इम्रान ताहीर: प्रेमासाठी त्याने पाकिस्तान सोडलं आणि दक्षिण आफ्रिका गाठलं

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

वर्ल्ड कपचा तो केवळ दुसराच बॉल होता. नव्या वर्ल्ड कपची नवलाई मनात ताजी होती. ओव्हलच्या मैदानावरचे प्रेक्षक आपापली जागा पटकावून सज्ज होत होते. निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीरने इंग्लंडचा धडाकेबाज बॅट्समन जॉनी बेअरस्टोला अक्षरक्ष: चकवला.

बॉल थांबून वळला आणि बेअरस्टोच्या बॅटची कड घेऊन कीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. बॉल कीपरने टिपला हे बघताच ताहीरने हात फैलावले, विधात्याचे आभार मानले आणि तो धावत सुटला. आणि नेहमीप्रमाणे जगभरातल्या चाहत्यांना ताहीरचं अतरंगी असं विकेटचं सेलिब्रेशन अनुभवायला मिळालं.

विकेट मिळाल्याच्या आनंदात ताहीर मैदानाच्या कुठल्याही टोकाला धावत सुटतो. शोऑफ पेक्षा आनंदातिरेकात तो बेभान होतो. ताहीरचं वय आहे ४० पण एखाद्या शाळकरी मुलाच्या उत्साहाने तो आजही प्रत्येक विकेट साजरी करतो.

धावणं म्हणजं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. कदाचित धावणं ताहीरच्या आयुष्याचं प्रतीक आहे.

जन्म लाहोर अर्थात पाकिस्तानचा. लहानाचा मोठाही तिथेच झाला. क्रिकेटच्या शोधात आठ वर्षं इंग्लंड. आणि मग प्रेमाच्या पूर्ततेसाठी दक्षिण आफ्रिका. ताहीरच्या मैदानावरच्या यशाइतकंच तीन विभिन्न देशांची संस्कृती आपलीशी करण्याचं कौशल्य अचंबित करणारं.

ताहीरने क्रिकेटची धुळाक्षरं पाकिस्तानातच गिरवली. मोठं कुटुंब होतं आणि परिस्थिती बेतास बेत अशी. स्विंग ऑफ सुलतान असं पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सना म्हटलं जातं. पण ताहीरला फिरकीची जादू जवळची वाटली. प्रतिभाशाली खेळाडूंची खाण असं पाकिस्तानला म्हटलं जातं.

एकापेक्षा एक सरस खेळाडू तिथे जन्माला येतात. अनेकजण नैसर्गिक प्रतिभेला मेहनतीची जोड देऊन कर्तृत्ववान होतात. वयोगट स्पर्धांमध्ये ताहीर स्वत:ला सिद्ध करू पाहत होता.

१९९८ साली U19 वर्ल्डकपच्या निमित्ताने ताहीर पाकिस्तानच्या संघाचा भाग म्हणून ताहीर दक्षिण आफ्रिकेत गेला. मॅच सुरू असताना त्याने स्टेडियममध्ये तिला पाहिलं. तिनेही त्याला पाहिलं. दुसऱ्या दिवशी विमानतळावर भेट झाली. तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता परंतु इमेल होते. इमेल आयडींची देवाणघेवाण झाली.

प्रेमांकुर डिजिटल माध्यमातून विहरू लागले. ताहीर पाकिस्तानात परतला. पाकिस्तान संघात स्थान मिळवणं इतकं सोपं नाही हे त्याच्या लक्षात आलं. घरातला मोठा या नात्याने कमावण्याची जबाबदारी होती. जगण्यासाठी पैसा आणि आवडीसाठी क्रिकेट यासाठी त्याने इंग्लंड गाठलं.

फॅक्टरीमध्ये बारा तास काम केलं. स्वत:चं जेवण स्वत: तयार करू लागला. हळूहळू त्याच्या फिरकीची किमया इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये दिसू लागली. दूरवरच्या आफ्रिकेत प्रेमाच्या आणाभाका पाठवल्या जायच्या. मोबाइलचं प्रस्थ वाढल्यावर बोलणं होऊ लागलं. काऊंटी क्रिकेटने ताहीरला आर्थिक आधार दिला.

इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात स्विंग करणारे बॉलर अत्यंत खपणीय. परंतु ताहीरने आपल्या बोटातली जादू पिचरुपी कॅनव्हासवर दाखवायला सुरुवात केली. स्पिन बॉलर म्हणून ताहीरची ओळख प्रस्थापित झाली. घरचे पाकिस्तानमध्ये, प्रेम आफ्रिकेत आणि ताहीर इंग्लंडमध्ये असं आठ वर्ष चाललं.

आता एकत्र यायला हवं हे जाणून ताहीरने भावी पत्नीच्या वडिलांशी बोलणी केली. त्यांना लग्न मान्य होतं परंतु मुलीने दक्षिण आफ्रिकेतच राहावं अशी त्यांची इच्छा होती. प्रेमाची ताकद किती मजबूत आहे हे ताहीरने सिद्ध केलं. जगण्यासाठी मायभूमी सोडून इंग्लंड गाठलं होतं. आता प्रेमासाठी कर्मभूमी झालेलं इंग्लंड सोडलं.

