Pegasus Spyware तयार करणारी NSO कंपनी अमेरिकेकडून ब्लॅकलिस्ट

फोटो स्रोत, EPA
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी हिंदी
वादग्रस्त पेगासस स्पायवेअर तयार करणारी कंपनी एनएसओ ग्रुपला अमेरिकेनं काळ्या यादीत टाकलं आहे.
अमेरिकेनं एनएसओ ग्रुपला ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपन्यांच्या यादीत टाकत त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची व्यावसायिक डील करण्यावर बंदी लावली आहे.
एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरचा वापर करून अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नेते, मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
18 जुलैला वॉशिंग्टन पोस्ट आणि भारतातली न्यूज वेबसाईट 'द वायर' ने एक बातमी प्रसिद्ध केली. त्यात असा दावा केला होता की, जगभरातले अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले गेले आहेत.
एनएसओ ग्रुप आणि इस्रायलमधील कैंदिरू या आणखी एका कंपनीनं "अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणाच्या हितांना प्रतिकूल ठरणारं कृत्य केलं आहे," असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
एनएसओ समुहानं आधी हे स्पायवेअर गुन्हेगार आणि दहशतवादी यांना पकडण्यासाठी तयार करण्यात आलं आहे असं सांगितलं होतं. कंपनी केवळ सरकारलाच याची विक्री करत असल्याचंही सांगण्यात आलं होतं.
मात्र, अमेरिकेच्या या निर्णयावर एनएसओ ग्रुपनं नाराजी व्यक्त केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखण्याबरोबरच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मदत केली असल्याचं, एनएसओ ग्रुपनं म्हटलं आहे.
"आमच्याकडे नियम अत्यंत कठोरपणे पाळले जातात आणि आम्ही मानवाधिकारांचंही तेवढ्याच कठोरपणे पालन करतो, हे आम्ही सर्वांना सांगू इच्छितो. ते अमेरिकेच्याच मूल्यांवर आधारित आहेत आणि आम्ही मनापासून त्यात सहभागी आहोत. त्यामुळंच, आमच्या उत्पादनांचा दुरुपयोग करणाऱ्या सरकारी एजन्सींबरोबर आम्ही आधीच करार रद्द केले आहेत," असं एनएसओ कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
या कंपनीने कायमच दावा केलाय की ते हा प्रोग्रॅम फक्त 'निरखून-पारखून' घेतलेल्या काही ठरविक कंपन्यांना विकतात.
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारतातले पत्रकार आणि इतर लोकांचे फोनही इस्रायलनिर्मित या सॉफ्टवेअरव्दारे हॅक केले गेलेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलंय.
पेगासस काय आहे आणि कशाप्रकारे काम करतं?
पेगासस एक सर्व्हेलन्स सॉफ्टवेअर आहे जे इस्रायलची सुरक्षा कंपनी एनएसओ ग्रुपने बनवलं आहे. हे सॉफ्टवेअर वापरून कोणत्याही व्यक्तीचा फोन हॅक केला जाऊ शकतो आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकतं.

फोटो स्रोत, NURPHOTO/GETTY IMAGES
ज्या फोनला लक्ष्य करायचं आहे त्या फोनमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. एकदा का ते सॉफ्टवेअर कार्यान्वित झालं की, त्यामुळे फोनचा रिमोट अॅक्सेस मिळतो, म्हणजेच फोनच्या जवळ न जाताही त्यातले कॉल लॉग, कॉन्टॅक्ट, मेसेज यांच्यावर लक्ष ठेवता येतं.
जेरूसलेमस्थित द इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीजशी संबंधित सायबर सुरक्षा तज्ज्ञ कर्नल गाबी सिबोनी यांच्या मते, "हे सॉफ्टवेअर नक्की कसं काम करतं याबद्दल फारशी माहिती अजून उपलब्ध नाहीये. एनएसओने तयार केलेलं हे एक अतिप्रगत सॉफ्टवेअर आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
एनएसओ या कंपनीची स्थापना 2009 साली झाली होती. ही कंपनी निगराणीसाठी अतिप्रगत सॉफ्टवेअर बनवते. अनेक देशांची सरकारं या कंपनीची ग्राहक आहेत.
कोण हे सॉफ्टवेअर विकत घेऊ शकतं?
एनएसओचा दावा आहे की, हे सॉफ्टवेअर फक्त सरकारं किंवा सरकारी यंत्रणांना दिलं जातं. सार्वजनिक माहितीनुसार पनामा आणि मेक्सिकोची सरकारं याचा वापर करतात.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांमध्ये 51 टक्के सरकारी गुप्तचर यंत्रणा आहेत, 38 टक्के कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्था आहेत आणि 11 टक्के वेगवेगळ्या देशांचं सैन्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एनएसओच्या म्हणण्यानुसार अतिरेक्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे. भारत सरकार या कंपनीचं ग्राहक आहे की नाही याची पुष्टी केली जाऊ शकतं नाही.
गाबा सिबोनी यांच्या मते, "इस्रायलमध्ये सैन्य आणि सर्व्हेलन्स टेक्नोलॉजीच्या निर्यातीवरून कडक नियम आहेत. या नियमांचं उल्लंघन झालं तर कारवाई होऊ शकते. या रिपोर्टमध्ये दावा केल्या त्याप्रमाणे या सॉफ्टवेअरचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांवर केला जात असेल तर इस्रायल त्यांच्यावर कारवाई करू शकतं."
या सॉफ्टवेअरचं लायसन्स केवढ्याला मिळतं?
याचं कोणतंही ठोस उत्तरं नाहीये. सहसा एका गुप्त कराराअंतर्गत हे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट केलं जातं. कंपनी वेगवेगळ्या सरकारांना वेगवेगळ्या दराने हे सॉफ्टवेअर विकते.
गाबा सिबोनी म्हणतात की, याची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही.

