You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : 'रॉकेट डोळ्यासमोरून गेलं, मी अक्षरशः थर-थर कापत होते'
"हे दिवाळीचे फटाके नाहीत. मी रॉकेट्स डोळ्यासमोरून जाताना पाहिले आहेत. हात-पाय अक्षरशः थर-थर कापत होते. कुठे जाऊ? धावू की बसू? काय करायचं? त्या क्षणाला काहीच सूचत नव्हतं"
इस्रायलच्या गदेरा शहरात रहाणाऱ्या शर्ली पालकर, यांचा प्रत्येक शब्द, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शिगेला पोहोचलेल्या संघर्षाची साक्ष देतो.
सतत वाजणारे सायरन, आकाशातून वायूवेगाने शहराचा वेध घेण्यासाठी येणारी रॉकेट्स, मिसाईल्स, रात्रीच्या मिट्ट काळोखात शेकडो वीजा चमकाव्यात असा उजेड, इस्रायलमध्ये रहाणारे मराठी या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहेत.
इस्रायल आणि गाझापट्टीवर नियंत्रण असलेला पॅलेस्टाईन-अरब कट्टरपंथी गट 'हमास' यांच्यात दोन दिवसांपासून तुफ्फान धुमश्चक्री सुरू आहे. याचा फटका इस्रायलच्या अनेक शहरांना बसलाय.
'जीवाचं मोल त्या 30 सेकंदात कळून येतं'
पूर्व जेरूसलेममध्ये इस्रायल-पॅलेस्टिनी नागरीकांमध्ये अनेक दिवसांपासून ताणाव होता. त्यातच सोमवारपासून (10मे) इस्रायली सैन्य आणि कट्टरपंथी-अरब गट हमास यांच्यात लढाई सुरू झाली.
ती रात्र शर्ली पालकर यांना चांगलीच आठवतेय. कुटुंबीयांसोबत त्या गदेरातील आपल्या घरी होत्या.
"दीड वाजल्याच्या सुमारास हे सुरू झालं. आम्ही रात्री चार वेळा उठलो. काहीच कळायला मार्ग नसतो. अचानक सायरन वाजण्यास सुरूवात होते. मग धावत 'शेल्टर रूम' मध्ये (बॉम्ब स्फोटापासून बचावाची खोली) जावं लागतं. पण, यासाठी फक्त 30 सेकंद मिळतात."
इस्रायलमध्ये प्रत्येक घरात बॉम्ब स्फोटापासून बचावासाठी एक खोली असते. याला बंकरही म्हणतात.
त्या रात्रीचा अनुभव सांगताना शर्ली पुढे म्हणतात, "गाढ झोपेत असताना सायरन ऐकून उठेपर्यंत दोन-तीन सेकंद निघून जातात. आई-वडील, मुलं, इतरांना उठवावं लागतं. हे 30 सेकंद अत्यंत महत्त्वाचे असतात. फार कमी वाटतो हा वेळ, पण, जीवाचं मोल कळून जातं."
गदेरा इस्रायलच्या दक्षिणेकडे वसलेलं शहर आहे. तर, शर्ली यांचं ऑफिस अशदोद शहरात आहे.
ऑफिसमध्ये आलेला अनुभव सांगताना त्या म्हणतात, "ऑफिसमध्ये असताना अचानक सायरन वाजला. रॉकेट्स डोळ्यासमोरून गेली. मी, असं चित्र कधीच पाहिलं नव्हतं. मी फक्त प्रार्थना करत होते. हे सर्व थांबूदे, मला सुखरूप घरी जाता येऊदे."
इस्रायलमध्ये सुरू असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. शाळा बंद करण्यात आल्यात. घरातून बाहेर पडताच सायरन वाजला तर? कुठे जायचं ही भीती कायम मनात असल्याचं त्या म्हणतात.
"बिल्डिंगवर अचानक रॉकेट फुटतं. त्याचे काही भाग खाली पडतात. ही परिस्थिती भीतीदायक आहे. रात्री रॉकेट आलं नाही म्हणजे परिस्थिती सुधारली असं नाही. दुसऱ्या शहरात काहीतरी घडत असतं."
इस्रायलच्या रहिवाशांसाठी ही धुमश्चक्री नवीन नाही. पण, आता मध्य इस्रायलमध्ये राजधानी तेल-अविवपर्यंत रॉकेट्स येऊ लागली आहेत.
'सतत सायरन वाजतो, झोपू शकत नाही'
विमान कंपनीमध्ये काम करणारे ओरेन बेंजामिन म्हणतात, गेल्या एक-दोन दिवसात अनेक रॉकेट्स इस्रायलच्या दिशेने सोडण्यात आलेत.
ते म्हणतात, "काल ऑफिसमधून घरी परत जात असताना अचानक रस्त्यातच सायरन वाजला. सुरक्षेसाठी गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभी करून दुसऱ्या बाजूला गेलो. जीव वाचवण्यासाठी जमीनीवर झोपलो. हा प्रकार कधीही होतो."
स्थानिक रहिवासी सांगतात, बॉम्ब, रॉकेट्स काही नवीन नाहीत. इस्रायली नागरीक मानसिकरित्या तयार असतात. याचं कारण, हा संघर्ष सुरूच असतो. पण, यावेळी भीती जास्त आहे, असं ओरेन म्हणतात.
"रात्रीचं कधीही उठावं लागतं. सायरन वाजताच बॉम्बप्रूफ रूममध्ये जावं लागतं. जीव वाचवण्यासाठी अवघे काही सेकंद मिळतात. त्यामुळे झोपच येत नाही."
एकीकडे इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यातील संघर्ष तर दुसरीकडे ज्यू आणि अरब नागरिकांवर जमावाने हल्ला केल्याच्या बातम्या इस्रायली माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.
ओरेन सांगतात, "रस्त्यावर होणाऱ्या दंगलीमुळे जास्त भीती वाटते. घरातून ऑफिसला येण्यास भीती वाटते. रस्त्यात काही होऊ शकतं."
इस्रायलच्या लूद या शहरामध्ये सर्वांत जास्त धोका आहे. हे शहर संघर्षाचा केंद्रबिंदू झालंय.
"ऑफिसला जाण्यासाठी मला लूदमधून जावं लागतं. दंगल पेटलेलं ठिकाण पार करून यावं लागतं. त्यामुळे खूप भीती होती. काही झालं तर? काय करायचं? कुठे जायचं? ऑफिसला पोहोचेपर्यंत कायम मनात भीती असते," असं ओरेन म्हणतात.
इस्रायलमध्ये प्रत्येक इमारतीत आणि बंगल्यात बॉम्बप्रूफ रूम असते. तर, रस्त्यावर असलेल्यांसाठी शेल्टरहोम असतात. ज्याठिकाणी लोक आश्रय घेऊ शकतात. तर, लहान मुलांना शाळेतच बॉम्बप्रूफ रूममध्ये कसं जायचं, किती वेळात पोहोचायचं, याचं ट्रेनिंग दिलं जातं, असं ओरेन बेंजामिन सांगतात.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचे वरिष्ठ कमांडर ठार झाल्यानंतर आणि गाझामधील बहुमजली इमारत पडल्यानंतर हमासच्या कट्टरवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले केलेत.
ओरेन पुढे सांगतात, "माझ्या मित्राचे नातेवाईक रहात असलेल्या परिसरात बॉम्ब पडला. पण, सुदैवाने बॉम्ब घरावर न पडता गाडीवर पडला. घराला हादरा बसला, पण कोणाला इजा झाली नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)