You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टिम पेन: अॅशेसचा गौरव मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा अॅक्सिडेंटल कॅप्टन
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह भाषेत मेसेज पाठवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
महिला सहकारी, कुटुंबीय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि चाहते यांची पेनने माफी मागितली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी कमिटीमार्फत याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. 2017 मध्ये पेनने क्रिकेट टास्मानियाच्या महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह भाषेत मेसेज पाठवले होते.
सँडपेपर गेटप्रकरणानंतर टीम पेनकडे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाला अॅशेस मिळवून देण्याची किमयाही पेनच्या नेतृत्वातील संघाने केली. त्याच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पारंपरिक अॅशेस मालिका म्हणजे कडव्या द्वंद्व पर्व. टीम पेनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने तब्बल 18 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका आपल्याकडेच राखण्याचा पराक्रम केला.
त्याच्या नावातच पेन आहे. पेन म्हणजे लेखणीरूपी अस्त्र नव्हे. पेन म्हणजे इंग्रजीतली वेदना. त्याचं आयुष्य रोलरकोस्टर राईडसारखं. गरागर वरखाली होतंय. कालचक्र फिरत राहतं. दिवस बदलतात. 17 नोव्हेंबर 2017 हा दिवस तो कधीच विसरणार नाही. फडताळातून जुनंपुराणं पितळी भांडं काढावं तसं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सिलेक्टर्सनी प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेसाठी संघ जाहीर केला. घाऊक बदलांमध्ये एक नाव होतं टिम पेन.
ही बातमी ऐकून त्यालाही धक्का बसला. राष्ट्रीय संघात पुनरागमन म्हटल्यावर चर्चा तर होतेच. पत्रकार टिमच्या घरी पोहोचले. त्याची प्रतिक्रिया खास होती- "माझी बॅगी ग्रीन (ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना टेस्ट डेब्यूवेळी गडद हिरव्या रंगाची देण्यात येणारी टोपी) आईच्या घरी आहे. मला तिकडे जाऊन शोध घ्यावा लागेल. कपाटात कुठेतरी हरवली असेल. तिच्यावरची धूळ झटकायला हवी. बाकी किट पॅक करताना बॅगी ग्रीन नीट जपून न्यायला हवी. इतक्या वर्षांनी माझ्या नावाचा विचार झाला. मला दिलेली जबाबदारी निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन."
नियमित कीपर्सना डावलून पेनला घेतल्याने टीकेला उधाण आलं. माजी खेळाडूंनी सिलेक्टर्सवर अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्यांचंही काही फार चुकत नव्हतं. क्रिकेटच्या परिभाषेत 'स्कीम ऑफ थिंग्स' नावाचा प्रकार असतो. यामध्ये मोडणारे प्लेयर्स टीममध्ये येतात. टिम पेन या 'स्कीम ऑफ थिंग्स'पासून शेकडो किलोमीटर दूर होता. कारण टिम पेन शेवटची टेस्ट सात वर्षांपूर्वी खेळला होता.
2009-10 या दोन वर्षांमध्ये टिम पेननं टेस्ट आणि वनडेत पदार्पण केलं. अॅडम गिलख्रिस्ट नावाचं वादळ शमून जेमतेम वर्ष होत होतं. गिलख्रिस्टचा वारसदार ब्रॅड हॅडीन होता, त्याचं काम सुरूही झालं होतं. मात्र इंग्रजीत blonde या विशेषणाला साजेशा टिम पेननं आपल्या खेळाने लक्ष वेधून घेतलं. भुरभुरणारे ब्राऊन केस, निळेशार डोळे, काटक शरीरयष्टी, उत्तम कीपिंग आणि त्याला जोड म्हणजे चांगली बॅटिंग. अजून काय हवंय!
तेव्हाची ऑस्ट्रेलियन टिम म्हणजे ते फक्त जिंकत असत. जिंकण्याचं अति व्यसन असणारी टीम होती. टिम पेन स्थिरावत होता. पण लवकरच त्याच्या आयुष्यात तो दिवस आला. 21 नोव्हेंबर 2010.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनच्या ऑल स्टार्स मैत्रिपूर्ण ट्वेंटी20 सामन्यात टिमच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. अंगठ्याच्या बाजूचं बोट. बोट सांधण्यासाठी प्लेट टाकण्यात आली. बोट पुन्हा तुटलं, प्लेट विस्कटली. बोट नीट राहावं म्हणून पेनच्या शरीरातून दोन हाडं काढून तिथे रोपण करण्यात आली. त्या बोटावर एकूण पाच शस्त्रक्रिया झाल्या.
