सुरुवात केली होती. त्यापूर्वी मी माझा डेटा लॅपटॉप आणि डीव्हीडी यांच्यामध्ये साठवून ठेवायचे.

जर माझ्या कंप्युटरला काहीही झालं तरी मी नवीन नवीन विकत घेऊ शकते आणि जुन्या लॅपटॉपमधून डेटा घेऊन तो थेट नव्या कंप्युटरमध्ये स्टोर करून वापरू शकत होते.

पण मी एकदा एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह वापरण्यास सुरुवात केली तर ते एवढं सोपं होतं की, मी याच नव्या तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहू लागलो. त्यानंतर जेव्हा मी दुसरी ड्राईव्ह घेतली तेव्हावर मला हा पर्याय सर्वात उत्तम आहे, असंच वाटलं.

सीडी

काही वर्षांपूर्वी मी एक नवीन लॅपटॉप विकत घेतला. तो बराच लहान होता पण त्यात अत्यंत वेगानं काम करू शकणारी अशी SSD हार्ड ड्राईव्ह होती. तेव्हा मला त्यात स्टोरेजसाठी पुरेसा स्पेस नसल्याचं फार काही वाटलं नाही. मी माझ्या बहुतांश फाईल्स या एक्सटर्नल हार्ड ड्राईव्हमध्ये ठेवत होते आणि अगदी नेहमी वापरायच्या अशा मोजक्या फाईल लॅपटॉपमध्ये ठेवत होते

त्यामुळं जेव्हा माझ्या हार्ड ड्राईव्ह खराब झाल्या मला धक्काच बसला. मी इंटरनेटवर शोधाशोध करून डेटा परत कसा मिळवायचा याची माहिती धुंडाळली, पण त्याची काहीही मदत झाली नाही.

मी डेटा रिकव्हर करण्याची सेवा देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी गुगल केलं आणि त्यातून मिळालेल्या माहितीवरुन लंडनमधील तिघांशी संपर्क साधला.

विंडोजनं हार्ड ड्राईव्ह योग्य पद्धतीनं काम करत नसल्याची सूचना दिली असेल, तर त्यांचा वापर करणं किंवा त्या सुरू करण्याचा प्रयत्न करणं तातडीनं थांबवण्यचा सल्ला त्यापैकी एका इंजीनिअरनं मला दिला.

हार्ड ड्राईव्हचे लॉजिक फेल्युअर झालं असून त्याच्या दुरुस्तीसाठी 250 पाऊंड (जवळपास 25 हजार रुपये) खर्च येईल असं सांगितलं. मी जर ती वापरण्याचा प्रयत्न करत राहिलो, तर मी पूर्ण डेटा गमावून बसेल, अशा इशाराही त्यानं दिला.

क्लिकचा आवाज येणाऱ्या ड्राईव्हची अवस्था तर आणखी खराब होती. त्याला मॅकेनिकल फेल्युअर म्हटलं जातं. त्यात डेटा रीड आणि राईट करणारं सुईसारखं हेड बदलावं लागणार होतं. त्याच्या दुरुस्तीचा खर्च 500 पाऊंड (जवळपास 50 हजार रुपये) येईल असं सांगितलं.

जोसेफ नाघदी

फोटो स्रोत, DATA RECOVERY LAB

फोटो कॅप्शन, जोसेफ नाघदी

मी संपर्क केला त्यापैकी करीज पीसी वर्ल्ड्स टीम नोहाऊ सर्व्हिस वगळता इतर कोणीही मला तुलनेत स्वस्त दर दिलेले नव्हते. त्यांनी मला लॉजिक फेल्युअरसाठी 90 पाऊंड (अंदाजे 9 हजार रुपये) तर मेकॅनिकल कंपोनंट फेल्युअरसाठी 350 पाऊंड (जवळपास 35 हजार रुपये) लागतील, असं सांगितलं.

जर डेटा रिकव्हर करण्यात अपयश आलं, तर पैसे आकारणार नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. पण या कामासाठी वेळ लागत असल्यानं संयम ठेवावा लागतो. त्यात कोरोना साथीच्या काळात तर अधिक संयम बाळगावा लागतो.

मी सल्ला घेण्यासाठी वेस्टर्न डिजिटलशीही संपर्क केला. त्यावर "जर ड्राईव्ह काम करत नसेल, तर आम्ही ग्राहकांना आमच्या कस्टमर सर्व्हीस टीमशी संपर्क साधून नेमकं काय झालं आहे आणि त्यावर काय पर्याय असू शकतात याबाबत चर्चा करण्याचा सल्ला देतो."

