Facebook Metaverse: फेसबुकचे नाव होणार मेटा, जाणून घ्या 'फेसबुक मेटाव्हर्स' म्हणजे काय?

व्हर्च्युअल रिएलिटी हेडसेट घातलेली महिला

फोटो स्रोत, Getty Images

फेसबुकने आपले नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही घोषणा करण्यात आली.

'या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहे आणि ज्या क्षेत्रात कायम करत आहेत, त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल,' असा विचार या वेळी मांडण्यात आला.

याआधी, 'मेटाव्हर्स' (Metaverse) विकसित करण्यासाठी युरोपात 10 हजार जणांची नियुक्ती करणार असल्याचं फेसबुकने जाहीर केलं होतं.

ही संकल्पना म्हणजे इंटरनेटचं भविष्य असेल असं म्हटलं जातंय. पण नक्की हे काय आहे हे या निमित्ताने आपण समजून घेऊ.

'मेटाव्हर्स' (Metaverse) काय आहे?

पाहणाऱ्या एखाद्याला कदाचित ही VR म्हणजेच व्हर्च्युअल रिएलिटी (Virtual Reality) ची सुधारित आवृत्ती वाटू शकेल. पण मेटाव्हर्स हे इंटरेनेटचं भविष्य असेल, असं काहींनी वाटतंय.

मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल आणि कम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल.

थोडक्यात सांगायचं झालं तर 1980च्या दशकातल्या बोजड हँडसेट्सची जागा जशी आजच्या आधुनिक स्मार्टफोन्सनी घेतली तसंच काहीसं VR आणि मेटाव्हर्सबद्दल म्हणता येईल.

म्हणजे कॉम्प्युटरऐवजी एखादा हेडसेटवापरून तुम्ही या मेटाव्हर्सचा अनुभव घेऊ शकता. हा हेडसेट तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिजीटल अनुभव असणाऱ्या एका व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे आभासी जगताशी जोडेल.

सध्या व्हर्च्युएल रिएलिटी म्हणजेच VR चा वापर हा जास्त गेमिंगसाठी केला जातो. पण मेटाव्हर्स मात्र काम, टाईमपास, कॉन्सर्ट्स, सिनेमा किंवा नुसती मजामस्ती करायलाही वापरता येईल.

या मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही. पण यामध्ये तुमचं प्रतिनिधित्वं करणारा तुमचा एक 3D अवतार असेल, असं बहुतेकांना वाटतंय.

अचानक मेटाव्हर्सची चर्चा का सुरू आहे?

आभासी जग आणि ऑगमेंटेड रिएलिटी (augmented reality) याविषयीची चर्चा सुरूच असते.

ऑक्युलस क्वेस्ट 2 VR गेमिंग हेडसेट

फोटो स्रोत, Oculus

फोटो कॅप्शन, 2020च्या ख्रिसमस गिफ्ट्साठी ऑक्युलस क्वेस्ट 2 VR या गेमिंग हेडसेट्सना मोठी मागणी होती.

पण मोठ्या टेक कंपन्या आणि श्रीमंत गुंतवणूकदारांमध्ये सध्या या मेटाव्हर्सबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि हेच जर इंटरनेटचं भविष्य असेल तर आपण त्यात मागे राहू नये, असा या सगळ्यांचा प्रयत्न आहे.

शिवाय VR वापरून सुरू असलेलं अॅडव्हान्स गेमिंग आणि कनेक्टिव्हिटीमध्ये होत असलेली सुधारणा यामुळे टेक्नॉलॉजीतल्या या नव्या पुढच्या टप्प्याच्या आपण अगदी जवळ असल्याचं म्हटलं जातंय.

मेटाव्हर्समध्ये फेसबुकची काय भूमिका?

मेटाव्हर्स विकसित करण्याला आपलं प्राधान्य असणार असल्याचं फेसबुकने म्हटलंय.

ऑक्युलस हेडसेट्सच्या (Oculus) माध्यमातून फेसबुकने व्हर्च्युअल रिएलिटी (VR) मध्ये मोठी गुंतवणूक केलेली होती आणि प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी किंमतीत हे हेडसेट्स विकण्यासाठी त्यांनी कदाचित तोटाही पत्करला, असं काही अॅनालिस्टचं म्हणणं आहे.

या सोबतच फेसबुक सोशल हँगआऊट्स आणि वर्कप्लेससाठी VR अॅप्स तयार करत आहे.

आपल्या स्पर्धक कंपन्यांना यापूर्वी फेसबुकने विकत घेतलेलं होतं. पण "मेटाव्हर्स कोणा एका कंपनीद्वारे एका रात्रीत तयार केलं जाऊ शकत नाही," असा फेसबुकचा दावा आहे आणि भविष्यात यासाठी इतर कंपन्यांच्या सोबत काम करण्याची तयारी फेसबुकने दर्शवली आहे.