फोटो स्रोत, ALEXANDER RYUMIN/GETTY IMAGES
होलोन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये सायबर विभागाचे प्रमुख असणारे डॉ हारेल मेनाश्री म्हणतात की, हे स्पायवेअर फार महाग असतं. याची खरी किंमत तर आम्हाला माहिती नाही पण ते कित्येक लाख डॉलर्सला विकले जाऊ शकतात."
"ज्या देशांकडे हे तंत्रज्ञान नसतं ते याची खरेदी करतात. म्हणजे सैन्याने विमानं खरेदी करण्यासारखंच आहे हे. याचा कसा वापर करावा याच्या काही अटी असतात पण एकदा विकलं गेल्यानंतर याचा वापर कसा होईल यावर विक्रेत्याचं नियंत्रण नसतं. एनएसओ याचे वेगवेगळे व्हर्जन्स विकत असेल आणि प्रत्येक मॉड्यूलची किंमत वेगवेगळी असेल. लायसन्स एग्रीमेंटवरही किंमत ठरते."
मीडिया रिपोर्टच्या अनुसार काही ठराविक लोकांवर लक्ष ठेवण्याची फी कोट्यवधी रूपये असू शकते.
अर्थात, हा करार गुप्त असतो त्यामुळे एका व्यक्तीवर किती पैसा खर्च झाला ते कधीच समोर येत नाही.
एनएसओ हॅकिंग करते?
एनएसओचं म्हणणं आहे की, त्यांची कंपनी फक्त सॉफ्टवेअर विकते. त्याचा वापर कसा केला जातो यावर कंपनीचं काहीही नियंत्रण नाही. एकदा विकल्यानंतर कंपनी ना सॉफ्टवेअर पुन्हा एक्सेस करत ना डेटा साठवत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. गाबी म्हणतात की, "हे सॉफ्टवेअर वापरणं सोपं नाही. यासाठी वेगळं प्रशिक्षण द्यावं लागतं. त्यामुळे एनएसओच हे सॉफ्टवेअर खरेदी करणाऱ्या सरकारांच्या काही ठराविक माणसांना ते कसं वापरावं यासाठी प्रशिक्षण देत असेल."
तर प्रोफेसर हारेल म्हणतात की, "हे नुस्तं टूल नाहीये तर संपूर्ण सिस्टिम आहे. ती वापरण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे."
लोकांवर लक्ष ठेवायचं हत्यार?
एनएसओ म्हणते की हे सॉफ्टवेअर सर्वसामान्य जनतेवर पाळत ठेवायला नाही तर काही विशिष्ट लोकांवर लक्ष ठेवायला बनवलं गेलंय.
याव्दारे त्या लोकांवर लक्ष ठेवता येऊ शकतं ज्यांचा कोणत्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय आहे. अशा व्यक्तींचा फोन हॅक करून हे सॉफ्टवेअर त्यांच्यावर पाळत ठेवतं.

फोटो स्रोत, SERGEI KONKOV/GETTY IMAGES
प्रोफेसक हारेल म्हणतात की, "लक्ष्याच्या फोनवर हे सॉफ्टवेअर नियंत्रण मिळवतं. त्याच्यातला डेटा काढून एक्सेस एजेंसीला दिला जातो. यामुळे फोन ऐकले जाऊ शकतात, फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनचाही वापर केला जाऊ शकतो."
पेगासस फोन कसं हॅक करतं?
सायबर तज्ज्ञांनुसार सहसा ज्यांच्यावर पाळत ठेवायची आहे अशा व्यक्तीला करप्ट मेसेज किंवा फाईल पाठवून डिव्हाईस हॅक केलं जातं.
प्रोफेरस हारेल म्हणतात, "या सॉफ्टवेअरबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये. पण टूलप्रमाणेच हाही फोन हॅक करत असेल फक्त यांची पद्धत अतिप्रगत असेल. हॅकर कोणती ना कोणती कमजोरी शोधतातच."
तर कर्नल गाबी सिबोनी म्हणतात की, "हे सांगणं अवघड आहे की हे सॉफ्टवेअर कसं काम करतं. एसएसओचं हे बिझनेस सिक्रेट आहे. या क्षेत्रातल्या संशोधकांनाही याबद्दल फारशी माहिती नाही."
ते पुढे म्हणतात की हे सॉफ्टवेअर इतकं प्रगत आहे की आपला फोन हॅक झालाय हे लक्ष्याला कळतही नाही आणि ते आपला फोन आधीसारखाच वापरत राहातात.
आपला फोन हॅक झालाय की नाही हे कळण्याचे काही मार्ग आहेत का असं विचारल्यावर गाबी म्हणतात की, "जर लक्ष्याला कळलं की, आपला फोन हॅक झालाय तर तो हॅक करण्याचा फायदा काय?"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