२००६ मध्ये तिच्यासाठी तो दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. नवीन देश, नवीन माणसं. स्टेडियमसमोरच्या एका खोलीत तो राहत होता. यथावकाश लग्न झालं. ताहीरची फिरकी किती किमयागार ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेतील जाणकार मंडळींना आला. तो स्थानिक क्रिकेट खेळू लागला.

पाच वर्षांत ताहीरने एका सर्वस्वी अनोळखी देशात स्वत:ला सिद्ध केलं. राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं अगदीच अवघड, परंतु ताहीरच्या कौशल्यांवर दक्षिण आफ्रिकेने विश्वास ठेवला. भारतात २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी ताहीरची संघात निवड केली. तो दिवस होता २४ फेब्रुवारी. ताहीरच्या माथी देशाकडून खेळायचा टिळा लागला.

याआधी तो दोन देशात अनेक वर्ष खेळला परंतु दक्षिण आफ्रिकेने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. पहिल्याच मॅचमध्ये ताहीरने चार विकेट्स घेतल्या. तगड्या प्रदर्शनाच्या बळावर ताहीर दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० संघाचा अविभाज्य भाग झाला. पुढच्या आठ वर्षांत दक्षिण आफ्रिकेसाठी खेळत असतानाच ताहीर जगभरातल्या ट्वेन्टी-२० लीग खेळू लागला. ट्वेन्टी-२० म्हणजे बॉलर्सची कत्तल परंतु ताहीर ४ ओव्हरमध्ये आपली कमाल दाखवून देतो. त्याची गुगली भल्याभल्यांची भंबेरी उडवते.

मोठ्या प्राण्याने शांतपणे विचार करून, सापळा रचून शिकार करावी त्या प्राविण्यासह ताहीर बॅट्समनला गुंडाळतो. छोटी मैदानं, मोठ्या आकाराच्या बॅट्स, सपाट पिचेस यामुळे दिवसेंदिवस बॉलर असणं म्हणजे गुन्हाच झाला आहे. परंतु ताहीर या आव्हानांना पुरुन उरतो. बॉलिंग करण्यासाठी त्याचे हात शिवशिवत असतात. विकेट मिळाल्यानंतर त्याला होणारा आनंदाचं वर्णन शब्दांपेक्षा पाहण्यात आहे. अनोख्या विकेट सेलिब्रेशनवरून सोशल मीडियात असंख्य मीम्स व्हायरल झालेत.

ताहीरच्या निमित्ताने पत्नी आणि मुलं स्टेडियममध्ये पाहायला मिळतात. एरव्ही ते सगळे आफ्रिकेत असतात. ताहीर जगभर खेळतो. तो खेळलाय अशा संघांची संख्या आहे- ३५. त्याचं वय आहे ४०. परंतु खेळण्याचा उत्साह आणि विकेट घेण्याची उर्मी जराही कमी झालेली नाही. त्याचा फिटनेस युवा खेळाडूंच्या बरोबरीचा आहे. जगभरातल्या अनेक संघांमध्ये त्याचे मित्र आहेत.

आयपीएल स्पर्धेत ताहीर दिल्ली, पुणे आणि आता चेन्नई संघांकडून खेळतो आहे. आयुष्यात खूप कष्ट उपसल्याने मदत करणाऱ्या, आधार देणाऱ्या प्रत्येकाबद्दल ताहीरच्या मनात कृतज्ञता आहे. खेळत असला तरी अनेक स्पिनर्सना तो आपली कला शिकवत असतो.

भविष्यात ताहीरच्या मुशीत घडलेली स्पिनर्स बॅट्समनच्या नाकी नऊ आणू शकतात. ताहीर अस्खलित हिंदी बोलतो. पंजाबीही उत्तम येतं त्याला. छोले त्याला प्रचंड आवडतात. भारतात मिळणाऱ्या प्रेमाने भारावून जायला होतं असं ताहीर सांगतो.

आजच्या घडीला ताहीरच्या नावावर वनडेत ९९ मॅचमध्ये १४६ विकेट्स आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ७८४ तर ट्वेन्टी-२० लीगमध्ये ३०३ विकेट्स आहेत. ताहीरचा हा तिसरा आणि शेवटचा वर्ल्डकप आहे. या वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार असल्याचं ताहीरने आधीच जाहीर केलंय.

दक्षिण आफ्रिकेला चोकर्स टॅग बाजूला सारून पहिलावहिला वर्ल्डकप जिंकायचा आहे. अमाप उत्साह आणि युवा ऊर्जेसह खेळणारा ताहीर आफ्रिकेचं स्वप्न पूर्ण करणार का? हे दीड महिन्यात स्पष्ट होईल. क्रिकेटइतकंच यशस्वी देशांतर करणारा अवलिया म्हणून ताहीर लक्षात राहील.

इम्रान ताहीरने प्रतिनिधित्व केलेले संघ

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)