हमास-इस्रायल संघर्ष : 'क्षेपणास्त्राने अवघ्या काही सेकंदात आमचं घर नाहीसं केलं'

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हमास आणि इस्रायल यांच्यात चाललेला हिंसक संघर्ष अकरा दिवसांनंतर थांबला. प्रचंड अशा आक्रमणामुळे आधीच विस्कळीत आणि निराशेच्या छायेत असलेल्या गाझा पट्टीला विमनस्कता आली आहे.

हा भाग बेचिराख झाल्यागत झाला आहे. खुला तुरुंग अशी गाझा पट्टीची अवस्था झाली आहे. हल्ल्यांनी नेस्तनाबूत झालेल्या ढिगाऱ्यांमध्ये आयुष्य नव्याने सुरू करण्याची धडपड सुरू आहे.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये रस्ते, शाळा, राहती घरं, पायाभूत सुविधा केंद्र उद्धस्त झाली आहेत. या सगळ्या गोष्टी नव्याने बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र गाझा पट्टीतल्या 20 लाख नागरिकांच्या मानसिक आरोग्याची काळजी वाटते. कारण गेल्या काही महिन्यात त्यांनी जे सोसलंय त्याचा आघात खोलवर झाला आहे.

पॅलेस्टाईन शरणार्थींसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या UNRWA संघटनेच्या प्रवक्त्या तमारा अलरिफई यांच्या मते गाझा पट्टीतील जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणावर ताणतणाव आहे. जॉर्डनची राजधानी असलेल्या अम्मानहून त्यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, संघर्षविरामानंतर मी गाझा पट्टीतल्या ज्यांच्याशी बोललो आहे, तो प्रत्येकजण आतून हलला आहे.

हे लक्षात घ्यायला हवं की आताची लढाई आधीच्या संघर्षापेक्षा तीव्र स्वरुपाची होती. कोरोनाचं संकटही होतंच. या लढाईपूर्वीही गाझा पट्टीने अनेक वर्षांची नाकाबंदी झेलली आहे. सहन करण्याची परिसीमा गाठलेली असतानाच्या स्थितीत या लोकांनी हा संघर्ष अनुभवला. गाझा पट्टीतील लोक प्रदीर्घ काळापासून अवघड परिस्थितीचा सामना करत आहेत.

युएनआरडब्ल्यूए ही संघटना पॅलेस्टाईन शरणार्थींच्या पुनर्वसन तसंच गाझा पट्टी भागात पुनर्निर्माणाच्या कामात व्यग्र आहे. गाझाच्या 20 लाख लोकसंख्येपैकी 14 लाख पॅलेस्टाईन शरणार्थी आहेत. 1948 मध्ये इस्रायल निर्मितीवेळी हे नागरिक विस्थापित झाले होते.

सामूहिक वेदनेचा चेहरा

ताहिर अलमदून हे 28 वर्षीय डॉक्टर गाझामध्ये काम करतात. गाझातल्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक वेदनेचं ते प्रतीक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 13 मे रोजी गाझावर झालेल्या इस्रायलच्या हवाई हल्यात डॉ. ताहिर यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आलं. रॉकेट हल्ल्यात त्यांच्या घराचा काही भाग नामशेष झाला.

बीबीसीशी बोलताना ताहिर यांनी त्यावेळी नेमकं काय झालं ते सांगितलं. 13 तारखेला संध्याकाळी नेहमीसारखाच दिवस होता. सूर्यास्तानंतरची रात्रीची वेळ होती. आम्ही घरचे सगळे म्हणजे मी, बाबा, आत्या असे ईदच्या तयारीबद्दल बोलत होतो. मात्र काही मिनिटात आमच्या घरावर रॉकेटचा हल्ला सुरू झाला. माझा हात सोडला तर बाकीचं शरीर ढिगाऱ्याखाली होतं. लोकांना मी कुठे आहे हे कळावं यासाठी फोनचा उपयोग करून ओरडलो. जेणेकरून मी कुठे अडकलो आहे हे सुटका करणाऱ्यांच्या लक्षात यावं.

