डिबेटेबल लँड्स : ‘या’ छोट्या देशाची ओळख प्रेमिकांसाठीचं आश्रयस्थळ अशी का आहे?

Kirsten Henton

फोटो स्रोत, Kirsten Henton

    • Author, क्रिस्टीन हेन्टन
    • Role, बीबीसी न्यूज

स्कॉटलंडच्या पश्चिम किनारपट्टीवर हिवाळ्यात आकाश खूप मळभटलेलं दिसतं. इस्क नदीच्या खुल्या मुखाकडे मी पाहत होते, तेव्हा ढगांमधून फिकट पिवळ्या सूर्यकिरणांची प्रतिबिंबं पाण्याच्या आरशासारख्या लहरींवर आणि माघारी जाणाऱ्या लाटांनी ओलसर झालेल्या वाळूच्या तरंगांवर उमटली. नदीचा हा प्रवाह पुढे पश्चिमेकडे सोलवे खाडीकडे जातो.

सखल जमीन असलेल्या या किनारपट्टीच्या दोन्ही बाजूंना डोंगर आहेत, ही खाडी आयरिश समुद्राला मिळते तिथपर्यंत हा किनारा विस्तारलेला आहे, त्यामुळे स्कॉटलंडमधील डमफ्राइस व गॅलोवे आणि इंग्लंडच्या उत्तरेकडील कम्ब्रिया यांच्यात जमीन निसर्गतः खंडीत झाली आहे

जोरदार वाऱ्याला तोंड देत मी उभी होते. स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यातल्या सीमेच्या नैऋत्येकडील टोकावरून मी हे दृश्य पाहात होते. निसर्गाच्या या करामतीने अचंबित झाले होते. आत्ता इतका शांत वाटणारा हा ग्रामीण भूभाग एकेकाळी ब्रिटनच्या सर्वांत बेबंद आणि काही काळ सर्वांत रक्तरंजित प्रदेशांपैकी होता, यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. हा भाग तेव्हा 'विवाद्य भूमी' (डिबेटेबल लँड्स) म्हणून ओळखला जात होता.

एकेकाळी अशांत असलेला हा प्रदेश आज स्कॉटलंड-इंग्लंड सीमेवरचा एक निवांत, शांत भाग आहे. इथे कोणतंही पशुपालन होत नाही आणि दीर्घकाळ इथे टिकून असलेल्या शहरांमध्ये नि गावांमध्ये सामुदायिक जाणीव दुमदुमताना दिसते. युनायटेड किंगडममधल्या या भागात बाहेरच्यांची फारशी वर्दळ नसते. बॉर्ड रेव्हर्स या वंशपरंपरागत हाडवैरामध्ये गुंतलेल्या कुळाचं 'विवाद्य भूमी'वर वास्तव्य होतं. इथे झाडांनी वेढलेल्या दऱ्यांमधून, वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधून नि माळरानांमधून स्थानिक इतिहास आणि तुरळक अवशेष यांच्या खुणा सापडतात. या क्वचितच सांगितल्या जाणाऱ्या कहाणीतल्या रिकाम्या जागा भरायला अशा खुणा उपयोगी पडतात.

ही अतिशय विलक्षण कहाणी आहे. डिबेटेबल लँड्स हा ब्रिटनमधील प्रादेशिक विभाजनाचा सर्वांत शेवटचा टप्पा असल्याचं मानलं जातं. इथे तेराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत स्थानिक कुळांनी जमिनीची, पाळीव प्राण्यांची नासधूस केली आणि रक्ताचे पाट वाहिले. सीमेवरचा हा भाग काहीसा अराज्यसदृश 'नो मॅन्स लँड'प्रमाणे भरभराटीला येत गेला- हा प्रदेश स्वतंत्र नव्हता, पण इतका धोकादायक व बेबंद होता की स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यापैकी कोणालाही त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही किंवा तशी त्यांची इच्छा नव्हती.

Kirsten Henton

फोटो स्रोत, Kirsten Henton

दोन्ही देशांच्या सरकारांनी सोळाव्या शतकाच्या मध्यात, म्हणजे तीनेकशे वर्षांपूर्वी, काढलेल्या लक्षणीय संसदीय हुकुमामध्ये ही बाब नमूद केलेली आहे: "सर्व इंग्रजांना व स्कॉटिशांना अशा प्रत्येक व्यक्तीला व व्यक्तींना, त्यांच्या शरीरांना, त्यांच्या मालमत्तेला, वस्तूंना व पाळीव प्राण्यांना लुटण्याचं, त्यांची जाळपोळ करण्याचं, नासधूस करण्याचं, हत्या, खून व विध्वंस करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि असेल... यासंबंधी कोणत्याही तक्रारीचं निवारण केलं जाणार नाही."