"जर ड्राईव्ह पूर्णपणे खराब झाल्याचं समोर आलं तर आमची कस्टमर सर्व्हीस टीम, वॉरंटीनुसार संबंधित उत्पादन बदलून देण्यासंदर्भात सहकार्य करते. तसंच ग्राहकाला गरज असल्यास, आमच्या डेटा रिकव्हरी पार्टनरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो," असं मला सांगण्यात आलं.

पण माझ्या दोन्ही ड्राईव्ह्ज सहा आणि चार वर्षे जुन्या होत्या. त्यामुळं डेटा रिकव्हरीवर खर्च करण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्यासमोर नव्हताच.

मग आपला डेटा सुरक्षित ठेवण्याचा योग्य पर्याय काय?

मी अनेक डेटा एक्सपर्टला हा प्रश्न विचारला. करीज पीसी वर्ल्डसारखे रिटेलर आणि वेस्टर्न डिजिटल तसेच सीगेट अशा उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्यांशीदेखील याबाबत चर्चा केली. त्या सर्वांनी सारखाच सल्ला दिला. तो म्हणजे, आपला डेटा किमान तीन ठिकाणी बॅक अप घेऊन ठेवावा आणि त्यापैकी एक कॉपी आपल्या घराऐवजी इतर कुठेतरी ठेवावी.

मायकल केड

फोटो स्रोत, VEEAM

फोटो कॅप्शन, मायकल केड

"माझा पर्याय हा तीन ड्राईव्ह्ज घेणं हा असेल. त्यापैकी एक SSD आणि दोन HDD ड्राईव्ह्ज असतील. त्यातही या सगळ्या ड्राईव्ह दोन किंवा तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या असतील," असं लंडन येथील डेटा रिकव्हरी लॅब या संस्थेतील चीफ डेटा रिकव्हरी स्पेशालिस्ट जोसेफ नागडी म्हणाले.

"तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या तीन वेगवेगळ्या हार्ड ड्राईव्ह एकाचवेळी नादुरुस्त होण्याची शक्यता अत्यंत कमी असते," असं ते म्हणाले.

मौल्यवान असे कुटुंबातील सदस्यांचे फोटो किंवा अशाप्रकारच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेऊन, तो एखाद्या नातेवाईकाच्या घरी ठेवावा असा सल्लाही ते देतात.

वीम या डेटा मॅनेजमेंट संस्थेतील सिनियर ग्लोबल टेक्नॉलॉजिस्ट मायकल केड यांनीदेखील याच्याशी सहमती दर्शवली.

"माझ्याकडे दोन मोठ्या हार्ड ड्राईव्ह आहेत. त्या मी 30 मैल अंतरावर राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या घरी आळीपाळीनं ठेवत असतो. मी सर्व महत्त्वाचा डेटा त्या ड्राईव्हवर सेव्ह करतो आणि ती त्यांच्या घरी ठेवतो.''

"त्याशिवाय आणखी एक हार्ड ड्राईव्ह घरी नेहमी माझ्या समोर असते. मी नियमितपणे महिन्यातून एकदा त्यात बॅकअप घेत असतो आणि आई वडिलांच्या घरी गेलो की, ती हार्ड ड्राईव्ह तिथं ठेवून त्याठिकाणी असलेले हार्ड ड्राईव्ह सोबत घेऊन येतो."

सीगेटनं मला माहिती दिली की, त्याच्या हार्ड ड्राईव्हसह तुम्हाला डेटा रिकव्हरीची सेवाही मिळते आणि त्यात लॉजिक फेल्युअरचाही समावेश असतो. त्यांनी मेकॅनिकल फेल्युअरसाठी किंमत आकारत असल्याचं सांगितलं, पण नेमके दर किती ते मात्र सांगितलं नाही.

करीज पीसी वर्ल्ड

फोटो स्रोत, CURRYS PC WORLD

फोटो कॅप्शन, करीज पीसी वर्ल्ड

सीगेटचे कस्टमर टेक्निकल इंजीनीअर गेविन मार्टिन यांनी जास्त वापरासाठी खडबडीत किंवा SSD ड्राईव्ह्ज वापरण्याचा सल्ला दिला. या ड्राईव्ह हातातून पडल्या तरी सहजपणे फुटत नाहीत.

"यामध्ये अत्यंत नाजूक अशा साहित्याचा वापर करण्यात आलेला असतो. त्याचा वापर कोणत्या वातावरणात होतो, त्यावर ती किती टिकणार हे अवलंबून असतं. म्हणजे कमी जास्त तापमान, अधिक उष्णता किंवा आर्द्रता याचा त्यावर परिणाम होत असतो."

"एखाद्या ठराविक कामासाठी तुम्ही योग्य प्रकारची ड्राईव्ह वापरायला हवी. जगातील कोणताही ब्रँड तुम्हाला तुमच्या डेटाबाबत खात्री देऊ शकत नाही."