ताहिर यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं मात्र त्यांचे वडील आणि आत्या यांचा जीव वाचू शकला नाही. हल्ल्यादरम्यान मी बेशुद्ध पडलो नाही, बाबा आणि आत्याला देवाचा धावा करताना मी पाहिलं. अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी गाडी आमच्या घरापर्यंच पोहोचेपर्यंत मी त्यांची प्रार्थना ऐकत होतो. मात्र काही वेळातच दोघेही शांत झाले. त्यामुळे ते मला सोडून गेलेत हे मला तात्काळ कळलं होतं.

एकाक्षणी आम्ही ईद कशी साजरी करायची यावर गप्पा मारत होतो. काही क्षणात ते दोघं हे जग सोडून गेले. मला अक्षरक्ष: मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आलं. गाझा पट्टीतल्या लोकांचं हे आयुष्य आहे. नशिबाने डॉ. ताहिर यांची आई आणि भाऊबहीण त्यावेळी घरी नव्हते. ईद साजरी करण्यासाठी वस्तू आणण्यासाठी ते बाहेर गेले होते. त्यांचं तीन मजली घर पूर्णत: नेस्तनाबूत झालं आहे.

वडील आणि आत्याच्या अंत्यसंस्काराला डॉ. ताहिर उपस्थित राहू शकले नाहीत कारण ते स्वत: आयसीयूमध्ये होते. त्यांच्या अनेक हाडांना मार बसला आहे. बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. आता त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार आहे.

ताहिर यांच्या मते शारीरिक जखमा आणि संपत्तीच्या नुकसानापेक्षा मानसिक त्रास खूप झाला. सुरुवातीच्या काही दिवसात मला वडील आणि आत्याबाबत वाईट स्वप्नं पडायची. माझ्या घरच्यांनाही हा त्रास झाला. आम्ही सगळेच भयंकर अशा तणावातून जात होतो.

युवा डॉ. ताहिर यांना आपल्या घरच्यांना या संकटातून बाहेर काढायचं आहे. मोडलेल्या हाडांबाबत विचार करायला त्यांच्याकडे फारसा वेळ नाहीये. वडिलांच्या अचानक जाण्याने माझ्यावर जबाबदारी आली आहे. मी लवकरात लवकर बरं होणं आवश्यक आहे. मात्र परिस्थिती झटपट सुधारणार नाही हेही त्यांना ठाऊक आहे.

मला पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी एक ते दीड वर्ष लागेल. माझ्या बाबांनी गाझातल्या अतिशय चांगल्या भागात तीन मजली घर बांधलं होतं. डॉ. ताहिर यांनी तिसरा मजला सजवला होता.

गाझा पट्टीत राहणं किती कठीण?

सर्वसामान्यांसाठी गाझा पट्टीत राहणं कठीण आहे. संघर्ष सुरू असो किंवा शांतता नांदत असो- हा भाग धूमसतच असतो. सामाजिक कार्यकर्त्या नोअल आकिल यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना या भागाच्या समस्यांविषयी सविस्तरपणे सांगितलं. तुम्ही माझ्याच घरी पाहा. मी, आई, सहा बहिणी, मुलं, घटस्फोटित बहिणी, अल्जेरिया आणि जॉर्डनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भावांची चिंता. सर्वसामान्य आयुष्य जगता यावं एवढीच आमची इच्छा आहे.

नोअल यांचे सहकारी तामेर अजरमी पीडित लोकांसाठी काम करतात. पॅलेस्टाईन मंडळींच्या मनावर जो आघात झाला तो केवळ अकरा दिवसांच्या संघर्षाने झालेला नाही. लोकांनी सातत्याने आघात पचवले आहेत.

गाझा पट्टीसाठी हा नाजूक संवेदनशील काळ आहे. संघर्ष थांबला आहे. मात्र अकरा दिवसात झालेले मृत्यू आणि विनाशाच्या कटू आठवणी मनात घर करून आहेत. ताहिर यांचे वडील आणि आत्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जीव गमावलेल्या 243 नागरिकांपैकी एक आहेत. हमासच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 इस्राइली नागरिकही मृत्यूमुखी पडले. गाझात दोन हजारहून अधिक इमारती पूर्णत: भुईसपाट झाल्या आहेत किंवा त्यांचा काही भाग कोसळून नष्ट झाला आहे.

हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर बीबीसी हिंदीने गाझा पट्टीतील नागरिकांशी संवाद साधला. त्या सगळ्यांच्या बोलण्याचा सूर एकच होता- युद्ध काळात सातत्याने होणारे हल्ले जीवघेणे असतातच मात्र युद्ध थांबल्यानंतरच्या अडचणी खूपच त्रासदायक असतात.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते उद्धस्त झालेली घरं पुन्हा बांधता येतात. मात्र युद्धाची झळ बसलेल्या पीडितांना मानसिक आघातातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. सईद अल मंसूर गाझा परिसरात आयटी क्षेत्रात काम करतात. लढाईपूर्व काळात ते एका छोट्या घराचे मालक होते. 16 मे रोजी झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचं घर नाहीसं झालं. आता ते पत्नीच्या घरी राहतात. अरब समाजात नवऱ्याने पत्नीच्या घरी राहणं अपमानजनक मानलं जातं.

गाझा पट्टीतील नागरिकांना इस्रायलने आधीच इशारा दिला होता. त्यामुळे सईद यांनी घरातल्या किमती वस्तू, कागदपत्रं घराबाहेर काढू शकले. त्यांची अपार्टमेंट हल्ल्यात बेचिराख झाली. क्षेपणास्त्र हल्ला जेमतेम काही सेकंद चालला पण आमच्या घराची डोळ्यासमोर राखरांगोळी झाली. आम्ही ज्या मानसिक ताणातून जात आहोत, त्याचा सामना करणं अवघड आहे.

आमच्या समाजात घरच्यांची जबाबदारी पुरुषाने घेणं अपेक्षित असतं. घरच्यांसाठी जेवण आणि घराची व्यवस्था मलाच करायची आहे. मात्र आताच्या घडीला मी पत्नीवर अवलंबून आहे. मला खूपच खजील वाटतं. प्रत्येक दिवस नरकाप्रमाणे भासतो. जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा ध्वस्त झालेल्या इमारती दिसतात. भूतांच्या शहराप्रमाणे वाटतं.

डॉ. ताहिर सांगतात त्यांचे वडील कॉफीबियांची आयात करायचे. आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मृत्यूआधी त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. ताहिर यांच्या तीन बहिणी डॉक्टर आहेत. त्यांचे दोन लहान भाऊ डॉक्टरकीचं शिक्षण घेत आहेत. त्यांच्या वडिलांनी मुलांसाठी तीन मजली घर बांधलं आहे. त्या घरात राहण्यासाठी वडील जिवंत राहिले नाहीत.

गाझा म्हणजे खुला तुरुंग

गाझा पट्टीतील नागरिकांना इथे राहणं म्हणजे खुल्या तुरुंगासारखं वाटतं. अनेक वर्ष सुरू असलेल्या इस्रायलने केलेली नाकाबंदी हे याचं मुख्य कारण आहे.

गाझा हा इस्रायल आणि इजिप्त यांच्यादरम्यानचा चिंचोळा भाग आहे. गाझावर हमासच्या राजकीय .. राज्य आहे. इस्रायल आणि अमेरिका हमासला दहशतवादी संघटना मानतात. वेस्ट बँक म्हणजे पश्चिम तटावर राष्ट्राध्यक्ष महबूब अब्बास यांच्या नेतृत्वाखालील प्राधिकरणाचं राज्य आहे. इस्रायलने याला कायदेशीर सरकार म्हणून मान्यता दिली आहे.

गाझात राहणारे हमासचे शस्त्रास्त्रांनी सज्ज .. आणि इस्रायलचे सशस्त्र दळ यांच्यात संघर्ष होतो. 2006 मध्ये संघर्ष झाला, लगेच त्याच्या पुढच्याच वर्षी झाला. सगळ्यात घातक हल्ला 2014 मध्ये झाला. हे आक्रमण 51 दिवस चाललं. यंदा मे महिन्यात झालेलं आक्रमण 11 दिवस चाललं.

