वर्ल्ड कप 2019: दक्षिण आफ्रिका संघाने या करारामुळे आतापर्यंत 43 क्रिकेटर गमावले

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

न्याय हक्कांसाठी तयार झालेला एक तांत्रिक नियम एका राष्ट्रीय क्रिकेट संघाचं नुकसान करू शकतो? त्या नियमाचं नाव कोलपॅक असेल आणि टीम दक्षिण आफ्रिकेची असेल तर उत्तर होकारार्थी आहे.

गेल्या पंधरा वर्षांत आफ्रिकेने चाळीसहून अधिक प्लेयर्स कोलपॅकच्या निमित्ताने गमावले. कोलपॅकमुळे होणाऱ्या प्रतिभागळतीची वारंवारता तीव्र झाली आहे. आठव्या वर्ल्डकपवारीत दक्षिण आफ्रिकेला चोकर्स टॅग आणि कोलपॅकने घातलेला घाव परतावत पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी प्रयत्न करायचे आहेत.

कोलपॅक काय आहे?

युरोपियन युनियनचा भाग असलेल्या देशातील नागरिक या युनियनमधल्या देशांमध्ये परदेशी न ठरता काम करू शकतात. म्हणजेच जर्मनीचा एखादा खेळाडू फ्रान्समध्ये कोलपॅक करार स्वीकारून स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतो.

पण खरी मेख वेगळीच आहे. युरोपियन युनियन असोसिएशन अग्रीमेंटचा भाग असणाऱ्या इतर देशांनाही हा करार लागू होतो. म्हणजे युरोपाच्या बाहेर असलेल्या, पण युनियनच्या कराराचा भाग असणाऱ्या देशातल्या खेळाडूंना या कोलपॅक कराराचा फायदा करून घेता येतो. उदाहरणार्थ दक्षिण अफ्रिका, झिबाब्वे आणि कॅरेबियन बेटांचा समूह.

कोलपॅक नाव कसं पडलं?

मारोस कोलपॅक हा स्लोव्हाकियाचा हँडबॉलपटू. पण तो जर्मनीतल्या एका क्लबरोबर खेळत होता. पण परदेशी खेळाडू म्हणून त्याला त्याचं कंत्राट गमवावं लागलं. युरोपिय युनियनच्या कायद्याप्रमाणे त्यानं क्लबच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं.

त्यात त्यानं म्हटलं, "मी जर्मनीत राहातो आणि अशा देशाचा नागरिक आहे जो युरोपियन युनियन असोसिएशन अग्रीमेंटचा भाग आहे. अशावेळी जर्मन हँडबॉल लीगमध्ये माझा बिगर युरोपियन युनियन खेळाडू म्हणून विचार होऊ नये."

कोलपॅक ज्या क्लबचा सदस्य होता तिथे दोन बिगर युरोपियन युनियन सदस्य देशांचे खेळाडू होते. त्यामुळे कोलपॅकचं कंत्राट रद्द करण्यात आलं होतं. युरोपियन युनियन कोर्टाने 2003 मध्ये कोलपॅकच्या बाजूने निर्णय दिला.

तेव्हापासून युरोपियन युनियन आणि त्याच्याशी सलग्न देशातल्या खेळाडूंना सदस्य देशांदरम्यान करार करून स्थानिक खेळाडू म्हणून खेळण्याची मुभा मिळाली.

कोलपॅक आणि क्रिकेटचा संबंध कसा?

युरोपियन युनियनशी संलग्न असलेल्या देशांचे खेळाडू अन्य सदस्य देशांमध्ये परदेशी खेळाडू न ठरता खेळू शकतात. सोप्या शब्दांमध्ये युरोपियन युनियनशी संलग्न देशांचे खेळाडू इंग्लंडमधील स्थानिक म्हणजेच काऊंटी क्रिकेटमध्ये स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतात. जरी ते दुसऱ्या देशाचे असले तरी त्यांना विदेशी खेळाडू म्हणून गणलं जात नाही. प्रत्येक काऊंटी संघावर विदेशी खेळाडू खेळवण्यावर काही निर्बंध आहेत. कोलपॅक नियमामुळे विदेशी खेळाडू प्रत्यक्षात विदेशी ठरत नसल्याने, नियमांच्या चौकटीत राहून काऊंटी संघांना फायदा होतो.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू कोलपॅकसाठी कसे पात्र ठरतात?

दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियन हे कोटोनोयू करारान्वये एकमेकांशी संलग्न आहेत. या करारात झिम्बाब्वे तसंच अनेक कॅरेबियन देशही सहभागी आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू कोलपॅक करार स्वीकारू शकतात का?

कोलपॅक करारासाठी पात्र ठरण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना काही अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे. कोलपॅकसाठी खेळाडूकडे इंग्लंडमध्ये काम करण्यासाठीचं चार वर्षांचं वैध वर्क परमिट असायला हवं. किंवा त्या खेळाडूने विशिष्ट आंतरराष्ट्रीय सामने खेळलेलं असणं अनिवार्य आहे.

कोलपॅकद्वारे करारबद्ध झालेला खेळाडू मूळ देशासाठी खेळू शकतो का?

नाही. कोलपॅक कराराअंतर्गत इंग्लंडमधील काऊंटी संघासाठी खेळण्यासाठी त्या विशिष्ट खेळाडूला राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करता येत नाही. कोलपॅक करार संपुष्टात आल्यानंतर तो खेळाडू पुन्हा राष्ट्रीय संघासाठी खेळू शकतो.

एखादा खेळाडू इंग्लंडमध्ये तसंच त्याच्या मूळ देशात स्थानिक क्रिकेट खेळू शकतो का?

हो. मात्र तो स्वत:च्या देशात इंग्लंडमध्ये ऑफ सीझन असतानाच खेळू शकतो. कोलपॅक करार स्वीकारलेल्या खेळाडूसाठी इंग्लिश काऊंटी संघ हे प्रथम प्राधान्य होतं.

कोलपॅक करार संपुष्टात आल्यानंतर खेळाडू पुन्हा राष्ट्रीय संघासाठी खेळू शकतो का?

इंग्लिश काऊंटी संघाबरोबरचं कंत्राट संपल्यानंतर खेळाडू त्याच्या राष्ट्रीय संघात परतू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॅक रुडॉल्फने 2007 मध्ये यॉर्कशायरसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. 2006 मध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं होतं. रुडॉल्फचा यॉर्कशायरबरोबरचा कोलपॅक करार 2010 मध्ये संपला. पुढच्याच वर्षी रुडॉल्फने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं.

कोलपॅक करार स्वीकारणारा खेळाडू इंग्लंडसाठी खेळू शकतो का?

कोलपॅक करार स्वीकारणाऱ्या खेळाडूने इंग्लंड काऊंटी संघाचं सात वर्ष प्रतिनिधित्व केल्यानंतरच तसंच नागरिकत्व मिळवल्यानंतर त्याचा इंग्लंड राष्ट्रीय संघासाठी विचार होऊ शकतो. आधीच्या नियमाप्रमाणे चार वर्षं काऊंटी संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर खेळाडूचा इंग्लंड संघ निवडीत विचार होत असे मात्र आता ही अट तीन वर्षं करण्यात आली आहे.

कोलपॅक खेळाडूंसाठी का महत्त्वाचं?

अर्थातच पैशासाठी. आर्थिक स्थैर्य कुणालाही हवंहवसं. इंग्लिश काऊंटी क्रिकेटच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी कमी मानधन मिळतं. दक्षिण आफ्रिकेचं चलन असलेल्या रँडचं मूल्यांकन कमी होत चालल्याने दक्षिण आफ्रिकेत मिळणाऱ्या मानधनाची जागतिक स्तरावरची किंमत कमी होत चालली आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी आणि मानधन दोन्ही नियमितपणे मिळत राहतं.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू कोलपॅकचा सर्वाधिक उपयोग का करून घेतात?

