You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुप्ता ब्रदर्स कोण आहेत? त्यांचा भारताशी काय संबंध?
दक्षिण अफ्रिकेतील प्रसिद्ध उद्योगपती राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता यांना सोमवारी (6 जून) यूएईमध्ये अटक करण्यात आली. गुप्ता कुटुंबाला आफ्रिकेमध्ये गुप्ता ब्रदर्स नावाने ओळखलं जातं.
दक्षिण अफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक, राजकीय प्रभावाचा गैरवापर, नफेखोरी आणि भ्रष्टाचाराचा आरोप गुप्ता यांच्यावर आहेत. जेकब झुमा आणि गुप्ता यांनी अनेकवेळा या आरोपांचं खंडन केलंय.
दक्षिण आफ्रिकेच्या जस्टीस आणि करेक्शनल सर्व्हिसेस मंत्रालयाने गुप्ता बंधुंना अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी दक्षिण अफ्रिका प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.
राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता मूळचे भारतीय वंशाचे असून, उत्तरप्रदेशच्या सहारणपूरचे आहेत.
गुप्ता बंधूंना कुठे झाली अटक?
गुप्ता बंधुंच्या अटकेबाबत दक्षिण आफ्रिकेच्या जस्टीस आणि करेक्शनल सर्व्हिसेस (Justice and Correctional Services) मंत्रालयाने सोमवारी (6 जून) प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, "यूएईकडून फरार आरोपी राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता यांना अटक झाल्याची माहिती मिळाली आहे."
"याबाबत यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतील अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिका यूएईला संपूर्ण सहकार्य करत आहे."
गुप्ता बंधूंच्या प्रत्यार्पणासाठी दक्षिण आफ्रिका सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मार्च महिन्यामध्ये इंटरपोलने गुप्ता बंधूंविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दक्षिण आफ्रिका सरकारकडून 2021 पासून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
गुप्ता यांना यूएईमध्ये अटक करण्यात आली असली तरी, गुप्ता बंधूंना तात्काळ दक्षिण आफ्रिकेत पाठवलं जाईल की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.
गुप्ता ब्रदर्सचा भारताशी संबंध काय?
गुप्ता ब्रदर्स मूळचे भारतातील उत्तर प्रदेशच्या सहारणपूरचे आहेत. अजय, अतुल आणि राजेश गुप्ता 1993 मध्ये दक्षिण अफ्रिकेत जाऊन स्थायिक झाले.
गुप्ता भावांचे वडील शिवकुमार गुप्ता मसाल्याचे व्यापारी होते. त्यांनी आपल्या मुलांना व्यापारासाठी परदेशी जाण्यास प्रोत्साहित केलं. अजय गुप्ता रशियाला, अतुल गुप्ता दक्षिण अफ्रिकेत तर राजेश गुप्ता यांनी चीनमध्ये व्यवसाय सुरू केला. त्यानंतर काही वर्षांनी गुप्ता कुटुंबिय दक्षिण अफ्रिकेत एकत्र आले.
जेकब झुमा यांना ते राष्ट्रपती होण्याच्या आधी सहाराच्या एका कार्यक्रमात भेटलो होतो, असं अतुल गुप्ता यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल गुप्ता सहारा कंम्पूटर्सचा व्यवसाय करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत गेले. हळूहळू दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचा व्यवसायावर जम बसला.
गुप्ता कुटुंबाबत बीबीसी हिंदीशी बोलताना प्रो. अजय कुमार दुबे सांगतात, "गुप्ता कुटुंब सहारणपूर जिल्ह्यातील आहे. त्यांनी दक्षिण अफ्रिकेत जाऊन छोटा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी राजकीय नेत्यांसोबत ओखळ आणि संपर्क वाढवला."
त्यांचा व्यवसाय मोठा होत गेला आणि त्यांनी आपल्या कंपनीत 10,000 पेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवलं. त्याचसोबत खाणकाम, हवाई वाहतूक, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि मीडिया सेक्टरमध्ये त्यांचा विशेष रस होता.
ते पुढे सांगतात, "दक्षिण अफ्रिकेत सत्तापाटल झाल्यानंतर त्यांनी राजकीय मैत्रीचा फायदा घेण्यास सुरूवात केली. झुमा यांनी गुप्ता यांचा बिझनेस वाढण्यासाठी खूप मदत केली."
साल 2019 मध्ये गुप्ता कुटुंबियांनी भारतातील उत्तराखंडमध्ये मुलाचं केलेलं लग्न मोठा चर्चेचा विषय ठरला होता. या लग्नात जमा झालेल्या कचऱ्यामुळे हे लग्न चर्चेचा विषय झालं. या लग्नासाठी तब्बल 200 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. या लग्नात 200 टन कचरा जमा झाला होता, असं बोललं गेलं.