संयुक्त राष्ट्राच्या तमारा अलरिफाई यांनी सांगितलं की, पंधरा वर्षातलं हे चौथं युद्ध आहे. एका छोट्या भागासाठी खूपच मोठा धक्का आहे. गाझात कठोर नाकाबंदी आहे. यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. जगात अन्य देशांना कोरोनाने ग्रासलं आहे त्याप्रमाणे गाझातही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे गाझासमोरच्या अडचणीत भर पडली आहे.

इस्रायलविरुद्धच्या संघर्षाने गाझा कमकुवत झालं आहे. मालमत्तेचं अपरिमित नुकसान झालं आहे. डॉ. ताहिर यांच्याप्रमाणे अनेकांची घरं नाहीशी झाली आहेत. अनेकजण बेघर झाले आहेत. अनेकांसाठी हा पहिलाच अनुभव आहे. 2014 मध्ये झालेल्या हल्ल्यात ज्या लोकांची घरं नष्ट झाली होती त्यांच्यापैकी अनेकांना अजूनही मदत मिळालेली नाही.

विध्वंसाचा व्हीडिओ

गाझा पट्टीत निवासी इमारतींच्या बरोबरीने व्यावसायिक इमारतींचंही नुकसान झालं आहे. या इमारतींमध्ये अनेक बिगरसरकारी संघटना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालयंही होती. हल्ल्याचे अनेक व्हीडिओ व्हायरल झाले. यापैकी व्यावसायिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध 14 मजली अल शोरोक टॉवर वरील हल्ल्याचा व्हीडिओ अतिशय भीतीदायक होता.

या इमारतीच्या दोन वेगवेगळ्या मजल्यांवर नोअल आकिल आणि त्यांचे सहकारी तामिर अजरमी यांची कार्यालयं आहेत. बसमा सोसायटी फॉर कल्चर अँड आर्ट्स नावाची ही बिगरसरकारी संस्था. हे दोघे आता कार्यालयात बसून काम करू शकत नाहीत. गाझामधील युवकांना सक्षम करण्यासाठी थिएटर तसंच सांस्कृतिक कार्यक्रम चालवतात.

व्यावसायिक कार्यालयं असलेल्या इमारतींवर हल्ला गाझापट्टीतील नागरिकांना अपेक्षित नव्हता. तामेर सांगतात, आम्हाला असं कधी वाटलंच नाही. व्यावसायिक भाग असल्याने सुरक्षित असेल असं वाटलं. याच भागात अल-शिफा रुग्णालयही आहे.

नोअल आणि तामेर यांनी सांगितलं की इशाऱ्याचा कालावधी खूपच कमी होता त्यामुळे तेराव्या मजल्यावर जाण्यात काही अर्थ नव्हता. त्यांच्या कामाची कागदपत्रं तिथे होती. काही सेकंदात क्षेपणास्त्रांनी सगळं नेस्तनाबूत केलं. आम्ही सगळी कागदपत्रं, अर्काइव्ह आणि बाकी सगळं सामान गमावलं. सगळं काही.

ढिगारे साफ केले जातील

तूर्तास गाझा पट्टीत बॉम्ब फुटण्याचे, रॉकेट घुसण्याचा आवाज बंद झाला आहे. युद्धविराम लागू झाला आहे. नेमकं नुकसान किती झालं आहे याचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं आहे. गाझातील पीडित लोकांच्या मलमपट्टीची ही वेळ आहे.

गाझीतील लोकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काही संघटना आणि संस्थांनी घेतली आहे. इजिप्तही याकामी मदत करत आहे. युएनआरडब्ल्यूएने याकामी पुढाकार घेतला आहे. तमारा अलरिफाई यांनी सांगितलं की आम्ही तीन प्राथमिक गोष्टी निश्चित केल्या आहेत. युद्धात बेघर झालेल्या लोकांना राहण्यासाठी घर मिळावं. युएनआरडब्ल्यूए लोकांच्या घरांचं पुनर्निर्माणाचं काम करत आहे. ज्यांचं घरांचं नुकसान झालं त्यांना मदत केली जात आहे.