हा हुकूम कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात आला असला, तरी इंग्लंड व स्कॉटलंड या दोहांसाठी हा जास्तकरून 'बाह्य' कायदा होता. कोणालाही 'डिबेटेबल लँड्स'ला सामोरं जाण्याची जबाबदारी घ्यायची नव्हती. या भूमीवर कोणाची मालकी आहे किंवा तिचं विभाजन कसं होतं, याबद्दल त्यांच्यात सहमती नसल्यामुळे कोणालाच त्याबद्दल जबाबदार धरता येत नव्हतं. स्कॉटलंड राष्ट्रीय संग्रहालयांच्या 'रेनसान्स अँड अर्ली मॉडर्न हिस्ट्री'च्या प्रमुख क्युरेटर डॉ. अॅना ग्राउंडवॉटर मला म्हणाल्या, "हा जमिनीचा तुकडा मूल्यवान नव्हता, उंचावर होता आणि शेतीच्याही काही शक्यता नव्हत्या, त्यामुळे बहुधा या जमिनीसाठी लढावं किंवा तिचं संरक्षण करावं असं वाटलं नसावं."

शिवाय, हा छोटा प्रदेश होता. ग्रेट्ना या स्कॉटिश शहरामध्ये सिनेबार किचन इथे गरमागरम चहाची वाट पाहत मी नकाशा तपासत होते, तेव्हा या भागाचं छोटेपण मला ठळकपणे जाणवलं. आठ मैलांहून थोडी जास्त रूंदी, उत्तरेकडल्या उंचवट्यापासून नैऋत्य टोकावरच्या ग्रेट्नाच्या वाळूप्रदेशापर्यंत जेमतेम 13 मैल, आणि सुमारे एकतृतीयांश भाग इग्लंडच्या उत्तरेला टेकलेला. माझ्या या शोधमोहिमेची सुरुवात ग्रेट्नामधून होणं अनेक अर्थांनी योग्य होतं. एडिन्बर्ग आणि कार्लिस्ली यांना जोडणाऱ्या ए-7 मार्गातून अगदी लहानशी आडवाट घेतली की ग्रेट्ना येतं. ए-7 मार्ग गतकालीन डिबेटेबल लँड्सच्या मधून येतो.

पळून जाऊ पाहणाऱ्या तरुण प्रेमिकांसाठीचं आश्रयस्थळ, असं ग्रेट्नाचं आस्थेवाईक वर्णन केलं जातं, पण पहिल्या महायुद्धावेळी शस्त्रास्त्रांचं उत्पादन करण्याचा उल्लेखनीय औद्योगिक वारसाही या शहराला लाभला आहे. या महायुद्धाने इथल्या समुदायाला प्रचंड वेगळा आकार दिला. इथल्या वास्तुकलेमध्ये विसाव्या शतकाच्या आरंभकाळाचं चांगलंच प्रतिबिंब पडलेलं आहे. कोणे-एके-काळच्या वसाहतिक पुनरुज्जीवन शैलीतल्या सिनेमाचा भास त्यात होतो. अशाच एका कॅफेतल्या उबदार वातावरणात मी चहाचे घोट घेत होते.

डिबेटेबल लँड्स

फोटो स्रोत, Getty Images

स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यातील सीमा 1237 साली यॉर्क तहाद्वारे प्रस्थापित झाली. ग्रॅहम रॉब यांनी 2018 सालच्या 'द डिबेटेबल लँड: द लॉस्ट वर्ल्ड बिट्वीन स्कॉटलंड अँड इंग्लंड' या त्यांच्या पुस्तकात लिहिल्यानुसार: "युरोपातली ही बहुधा सर्वांत जुनी राष्ट्रीय सीमा असावी." पण या सीमेवर अंतिम शिक्कामोर्तब झालं तेव्हा मूलतः कौटुंबिक मालकी असलेल्या जमिनीमधून ही रेषा गेल्याचं दिसतं, त्यामुळे कौटुंबिक मालकीचा काही प्रदेश दोन हिश्श्यात विभागला गेला. म्हणूनच ही सीमा राज्यसंस्थेच्या अधिसत्तेचं प्रतीक असली, तरी डिबेटेबल लँड्सचा प्रदेश एक प्रकारे बंडाचं निशाण फडकावणारा होता, तिथे बलशाली कुटुंबं स्कॉटलंड आणि इंग्लंड दोन्हीकडे एकमेकांची लूटमार करत होते, पण कोणत्याही देशाचं सरकार ही परिस्थिती निवळवण्यासाठी कटिबद्ध नव्हतं.

