स्टीव्हन स्मिथ : एकेकाळी जाहीरपणे ढसाढसा रडणारा खेळाडू असा झाला 100 कसोटींचा मनसबदार

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

लेगस्पिनर म्हणून कसोटी कारकीर्दीची सुरुवात केलेला स्टीव्हन स्मिथ आज शंभरावी कसोटी खेळतो आहे. आधुनिक क्रिकेटच्या शिलेदारांमध्ये स्मिथचा समावेश होतो. एकाच कालखंडात आपापल्या संघासाठी दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या फॅब फोर या चौकडीत जो रुट, विराट कोहली, केन विल्यमसन यांच्याबरोबरीने स्मिथचा समावेश होतो.

विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळायला लागल्यापासून स्मिथ धावांच्या राशी ओततो आहे. कसोटी प्रकारातील स्मिथची सरासरी 50च्या घरात आहे. विदेशात अवघड खेळपट्ट्यांवर धावा करत राहण्याची स्मिथची हातोटी विलक्षण आहे.

100 कसोटी खेळणारा स्मिथ एकूण 75वा तर ऑस्ट्रेलियाचा 16वा खेळाडू ठरला आहे. पण स्मिथची कारकीर्द खाचखळग्यांनी भरलेली होती. जाणून घेऊया स्मिथचा इथपर्यंतचा प्रवास

एक चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथने घेतला. एका चुकीसाठी त्याने गमावल्या 9 टेस्ट, 21 वनडे, 16 ट्वेन्टी-20, अख्खा IPL 2018 हंगाम आणि ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व. काय झालं होतं नेमकं?

तो दिवस होता २९ मार्च २०१८. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथची सिडनी एअरपोर्टवर पत्रकार परिषद झाली. त्याचं हे सार.

कारकीर्दीत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीने चुका करूच नयेत असा अलिखित दंडक आहे. त्या व्यक्तीने सदैव आदर्श, अनुकरणीय वागावं असंही अपेक्षित असतं. त्यांनी नेहमी फील गुड बोलावं, रहावं, वागावं असं गृहित धरलं जातं. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याला अपवाद ठरला. त्याच्या हातून एक चूक घडली.

'तुम्ही सगळे इथे आलात त्याकरता तुमचे आभार. (दीर्घ श्वास सोडून पुन्हा बोलायला सुरुवात). ऑस्ट्रेलिया संघातील माझे सहकारी, जगभरातील चाहते आणि याप्रकरणाने नाराज आणि चिडलेले ऑस्ट्रेलियन बांधव- मला माफ करा. केपटाऊन कसोटीत जे घडलं त्यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून याप्रकरणाची सगळी जबाबदारी मी घेतो. माझ्या हातून पातक घडलं आहे. या चुकीचे परिणाम किती खोलवर आहेत याची मला जाणीव झाली आहे. माझ्या नेतृत्वात ही आगळीक घडली आहे. माझ्या नेतृत्वात हा प्रकार घडला. (खोल उसासा टाकतो) माझ्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी आणि याप्रकरणाने झालेलं अपरिमित नुकसान भरून काढण्यासाठी जे काही करता येईल ते मी सर्वतोपरी करेन' (आवंढा दाटतो, अश्रू डोळ्यातून वाहू लागतात. वडील खांद्यावर हात ठेऊन धीर देतात.)

'याप्रकरणाने असं वागणाऱ्यांना धडा मिळेल. माझ्याच उदाहरणाने कसं वागू नये हे लोकांना कळेल. या चुकीचा मला आयुष्यभर पश्चाताप होत राहील. मी पूर्णत: खचून गेलो आहे. मी पुन्हा लोकांचा विश्वास आणि दया कमावू शकेन अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करायला मिळणं हा गौरवास्पद क्षण आहे. क्रिकेट हा जगातला सर्वोत्कृष्ट खेळ आहे. तेच माझं आयुष्य होतं. क्रिकेट पुन्हा माझं आयुष्य असेल. (रडवेल्या चेहऱ्याने) मला माफ करा. मी उन्मळून पडलो आहे'.

'चांगली माणसं चुका करतात. मी घोडचूक केली आहे. जे घडायला नको ते घडू देण्याची चूक माझ्या हातून घडली आहे. माझा सद्सदविवेक बाजूला पडला आणि ही गंभीर चूक घडली. या गैरवर्तनासाठी मी सगळ्यांचा अपराधी आहे. जमल्यास मला माफ करा. हे असं कधी क्रिकेटच्या मैदानावर घडलं नाही. असं पुन्हा कधीही घडणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. मी याचा दोष कुणालाही देणार नाही. मी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होतो. जे घडलं ते मी रोखू शकत होतो'.