दुसरी प्राथमिकता म्हणजे युद्धाचा मानसिक आघात कमी करणं. गाझातील माझ्या सहकाऱ्यांना गाझातील प्रचंड अशा मानसिक संकटाची जाणीव झाली आहे. गाझातील प्रत्येक जण मानसिक विकाराने ग्रस्त झाला आहे. तिसरी प्राथमिक गरज म्हणजे पायाभूत सुविधांचं पुनर्निर्माण करणं. गाझात आमच्या 113 सुविधा केंद्र आहेत. यामध्ये 28 शाळा आणि 6 आरोग्य केंद्र आहे. या सगळ्याचंही युद्धात मोठं नुकसान झालं आहे.

तमारा यांनी सांगितलं की कामाचा आराखडा तयार झाला आहे. सगळ्या कामासाठी मिळून 152 मिलिअन डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. कतार आणि इजिप्तने एक अब्ज डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. काही अन्य देशांनीही मदत जाहीर केली आहे.

लोकांनी मदतीसाठी नोंदणी सुरू केली. डॉ. ताहिर यांचाही यात समावेश आहे. मदत नक्की केव्हा मिळेल हे त्यांना माहिती नाही. नोंदणी केल्यानंतर आम्ही प्रतीक्षा करू. 2014च्या हल्ल्यात नुकसान झालेले अनेकजण आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

सगळीकडे ढिगारेच्या ढिगारे आहेत. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी ढिगारे उपसण्याचं काम एक महिना चालेल असा अंदाज स्थानिक प्रशासनाने वर्तवला आहे. तमारा सांगतात, हे एका इमारतीचं पुनर्निर्माण नाहीये. योग्य पद्धतीने ढिगारे हटवणं आवश्यक आहे. सप्टेंबरच्या आधी हे काम सुरू होण्याची शक्यता नाही.

सगळं काही सुरळीत होईल?

युद्धविरामानंतर इस्रायल सरकार आणि गाझातील सत्ताधारी पक्ष हमास या दोन्ही गटांनी जिंकल्याची घोषणा केली. बेंजामिन नेतान्याहू यांचं सरकार आता सत्तेबाहेर गेलं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते हमासला नागरिकांचा पाठिंबा लाभला नाही. एका अनुमानाच्या मते, हमासच्या समर्थकांमध्ये घट झाली आहे.

गाझा हा मुस्लीमबहुल प्रदेश आहे. इथे .. काही प्रमाणात आहेत. मात्र गाझात पॅलेस्टाईन .. राहत नाही. गाझा आणि इस्रायल मध्ये ... याविषयी बोलणंही कठीण आहे.

दोन्ही पक्षांच्या राजकीय दोन राज्यांच्या सिद्धांतावर सहमती होण्यासाठी काही दशकं जावी लागली. आणखी काही दशकं लागू शकतील. गाझातील मुसलमान इस्रायलच्या .. वैयक्तिक बोलायला तयार होतील? दोन्हीमध्ये जवळीक निर्माण होईल का?

डॉ. ताहेर यांना .. समस्या वाटत नाही. इस्रायलच्या वंशभेदी रणनीतीच्या विरोधात आहोत. त्यांनी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे. मी भारताच्या नागरिकांना आणि भारत सरकारला सांगू इच्छितो की या वादातून तोडगा काढण्यासाठी इस्रायलच्या सरकारवर बहिष्कार टाका आणि प्रतिबंध लागू करा. आम्ही 1948 पासून त्यांची जुलूम जबरदस्ती सहन करत आहोत.

आकिलचा केवळ एक ज्यू मित्र आहे. तो अमेरिकेत असतो. दोन्ही समाजादरम्यान मैत्रीचं नातं फुलावं याच्या तो विरोधात नाही. मुस्लीम आहोत, ख्रिश्चन आहोत, ज्यू आहोत की पॅलेस्टाईन आहोत- याआधी माणूस आहोत. आपण माणूस आहोत त्यामुळे आपण एकमेकांचं रक्षण केलं पाहिजे. आपण एकमेकांशी बोलायला हवं.

त्यांचे सहकारी तामेर अजरमी यांचीही अशीच सकारात्मक भूमिका आहे. इस्रायलची समस्या त्यांचे नागरिक नाहीत. त्यांचं सरकार आहे. आम्हाला पॅलेस्टाईनच्या मुसलमान तसंच ज्यू यांच्याशी काहीही वाद नाही. आम्ही विविध धर्माच्या नागरिकांचा सन्मान करतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)