गुप्ता बंधूंवर आरोप काय?
गुप्ता बंधूंवर भ्रष्टाचार, लाचखोरी आणि राजकीय प्रभावाचा आपल्या फायद्यासाठी गैरवापर करण्याचा आरोप आहे. 2018 मध्ये लाचखोरीच्या आरोपावरून दक्षिण अफ्रिकेत त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती.
भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या समितीने गुप्ता बंधूंविरोधातही चौकशी सुरू केली होती. त्यानंतर गुप्ता दक्षिण अफ्रिका सोडून फरार झाले होते.
गुप्तांवर मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांना चांगली पोस्टींग मिळवून देण्यासाठी राजकीय ओळखीचा प्रभाव वापरल्याचाही आरोप आहे. राजकीय मैत्रीच्या प्रभावाचा वापर करून सरकारी पैशाचा अपहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
भारतामध्येही गुप्ता यांच्यावर मनी लॉंडरिंगप्रकरणी चौकशी सुरू आहे. 2018 मध्ये दिल्लीतील त्यांच्या कंपनीवर छापे मारण्यात आले होते.
गुप्ता यांच्या लाचखोरी प्रकरणात चार वर्षं चौकशी सुरू होती. चौकशी समितीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, 'गुप्ता यांचे जेकब झुमा यांच्या आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस आणि सरकारी विभागात अत्यंत जवळचे लागेबांधे होते.'
तपास अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमधील माहितीनुसार, 'गुप्ता बंधूंनी रेल्वे, बंदरं आणि बांधकाम व्यवसायात गैरमार्गाने पैसा कमवला होता. गुप्ता यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी झुमा करत होते.'
आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असल्यामुळे 2017 मध्ये गुप्ता कुटुंबियांचं बॅंक एकाउंट सील करण्यात आलं होतं. ज्यामुळे तब्बल 8000 कर्मचाऱ्यांना पगार देणं त्यांच्यासाठी मुश्किल झालं होतं.
जेकब झुमांशी जवळचे संबंध?
गुप्ता ब्रदर्सचे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असल्याची माहिती आहे. जेकब झुमा 2009 पासून सलग 9 वर्षं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
जेकब झुमा यांच्यावर लाचखोरीचे अनेक आरोप करण्यात आले होते. त्यामुळे झुमा यांना आपलं पद सोडावं लागलं होतं.
गुप्ता ब्रदर्सवर जेकब झुमा यांच्यासोबतच्या संबंधांचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी वापर केल्याचा आरोप आहे. झुमा यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधाचा फायदा घेत गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेतील विविध सरकारी विभागात मोठा दबदबा निर्माण केला होता.
गुप्ता आणि माजी राष्ट्राध्यक्ष जेबक झुमा यांचे संबंध इतके जवळचे होते की, दक्षिण अफ्रिकेत यांच्या मैत्रीला 'झुप्ता' या नावाने ओखळलं जात होतं. झुमा यांची पत्नी बोंगी नग्मा ही झुमा गुप्ता यांच्या जेआयसी मायनिंग कंपनीत जनसंपर्क अधिकारी होती. तर मुलगी दुदुजिल झुमा सहारा कंप्युटर्समध्ये संचालक पदावर काम करत होती.
तर, जेकब झुमा यांचा मुलगा दुदुजेन हा गुप्ता यांच्या अनेक कंपन्यांमध्ये संचालक होता. मात्र सार्वजनिक दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
लाचखोरी प्रकरणी चौकशी समितीसमोर जबाब देण्यास नकार दिल्यामुळे जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या जेलची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 2 महिने जेलमध्ये शिक्षा भोगल्यानंतर त्यांची पॅरोलवर मुक्तता करण्यात आली.
सरकारी अधिकाऱ्यांच्या जबाबानुसार, गुप्ता यांच्या कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर दवाब टाकण्यात येत होता. आरोप असाही आहे की दक्षिण आफ्रिकेतील सार्वजनिक कंपन्यांवर गुप्ता कुटुंबियांनी जम बसवला होता.
झुप्ता फॅक्टर
साल 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी उपअर्थमंत्री मिकेबिसी जोनस यांनी आरोप केला की, गुप्तांनी त्यांना अर्थमंत्रिपदाचं आमिष दाखवलं. तसंच त्यांना आर्थिक फायदा करून दिला तर 600 दशलक्ष रॅंडची लाच देण्याचा प्रस्तावसुद्धा ठेवला होता.
तर 2017 मध्ये एका लीक झालेल्या ई-मेलवरून कळून आलं की दक्षिण आफ्रिकेच्या सरकारवर गुप्ता यांचा किती मोठा प्रभाव आहे. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेत गुप्ता आणि जेकब झुमा यांच्याविरोधात आंदोलन सुरू झालं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)