शेवटी या प्रदेशात अघोषित प्रवेशबंदी असल्यासारखी अवस्था आली. बॉर्डर रेव्हर्सचा वावर असलेला हा धोकादायक प्रदेश बनला. 'रेव्हिंग' या स्कॉटिश शब्दाचा अर्थ लूटमार करणे किंवा छापा टाकणे, असा होतो, त्यावरून 'बॉर्डर रेव्हर्स' हे तिथल्या रहिवाशांचं नाव पडलं. रेव्हर्स लोकांचा उंदरा-मांजराचा खेळ सुरू असायचा, ते एकमेकांची जनावरं पळवायचे. असे प्रकार 'सीमापारही घडत आणि त्या-त्या प्रदेशात अंतर्गत पातळीवरही घडत होते', म्हणजे 'हे गुन्हे इंग्रज विरुद्ध स्कॉटिश असेच होते असं नाही, तर अंतर्गत स्वरूपाचेही होते' असं ग्राउंडवॉटर नमूद करतात. ही लूटमार केवळ डिबेटेबल लँड्सपुरती मर्यादित नसली, तरी सर्वाधिक रक्तरंजित लूटमारीचे प्रकार या अस्पर्शित प्रदेशात घडले. शेवटी इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड यांच्यासह हा भाग ब्रिटनमधला चौथा देश होऊन गेला- पण या भागात बाहेरच्यांचा प्रवेश होत नव्हता आणि त्यांचे स्वतःचेच नियम होते.

इथला रूक्ष ओसाड प्रदेश, मधेच छोटीशी गावं, यामुळे या प्रतिमेत भरच पडते. कॅननबी आणि लँगहोम ही छोटी शहरं आता मासेमारीची व हायकिंगची स्थानिक केंद्रं झाली आहेत, पण मुळात ती डिबेटेबल लँड्समधल्या कौटुंबिक वसाहतींचे अवशेष वागवत होती. या भागाशी परिचय करून घेण्याच्या इतर काही ठरलेल्या वाटाही आहेत. उदाहरणार्थ, दोन्ही किनाऱ्यांदरम्यान प्रवास करणारा 'रेव्हर्स सायकल रुट' हा 173 मैलांचा पट्टा डिबेटेबल लँडसही सीमाप्रदेशातील इतरही काही भागांची सैर घडवतो, त्यातले भाग निवडून आपण भेटी देऊ शकतो.

Kirsten Henton

फोटो स्रोत, Kirsten Henton

ए-७पासून आणखी एक छोटा आडरस्ता घेतल्यावर मी रोवनबर्न इथे पोचले. चांगली देखभाल केलेलं एक सार्वजनिक उद्यान आणि सहा फुटांहून अधिक उंच असलेला (सोळाव्या शतकाच्या मानाने ही उंची खूप होती) लँग सँडीचा लाकडी कोरीव काम असलेला महाकाय पुतळा असलेलं हे गाव. अलेक्झांडर आर्मस्ट्राँग असं पूर्ण नाव असलेले लँग सँडी डिबेटेबल लँड्समधल्या शक्तिशाली स्कॉटिश आर्मस्ट्राँग कुळातले शेवटचे कुटुंबप्रमुख होते. आदर आणि तितकाच दरारा असलेले शेवटचे 'रेव्हर'. ब्रिटिश राजसत्तेने या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना लँग सँडी यांनी दीर्घ काळ प्रतिकार केला आणि अखेरीस सुमारे 1610च्या दरम्यान त्यांच्या 11 मुलग्यांसह त्यांना फाशी देण्यात आलं. या प्रदेशातील अनेक 'रेव्हर' लोकांचा शेवट असाच झाला.

मला इथून जवळच असलेल्या गिल्नोकी टॉवर या ठिकाणाला खरोखरच जायचं होतं. रोवनबर्नहून काहीच मिनिटांवर असणाऱ्या त्या ठिकाणी जाण्यासाठी मी चालायला लागले. सखल प्रदेशातल्या पील टॉवरच्या (सीमाभागात संरक्षणासाठी बांधली जाणारी उंच बंदिस्त दगडी इमारत) अजूनही अस्तित्वात असणाऱ्या उत्तम नमुन्यांमध्ये गिल्नोकी टॉवरची गणना होते. आता या टॉवरमध्ये क्लॅन आर्मस्ट्राँग सेंटर आहे- त्यात एक छोटेखानी संग्रहालय आणि डिबेटेबल लँड्समधला एक आवश्यक थांबा आहे.

ही इमारत हॉलोज गावाला लागूनच असल्यामुळे त्याला हॉलोज टॉवर असंही संबोधलं जातं. या टॉवरमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या इआन मार्टिन यांनी ही माहिती दिली. पाचशे वर्षांहून अधिक जुन्या या इमारतीत आम्ही आत जाऊ लागलो.