दक्षिण आफ्रिकेत राष्ट्रीय संघासाठीही कोटा सिस्टम लागू आहे. 'क्रिकेट साऊथ आफ्रिके'च्या नियमानुसार अंतिम अकरामध्ये पाच कृष्णवर्णीय खेळाडूंचा समावेश असणं आवश्यक आहे. 2016 मध्ये यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने ट्रान्सफॉर्मेनशल टार्गेट अशी योजना आखली. कृष्णवर्णीय खेळाडूंसाठी असा कोटा असल्याने इतर खेळाडूंना मिळणाऱ्या संधी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली.

काऊंटी संघांना कोलपॅक फायदेशीर कसं?

विदेशी खेळाडू आणि त्यांना खेळवण्यावर असलेली मर्यादा न ओलांडता काऊंटी संघांना अन्य देशातल्या खेळाडूंना खेळवता येतं. साधारणत: प्रत्येक काऊंटी संघाला अंतिम अकरामध्ये एका विदेशी खेळाडूला समाविष्ट करण्याची मुभा असते. थोडक्यात आपल्या संदर्भात सांगायचं तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला ख्रिस गेल आणि एबी डीव्हिलियर्स यांना विदेशी खेळाडू म्हणून टॅग न करता खेळवू शकतो.

कोलपॅकने होतंय आफ्रिकेचं क्रिकेटिंग ब्रेनड्रेन

दक्षिण आफ्रिकेसारख्या संघासाठी कोलपॅक म्हणजे ब्रेनडेन. त्यांचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दिशेने जात असल्याने त्यांचं अपरिमित नुकसान आहे. कोलपॅकच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेच्या चाळीसहून अधिक खेळाडूंनी देश सोडला आणि इंग्लंड गाठलं.

सोप्या शब्दांत दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या चार टीम्स गमावल्या. अगली अलीकडे कोलपॅक करार स्वीकारणारा दक्षिण आफ्रिकेचा ड्युऑन ऑलिव्हर हे खळबळजनक उदाहरण आहे.

यंदाच्या वर्षीच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑलिव्हरने दिमाखदार कामगिरी केली. त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. डेल स्टेनची परंपरा चालवणारा वारसदार मिळाला असं त्याचं कौतुक झालं. मात्र पुढच्याच आठवड्यात ऑलिव्हरने कोलपॅक स्वीकारत असल्याचं जाहीर केलं आणि धक्का बसला.

कोलपॅक कराराविना दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं चित्र सर्वस्वी वेगळं दिसलं असतं. युट्यूबवरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात नुकताच एबी डी'व्हिलयर्सने महत्त्वपूर्ण खुलासा केला.

फॅफ डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. कारकीर्दीच्या एका वळणावर डू प्लेसिस कोलपॅक करार स्वीकारण्याच्या बेतात होता. डी'व्हिलियर्सने त्याचं मन वळवलं आणि डू प्लेसिसने आफ्रिकेसाठीच खेळण्याचा निर्णय घेतला.

आज जगातल्या यशस्वी कर्णधारांमध्ये डू प्लेसिसचं नाव घेतलं जातं. कोलपॅकने आफ्रिकन क्रिकेटला खोलवर घाव बसला आहे. कोलपॅक स्वीकारलेले चाळीस खेळाडू आजही इंग्लंडमध्ये खेळत आहेत. वर्ल्डकप इंग्लंडमध्येच आहे. गमावलेल्या चाळीस दोस्तांविनाच चोकर्स टॅग पुसण्याचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर आहे.

ब्रेक्झिटचा कोलपॅकवर परिणाम होणार का?

इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडूंसाठी कोलपॅक करार अस्तित्वात राहणार नाहीत अशी शक्यता आहे. म्हणूनच ब्रेक्झिट अमलात येण्यापूर्वी कोलपॅक लागू होणाऱ्या देशातील खेळाडू लवकरात लवकर करारबद्ध होत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)