'कृपया मला माफ करा. मला क्रिकेट प्रचंड आवडतं. लहान मुलांनी क्रिकेट खेळावं. मोठं व्हावं. जेव्हा तुम्ही चुकीचं वागता तेव्हा त्याचा त्रास कोणाला होणार आहे याचा एकदा विचार करा. माझ्या वागण्याने माझ्या आईवडिलांना जो त्रास झाला आहे ते वेदनादायी आहे (ओक्साबोक्शी रडू लागतो) (त्याचे बाबा धीर देतात) मी त्यांना, सगळ्यांना जे दु:ख दिलं आहे त्यासाठी मला माफ करा. मी सपशेल चुकलो'.

जगातल्या ऑस्ट्रेलिया नामक बलाढ्य संघाची सूत्रं हाती असताना आणि जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणून शिक्कामोर्तब झालेलं असताना त्याच्या हातून चूक घडली. खेळभावनेला बट्टा लागेल अशा चुकीच्या वर्तनात तो अडकला. ते वर्तन त्याच्या हातून घडलं नाही परंतु त्या गैरकृत्यात त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रयत्न स्पष्ट झाला. बॅनक्रॉफ्ट सँडपेपरने (पिवळ्या रंगाची वस्तू) बॉल घासत असल्याचं रिप्लेत स्पष्ट दिसलं. चेंडू रिव्हर्स स्विंग व्हावा यासाठी हा घाट घालण्यात आला.

मॅचरेफरींनी स्मिथवर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई केली. याव्यतिरिक्त स्मिथचे संपूर्ण सामन्याचे मानधन दंड म्हणून कापून घेण्यात आलं. बँक्रॉफ्टच्या मानधनाच्या 75 टक्के रक्कम कापून घेण्यात आली.

मात्र मायदेशी ऑस्ट्रेलियात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ऑस्ट्रेलियाच्या जनतेने, पंतप्रधान-सरकारने आणि मुख्य म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या कृत्याला शिक्षा केली नाही तर भविष्यात असे प्रकार घडतच राहतील हे जाणून त्यांनी वॉर्नर आणि स्मिथवर वर्षभराची तर कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली.

आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत तेव्हा स्मिथ अव्वलस्थानी होता. जगात सगळीकडे धावांची टांकसाळ उघडणारा माणूस अशी त्याची ओळख होती. पेस किंवा स्पिन- दोन्ही सफाईदारपणे खेळून काढत चिवटपणे धावा करणारा अशी प्रतिमा मोठ्या मेहनतीने त्याने निर्माण केली होती.

मार्क टेलर, स्टीव वॉ, रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क यांच्याकडून चालत आलेला कॅप्टन्सीचा वारसा स्मिथकडे आला होता. आपल्या खेळाद्वारे सहकाऱ्यांना प्रेरणादायी ठरेल असा त्याचा खेळ होता. मात्र जिंकण्यासाठी वाट्टेल ते या विचारातून एक कट शिजला. स्मिथने कॅप्टन म्हणून ते थांबवायला हवं होतं. त्याने होऊ दिलं आणि त्याच्याच झळाळत्या करिअरला करकचून ब्रेक लागला.

रुढार्थाने स्मिथने काय गमावलं- कर्णधारपद गेलं, संघातलं स्थान गेलं. वर्षभराच्या काळात ९ टेस्ट, २१ वनडे, १६ ट्वेन्टी-२०, अख्खं आयपीएल २०१८. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं कंत्राट गमावलं. या सगळ्यापेक्षाही मानसिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या तो पार पिछाडीवर गेला. आधुनिक क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या स्मिथची चीटर म्हणून हुर्यो उडवली जाऊ लागली. इंग्लंडमध्ये विशेषत: वर्ल्ड कपदरम्यान स्मिथला चाहत्यांचा रोषाला सामोरं जावं लागलं.

टीमच्या, देशाच्या नावाला कलंक लावणारा हाच तो अशी अवस्था झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'फॅब फोर' अशी संकल्पना आहे. समकालीन आणि सातत्याने धावा करणाऱ्या बॅट्समनची चौकडी असं त्याला म्हणता येईल. यामध्ये स्टीव्हन स्मिथ, विराट कोहली, जो रूट आणि केन विल्यमसनचं नाव घेतलं जातं. फॅब फोरमधले बाकी तिघं पुढे निघून गेले, स्मिथ काळोख्या गर्तेत हरवून गेला.

आईबाबा, बायको, मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळे स्मिथ निराश झाला नाही. कॅनडा ट्वेन्टी-20 द्वारे त्याने पुनरागमन केलं. त्यानंतर स्मिथने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

दुखापतीकरता त्याच्या कोपरावर शस्त्रक्रिया करावी लागली. यातून सावरताना आपण पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही असं वाटल्याचं स्मिथने सांगितलं. खेळाविषयीचं प्रेम कमी होईल की काय अशी भीतीही त्याच्या मनात डोकावली. मात्र तसं झालं नाही.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स संघासाठी तो खेळू लागला. म्यान केलेली बॅट पुन्हा तळपू लागली. तो कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेतही खेळला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तो खेळायला उतरला. भारतीय प्रेक्षकांनी त्याला स्वीकारलं. मात्र स्मिथला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथची इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप संघात निवड केली. स्मिथने वर्ल्ड कपच्या 10 मॅचेसमध्ये 37.90च्या सरासरीने 379 रन्स केल्या. ही कामगिरी स्मिथच्या प्रतिष्ठेला न्याय देणारी नव्हती.