टूथब्रश पकडणंही अवघड झालं होतं. आता हा क्रिकेट खेळणार नाही अशी चिन्हं होती. पण ऑस्ट्रेलियन वाण सहजासहजी हार मानत नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीचं प्रॉडक्ट असलेला टिम पेन वर्षभरात खेळू लागला. पण तेवढ्या वेळात काळ पुढे सरकलेला. त्याची जागा मॅथ्यू वेडने घेतली होती. हॅडीन होताच. पेन ऑस्ट्रेलियातल्या टास्मानिया संघासाठी खेळतो. या संघाचे खूपच कमी खेळाडू राष्ट्रीय संघात खेळतात. लो प्रोफाइल संघ आहे. वय वाढू लागलं, मनाजोगता खेळही होईना.
विकेटकीपिंगच्या दृष्टीने हात महत्त्वाचे. बोट बरं झालं होतं पण त्रास व्हायचाच. टिम पेन हे नाव हळूहळू कधी लुप्त झालं कळलंही नाही. तो सध्या काय करतो? असं दर्दी क्रिकेटरसिक विचारायचे. पण त्याचं नामोनिशाण नव्हतं. बॅटिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टीमने कीपिंग सोडलं. तो आता टास्मानियाचाही फर्स्ट चॉइस कीपर नव्हता.
एक काळ होता जेव्हा तो ऑस्ट्रेलियाचा सगळ्या फॉरमॅटमधला विकेट कीपर असता. पण नशीब आडवं आलं. चार टेस्ट आणि थोड्या वनडे नावावर असलेला टिमच्या मनात निवृत्तीचे विचार घोळू लागले.
बॉल बनवणाऱ्या कुकाबरा कंपनीने सेल्स मॅनेजर म्हणून ऑफर दिली होती. टास्मानियाहून मेलबर्नला जावं हे त्याने जवळपास पक्कं केलं. पण तितक्यात टास्मानियाने त्याचं कॉन्ट्रॅक्ट दोन वर्षांनी वाढवलं. टिम कीपर नव्हता पण खेळत होता. कामगिरी बेतास बेत होती. आणि तेव्हाच त्याच्या कानावर टेस्ट टीममध्ये निवडल्याची बातमी आली. सात वर्षांनी टिमने कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका जिंकली. जणू मधली वर्षं नव्हतीच अशा सहजतेने टिम खेळत होता. बॅटिंग ओके होती पण कीपिंग उत्तम होतं. करिअरची दुसरी इनिंग फळू लागली. टिम संघात पक्का झाला.
नाचक्की आणि संधी
दक्षिण आफ्रिकेचा खडतर दौरा सुरू झाला. टिम आणि एकूणच ऑस्ट्रेलियाच्या नशिबात तो काळा दिवस आला. जगभर धावांच्या राशी ओतणारे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी आढळले. पिवळ्या टेपने बॉल कुरतडणाऱ्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टचा फोटो जगभर गेला. ऑस्ट्रेलियाची नाचक्की झाली.
ICCने फक्त एका मॅचची बंदी घातली. पण ऑस्ट्रेलियात याचे पडसाद संसदेत उमटले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नरवर वर्षभराची बंदी घातली. ऑस्ट्रेलियाचा कणाच निखळला. ऑस्ट्रेलियाच्या टीमची वाताहत सुरू झाली. नेतृत्वाची धुरा टिम पेनकडे देण्यात आली. टास्मानियात कोपऱ्यात हरवलेल्या टिमकडे राष्ट्रीय संघाचं नेतृत्व आलं.
बॉल टेपरिंग प्रकरणात शून्य सहभाग, चांगली प्रतिमा, नेतृत्वगुण, संघात पक्का असेल याची खात्री आणि फिटनेस- या बळावर टिमला कॅप्टन करण्यात आलं. पण संघ आतून पोखरून निघाला होता. दोन आधारवड बाहेर झालेले, नवा बॅनक्रॉफ्ट हाकलून दिलेलं, फास्ट बॉलरच्या इंज्युरीची समस्या, जगभर मलीन झालेली प्रतिमा- अशा सगळ्या गोंधळात टिमने कॅप्टन्सी हातात घेतली.