डिबेटेबल लँड्सच्या काळाच्या खूपच मोजक्या मूर्त खुणा उरलेल्या असल्यामुळे बहुधा गिल्नॉकी टॉवरच्या अवकाशात तो काळ जिवंत होताना दिसतो. सर्वांगाने हा संरक्षक मनोरा आहे- अभेद्य जाड दगडी भिंती, बुटक्या खिडक्या आणि छपरापाशी टेहळणीची जागा- तिथे उभं राहिलेला पहारेकरी आपल्याला सहज कल्पिता येतो. वर्षभर अभ्यागतांसाठी खुल्या असणाऱ्या या टॉवरमध्ये एक छोटं प्रदर्शन आणि कॅफे आहे, असं मार्टिन मला सांगतात. 'लोकांना थेट सोळाव्या शतकांमध्ये घेऊन जाणारी, त्यांना त्या अवघड काळातल्या कौटुंबिक जीवनाची झलक पाहायला मिळेल अशी' टूरही इथे उपलब्ध आहे (त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते). तत्कालीन दैनंदिन परिस्थिती कशी होती, रोजची कामं कोणती असायची, पारंपरिक जेवणाच्या सवयी कशा होत्या, अशा प्रकारची माहिती या टूरमध्ये मिळते.

Kirsten Henton

फोटो स्रोत, Kirsten Henton

ए-७वरच्या माझ्या प्रवासाची चर्चा करताना मार्टिन म्हणाले की, या भागाला अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. "सीमाभागातून कॅननबी, गिल्नोकी टॉवर, लँगहोम आणि पुढे तुम्ही गाडी चालवत जाल, तसतसा कापडोद्योगाचा इतिहास उलगडतो- शिवलेले आणि विणलेले असे दोन्ही प्रकारचे कपडे इथे तयार केले जात होते. (डिबेटेबल लँड्सजवळच्या हॉविकसारख्या ठिकाणी) हा इतिहास सांगणारी काही विलक्षण प्रदर्शनं आहेत. इतरही काही अनुभवांची झलक दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. अनेक वर्षं दुर्लक्ष झालेल्या ए-७ मार्गाकडे अधिकाधिक लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत," असं ते सांगतात.

हा भाग दुर्गम असला तरी तत्कालीन रेव्हर लोकांना त्याची फिकीर नव्हती. अधिकृत नोंदींनुसार 1551 सालापर्यंत डिबेटेबल लँड्स हा प्रदेश मुख्यभूमीपासून तुटलेल्या परिस्थितीत होता. इंग्लंड व स्कॉटलंड यांच्यात 1551 साली सहमतीचा करार झाला, त्यातून 1552 साली स्कॉट्स डाइकचं बांधकाम झालं. "स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन देशांमधील अचूक सीमा या बांधकामाने निश्चित झाली," असं मार्टिन सांगतात. अखेरीस साडेतीन मैलांच्या या मानवनिर्मित बंधाऱ्यामुळे डिबेटेबल लँड्स परिसर दोन देशांमध्ये विभागला गेला. आता या बंधाऱ्याचा अगदी थोडाच भाग दिसतो.

हे बांधकाम सुरुवातीला व्यावहारिक उपयोगापेक्षा प्रतीकात्मकतेच्या कारणाने झालेलं होतं. या बंधाऱ्यामुळे लूटमारीचे प्रकार कमी व्हायला फारशी काही मदत झाली नाही. 1603साली राजसत्तांचं एकीकरण झाल्यानंतर राजे जेम्स सहावे व पहिले, स्कॉटलंडचा राजा व इंग्लंडचा पहिला स्टुअर्ट राजा यांनी या भागात लक्ष घातलं. या भागाची व्यवस्था लावण्यासाठी नवीन पर्यवेक्षक नेमण्यात आले आणि प्रमुख रेव्हर नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. लँग सँडी यांच्यासारख्या काहींना फाशी देण्यात आलं, तर अनेकांना हद्दपार करण्यात आलं. या भागात कायदा व सुव्यवस्थेचा आभास निर्माण करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू झाले.

यानंतर माझी गाडी ए-७ मार्गावरून उत्तरेकडे धावू लागली, रिअर-व्ह्यू मिररमध्ये गिल्नोकी टॉवर दिसत होता. हा छोटासा आणि सर्वांत विवाद्य असा भूभाग इतक्या लक्षणीय बेबंदशाहीमध्ये तग धरून राहिला, तिथे इतकी रोचक व्यक्तिमत्व होऊन गेली, तरीही तो इतका अंधारात कसा राहिला, याबद्दल मला राहून राहून कुतूहल वाटत होतं.

पण इथेच डिबेटेबल लँड्सच्या परिसराची आवाहकता लक्षात येते: या अनाकलनीय काळाचं गूढ, त्यासोबतची इथली सीमाभागातली छोटी शहरं नि गावं, आणि अजूनही जवळपास रेव्हर लोकांच्या काळाइतकाच रानवट आणि न माणसाळलेला तिथला निसर्ग, हाच त्या गुढाचा स्त्रोत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)