SSD च्या तुलनेत HDD मध्ये चार पट अधिक डेटा स्टोरेजची सुविधा मिळते, त्यामुळं अजूनही त्याचाच वापर हा फायदेशीर ठरतो, असं डिक्सन कार्फोन येथील डायरेक्टर ऑफ सर्व्हीसेस डीन क्रॅमर यांनी सांगितलं. करीज पीसी वर्ल्ड ही डिक्सन कार्फोनचीच संस्था आहे.

मात्र किरकोळ विक्रेते हे आता त्यांच्या उत्पादनांमध्ये SSD वरच अधिक भर देत आहेत. "त्याचं कारण म्हणजे, हे तंत्रज्ञान स्थिर (दीर्घकालीन) असेल अशी शक्यता आहे."

"SSD चे दर हे पुढील एक दोन वर्षात कमी होतील आणि त्या खरेदी करणं अधिक परवडू लागेल," अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले.

या सर्वांनंतर क्लाऊडचा पर्यायही आहे. सीगेट, करीज पीसी वर्ल्ड आणि केड या सर्वांनी डेटा क्लाऊडवर स्टोर करण्यावर भर दिला. यात आयक्लाऊड (iCloud), ड्रॉपबॉक्स Dropbox किंवा वनड्राईव्ह (OneDrive)याचा समावेश होतो.

नागडी यांनी मात्र ऑनलाईन स्टोर केलेल्या डेटाच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित केली.

"तुम्ही ऑनलाईन बॅकअपवर अवलंबून राहू शकत नाही. जर तुम्ही क्लाऊड डेटा स्टोरेजसाठी महिन्याचे 1000 पाऊंड (1 लाख रुपयांपेक्षा अधिक) मोजत असाल, तर कदाचित सुरक्षिततेची खात्री मिळेल. पण जर तुम्ही काहीही देत नसाल, तर तशी खात्रीच नाही."

डेट रिकव्हरी लॅब मेकॅनिकल फेल्युअरसाठी 550 पाऊंड (55 हजार रुपयांपेक्षा अधिक) एवढा दर आकारते, तर सहा दिवसांत डेटा रिकव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

डेटा रिकव्हरीचा पर्याय एवढा महागडा असण्यामागचं कारण नागडी यांनी स्पष्ट केलं. हे काम करण्यासाठी स्पेशल 'क्लीन रूम' असलेली प्रयोगशाळा उभारण्यासाठी जवळपास 25 लाख रुपये खर्च लागतो. या प्रयोगशाळेत हार्ड ड्राईव्हचे हेड बदलण्याचं काम होतं. ही अत्यंत गुंतागुंतीची अशी प्रक्रिया असते.

डेटा रिकव्हरीचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पुरवणारी जगात एकच संस्था आहे, असंही त्यांनी सांगितलं. ही संस्थामध्ये रशियातील एस लॅबोरेटरी.

"सर्वात मोठी समस्या म्हणजे, त्यांना कोणीही स्पर्धक नाही," असंही ते म्हणाले.

त्याचबरोबर इंग्लंडमध्ये डेटा रिकव्हरीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा असल्याचंही डेटा रिकव्हरी लॅब आणि करीज पीसी वर्ल्डनं सांगितलं. डेटा रिकव्हरीसाठी अधिकृत असा अभ्यासक्रमही किंवा पात्रताही नाही. त्यामुळं या दोन्ही संस्थांनी यासाठीचे स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत.

तज्ज्ञ हे तंत्रज्ञानासंदर्भात जाणकार असलेल्या ग्राहकांना त्यांचे वैयक्तिक NAS-RAID बॉक्सेस वापरण्याचाही सल्ला देतात. वाय फाय असलेल्या या उपकरणात काही HDD किंवा SSD ड्राईव्ह्जच समावेश असतो. जर तुमचा एखादा ड्राईव्ह काम करणं बंद झाला असेल तर त्यात इतर ड्राईव्ह असतात ज्यावर तुमच्या डेटाची कॉपी (डुप्लिकेट डेटा) सेव्ह झालेली असते.

माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास, एकाच वेळी माझ्या दोन्ही ड्राईव्ह बिघडणं म्हणजे माझं नशीब नक्कीच खराब होतं, असं तज्ज्ञांनाही वाटतं.

मी स्वस्तातील पर्याय निवडला. अखेर 49 दिवसांनंतर मला माझी एक ड्राईव्ह परत मिळाली, मात्र दुर्दैवानं त्यापैकी, अगदी थोडाच डेटा रिकव्हर होऊ शकला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)