डॅरेन लेहमनऐवजी जस्टीन लँगर कोच झाले. लँगर-पेन जोडीने संघात सभ्यता आणण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने दुबईत पालापाचोळा केला. नव्या दमाच्या भारतीय संघाचं आव्हान टिम पेन आणि ऑस्ट्रेलियासाठी जडच ठरणार होतं. आणि झालंही तसंच. 72 वर्षं भारतीय संघाला जे जमलं नाही ते विराट सेनेने करून दाखवलं. ऑस्ट्रेलियाचं नाक जमिनीला टेकलं.
बॅटिंग-बॉलिंग आणि फील्डिंग सगळ्या आघाड्यांवर कांगारूंनी लोळण घेतली. 31 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर मायदेशात फॉलोऑनची नामुष्की ओढवली. बेंच स्ट्रेंथ नसल्याने आहे त्या खेळाडूंना काढून घ्यावं कुणाला असा प्रश्न आहे.
टिमकडे बुडणाऱ्या जहाजाचं सुकाणू होतं. त्यातच क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडू यांच्यात मानधनावरून धुसफूस सुरूच आहे.
सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले होते. अशावेळी प्रेस कॉन्फरन्सला सोम्यागोम्याला पाठवण्यात येतं. पण टिम पेन स्वत: आला. त्यावेळी घडलेला किस्सा आवर्जून नोंद घ्यावी असा.
बोचऱ्या प्रश्नांचा सामना करत असताना टिमसमोरच्या बूम माइक्सजवळचा मोबाईल वाजू लागला. त्याने घेतला. कोण बोलतंय ते सांगितलं. मार्टिन नावाच्या पत्रकारासाठी फोन होता. टिम म्हणाला, "मार्टिन, एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आहे. तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का? पलीकडच्या व्यक्तीने टिमला मेल चेक करायला सांगितलं. टिम म्हणाला मी सांगतो. चीअर्स." कोण वागतं असं!
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातल्या काळ्या पर्वात टिम पेनकडे सत्ता देण्यात आली. स्मिथ, वॉर्नर परतल्यानंतर टिम पेनचं काय होणार अशी स्थिती होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पेनच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला.
प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेसाठी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी कसून मेहनत घेत व्यूहरचना आखली. टीम पेनने कागदावरच्या योजनांची मैदानावर अचूक अंमलबजावणी करत ऑस्ट्रेलियाला अॅशेस राखण्यात मोलाचा वाटा उचलला.
या विजयात बॅट्समन टीम पेनचा वाटा मर्यादित होता. मात्र कॅप्टन्सी आणि विकेटकीपिंग अशी दुहेरी कसरत सांभाळत पेनने संघाच्या प्रदर्शनात निर्णायक भूमिका बजावली. ओल्ड ट्रॅफर्ड टेस्टमध्ये टीम पेनने बॉलिंगमध्ये केलेले बदल महत्त्वपूर्ण ठरले.
34 वर्षीय टिम करिअरच्या संध्याकाळच्या सत्रात आहे. विकेटकीपर मॅथ्यू वेड संघात बॅट्समन म्हणून खेळतो आहे. वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात अॅलेक्स कॅरेने स्थान पक्कं केलं आहे. टीमच्या जागेसाठी या दोघांव्यतिरिक्तही अनेकजण शर्यतीत आहेत. त्यामुळे पुढच्या अॅशेस मालिकेपर्यंत टीम पेन संघात असेल का? टीमच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा असेल का? असे अनेक प्रश्न आहेत.
बॉल टँपरिंग प्रकरणाने नामुष्की ओढवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला संजीवनी मिळवून देण्याचं काम टीम पेनने इमानेइतबारे केलं. प्रतिष्ठेचा अॅशेस करंडक मिळवून देत पेनने शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भरकटलेल्या वैयक्तिक कारकीर्दला योग्य दिशा देताना टीम पेनने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची नांदी घडवून आणली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)