वर्ल्ड कपदरम्यान इंग्लंडमधील चाहत्यांनी स्मिथची हुर्यो उडवली. सातत्याने हेटाळणी होत राहिली. भारताविरुद्धच्या मॅचदरम्यान विराट कोहलीने चाहत्यांना स्मिथला त्रास न देण्याची सूचना केली. ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न सेमीफायनलमध्ये संपुष्टात आलं.

मोठं आव्हान पुढे होतं. ते म्हणजे टेस्ट कमबॅक. पांढऱ्या कपड्यात खेळतानाच स्मिथच्या हातून चूक झाली होती. जवळपास दीड वर्षानंतर पांढऱ्या कपड्यात स्मिथला स्वत:ला सिद्ध करायचं होतं.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणारी पारंपरिक अॅशेस मालिका कडव्या झुंजार खेळासाठी ओळखली जाते. खेळाच्या बरोबरीने वाक्युद्धासाठी ही मालिका प्रसिद्ध आहे.

अखेर टेस्ट कमबॅकचा दिवस अवतरला. 1 ऑगस्ट 2019, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम. इंग्लंडच्या चाहत्यांनी स्मिथला उद्देशून शेरेबाजी केली. जिवंत खेळपट्टी आणि दर्जेदार बॉलिंग आक्रमण आणि चाहत्यांचा रोष. या तिहेरी आव्हानाला पुरून उरत स्मिथने दोन्ही डावात शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली. 144 आणि 142 या खेळींकरता स्मिथला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

पुढच्या म्हणजे दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्स इथं स्मिथने 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा बॉल स्मिथच्या कोपरावर आदळला. उपचारानंतर तो पुन्हा खेळू लागला. मात्र त्यानंतर थोड्या वेळाने आर्चरचा उसळता चेंडू स्मिथच्या मान आणि डोक्यादरम्यानच्या नाजूक भागावर जाऊन आदळला.

स्मिथ ज्यापद्धतीने कोसळला ते पाहून सगळ्यांच्या मनात धस्स झालं. काही वर्षांपूर्वी फिलीप ह्यूजबाबत जे घडलं होतं ते सगळ्यांना आठवलं. सुदैवाने स्मिथची स्थिती ठीक होती. अधिक उपचारांसाठी तो पॅव्हेलियनमध्ये परतला. थोड्या वेळानंतर खेळायलाही उतरला. मात्र त्यादिवशी संध्याकाळी स्मिथला त्रास जाणवल्याने त्याच्या जागी मार्नस लॅबुशानला बदली खेळाडू म्हणून घेण्यात आलं.

स्मिथ लीड्स कसोटी खेळू शकला नाही. ओल्ड ट्रॅफर्ड इथं सुरू झालेल्या चौथ्या कसोटीपूर्वी आयसीसीने रेटिंगची घोषणा केली. दोन शतकं आणि एका अर्धशतकाच्या बळावर स्मिथने पुन्हा एकदा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. या यशासह स्मिथच्या कारकीर्दीतील एक मोठ्ठं वर्तुळ पूर्ण झालं.

बंदीच्या शिक्षेनंतरही स्मिथची धावांची भूक जराही कमी झालेली नाही हे सिद्ध झालं. दीड वर्षाच्या या काळात स्मिथने मानसिक आरोग्यासंदर्भात काम करणाऱ्या एका उपक्रमाशी स्वत:ला जोडून घेतलं.

हातून घडलेल्या चुकांबद्दल स्मिथ शाळेतल्या मुलांशी बोलत होता. ऑस्ट्रेलियात तरुण मुलामुलींच्या आत्महत्येचं प्रमाण खूप आहे. ते कमी करण्यासाठी सेशन्स आयोजित करण्यात येत आहेत. स्मिथ त्याठिकाणी बोलत होता. हातून झालेल्या चुकांबद्दल मोकळेपणाने तो मुलांशी बोलत होता. मुलांच्या बरोबरीने स्मिथसाठी ही सेशन्स थेरपी ठरली.

'मला असंख्य हेट मेल आले. मात्र त्याचवेळी तू पुन्हा खेळायला हवंस' असेही अनेक मेल आल्याचं स्मिथ सांगतो. आता कोणताही निर्णय घेताना क्षणभर थांबून या निर्णयाचे परिणाम किती दूरगामी होऊ शकतात याचा विचार करू लागलो असं स्मिथचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)