नुकताच फेसबुकने सुरक्षित मेटाव्हर्सची निमिर्ती करणाऱ्या एका ना नफा तत्वावर काम करणाऱ्या गटाला 50 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला आहे.

पण मेटाव्हर्स खऱ्या अर्थाने अस्तित्वात यायला अजून 10 ते 15 वर्षं लागणार असल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे.

मेटाव्हर्समध्ये अजून कोणाला रस आहे?

फोर्टनाईट (Fortnite) हा गेम तयार करणाऱ्या एपिक गेम्स कंपनीचे प्रमुख्य स्वीने हे मेटाव्हर्समध्ये आपल्याला रस असल्याचं म्हणत आले आहेत.

ऑनलाईन मल्टीप्लेयर गेम्सनी खरंतर सगळ्यांना एकत्र अनुभवता येतील अशी इंटरॅक्टिव्ह वर्ल्ड यापूर्वीच आणलेली आहेत. हे मेटाव्हर्स नसलं तरी हाच मेटाव्हर्सचा गाभा असेल.

गेल्या काही वर्षांमध्ये फोर्टनाईटमध्ये खूप बदल झाले. त्यांनी त्यांच्या डिजिटल जगतामध्ये कॉन्सर्ट्स भरवले, ब्रँड इव्हेंट्स केल्या. यातूनच भविष्यात आणखी काय काय होऊ शकतं, याची झलक पहायला मिळाली.

इतर गेम्सही मेटाव्हर्सच्या या संकल्पनेच्या जवळ येत आहेत. म्हणजे रोब्लॉक्स (Robox) हा इतर अनेक वैयक्तिक खेळांना एकत्र आणणारा प्लॅटफॉर्म आहे. युनिटी या 3D प्लॅटफॉर्मने 'डिजिटल ट्विन्स' म्हणजे खऱ्या जगाच्या डिजीटल कॉपीमध्ये गुंतवणूक केली आहे.

Nvidia ही ग्राफिक्स कंपनी स्वतःचं एक 'Omniverse' ओम्नीव्हर्स तयार करतेय. इतर व्हर्च्युअल 3डी जगतांना एकमेकांशी जोडणारा हा प्लॅटफॉर्म असेल.

हे सगळं गेमिंगपुरतं मर्यादित असेल का?

मेटाव्हर्स कसं असेल याबाबतच्या अनेक कल्पना असल्या तरी Social Human Interaction म्हणजेच व्यक्तींचा एकमेकांशी संवाद हा याचा गाभा असेल.

उदाहरणार्थ- फेसबुक सध्या वर्कप्लेस नावाच्या VR मीटिंग अॅपच्या आणि होरायझन्स (Horizons) नावाच्या सोशल स्पेसच्या चाचण्या घेतंय. या दोन्हींमध्ये व्हर्च्युअल अवतार वापरले जातात.

फेसबुक वर्कप्लेस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, फेसबुक वर्कप्लेसमध्ये मीटिंग्स VR द्वारे होतील आणि लोकांना त्याचवेळी त्यांचे कंप्युटर्सही वापरता येतील.

VRChat नावाचं आणखी एक VR अॅप हे ऑनलाईन गप्पा आणि चॅटिंगसाठी आहे. एकमेकांना भेटणं आणि जाणून घेणं हेच या अॅपचं उद्दिष्टं आहे.

हे तंत्रज्ञान अस्तित्वात आहे का?

गेल्या काही वर्षांमध्ये व्हर्च्युअल रिएलिटीमध्ये अनेक बदल झाले आहेत. म्हणजे असे महागडे हेडसेट्स आले आहेत ज्यामुळे व्हर्च्युअल जगात गेमिंग करणाऱ्या प्लेयरला इतर खेळाडून 3डीमध्ये आपल्या बाजूला असल्याचा भास होतो.

शिवाय हे तंत्रज्ञान आता रुळायलाही सुरुवात झाली आहे. 2020च्या ख्रिसमस गिफ्ट्साठी ऑक्युलस क्वेस्ट 2 VR या गेमिंग हेडसेट्सना मोठी मागणी होती.

NFT मध्ये लोकांचा वाढता रस पाहता आता व्हर्च्युअल अर्थव्यवस्थेकडेही वेगळ्या दृष्टीने पाहिलं जाऊ लागलंय.

5जी आल्यानंतर डिजिटल जग अधिक जोडलं जात आतापर्यंत अडथळा ठरणारा कनेक्टिव्हिटीचा मुद्दाही दूर होईल.

सध्यातरी या सगळ्या गोष्टी अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. पण मेटाव्हर्सचं विकसित करण्यासाठी पुढचं दशकभर मोठ्या टेक कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू राहील.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)